गरम पाण्याच्या नळाची तोटी तुटून ४ विद्यार्थी जखमी... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ४२ टक्‍के भाजला; तर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २५) घडली.

अमरावती : बाथरूममध्ये अंघोळ व ब्रश करण्याकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांवर मागच्या बाजूने असलेल्या गरम पाण्याच्या नळाची तोटी तुटून पाणी उडाले. त्यामुळे झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ४२ टक्‍के भाजला; तर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २५) घडली. दरम्यान, शाळा प्रशासनाने सर्व जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र काही जखमींना अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथील डॉ. मुकुंदराव पवार सैनिकी शाळेत पहिल्या वर्गापासून तर बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी शाळेतील दुसरी व तिसरीचे काही विद्यार्थी आंघोळ करण्याकरिता मंगळवारी (ता. २५) सकाळी बाथरूममध्ये गेले. काही विद्यार्थी याठिकाणी ब्रश करीत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता चार महिला कर्मचारीसुद्धा उपस्थित होत्या. 

दरम्यान मुलांच्या पाठीकडे असलेल्या गरम पाण्याचा नळ तोटीसकट बाहेर पडला. त्या नळातील गरम पाणी अंगावर पडल्याने प्रीत बराते याच्यासह शिवा नरेश चव्हाण (वय ८), गणेश श्‍यामराव ठाकरे (वय ९), मोहित दीपक चव्हाण (वय ७), असे चार विद्यार्थी भाजले गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेचे सचिव शिवाजी पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्काळ चारही जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर डॉ. आशीष सालनकर, डॉ. मुबशीर खान यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News