बोरिवलीच्या दोडिया मैदानात विनामूल्य फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षण संस्था सुरु होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

बोरिवलीच्या दोडिया मैदानात लहान मुलांना विनामूल्य फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेट व फुटबॉलपटू येणार आहेत.

मुंबई: बोरिवलीच्या दोडिया मैदानात लहान मुलांना विनामूल्य फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेट व फुटबॉलपटू येणार आहेत. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी या मैदानाचा विकास करत चार ते चौदा वर्षांच्या मुलांसाठी ही क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राहणाऱ्या विख्यात क्रिकेटपटूंनी येथे मुलांना प्रशिक्षण द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. ते मुंबईत असतील तेव्हा येथे प्रशिक्षण देतील या दृष्टीने माझी त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत, असे राणे यांनी सांगितले. तसेच येथे फुटबॉल प्रशिक्षणासाठी एअर इंडिया संघाचे नामवंत खेळाडू, तसेच प्रशिक्षक येणार आहेत. या दोन्ही खेळांच्या प्रशिक्षणासाठी जवळच्या परिसरातील होतकरू खेळाडूंमधून प्रत्येकी 40 मुलांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होईल, असे राणे म्हणाले.

क्रीडाविषयक कौशल्ये देण्याबरोबरच त्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून म्हाडा व महापालिकेच्या बंद पडलेल्या दोन इमारतींमध्ये लवकरच मोठ्या अभ्यासिकाही सुरू करण्यात येतील, असे राणे यांनी सांगितले. परीक्षा काळात हे वाचनालय सर्वांसाठी रात्रीपर्यंत खुले राहील. दोन्हीकडे प्रत्येकी शंभर मुलांची सोय होऊ शकेल. 15 ऑगस्ट रोजी ही वाचनालये सुरू होतील, असे राणे यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News