किल्ले रायगडची वाट अवघडच

महेंद्र दुसार
Thursday, 13 June 2019

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड गाठण्यासाठी हजारांच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड गाठण्यासाठी हजारांच्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यांवरून पाय घसरण्याची भीती असल्याने रायगडची वाट गडप्रेमींसाठी आजही बिकटच आहे.

शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड. गेल्या दहा वर्षांपासून गडावर साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये वाढ झाली आहे. करोडो शिवप्रेमींसाठी हे ठिकाण तीर्थक्षेत्र असल्याने या उत्सवांसाठी येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावर चढाई करणे जितके अवघड होते, तितकेच आजच्या काळातही आहे. चित्त दरवाजापासून चढाई करताना प्रत्येक पायरीवर महाराजांनी या गडाची राजधानीसाठी निवड का केली, याचे उत्तर मिळू लागते. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले हे ठिकाण आहे.

तसेच, सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळ आहे. हा गड पूर्वी जितका दुर्गम होता, तितकाच आजही आहे. उभ्या चढणीच्या पायऱ्या चढताना होणारी दमछाक आणि चक्कर आल्यास तोल जाऊन दरीत पडण्याची भीती गड चढताना वाटते.
गडावर जाण्यासाठी रोप-वेची सुविधा आहे; पण शिवजयंती, शिवराज्याभिषेकासारख्या सोहळ्यांसाठी येणाऱ्या लाखो शिवप्रेमींसाठी ही सोय अपुरी आहे. उत्सवादरम्यान ती अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दिमतीला असते. सकाळचे बुकिंग आदल्या दिवशी करावे लागते. सकाळी सहा वाजता रोप-वेसाठी बुकिंग केले, तर दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळत राहण्याची वेळ येते. तोपर्यंत गडावरील कार्यक्रम संपलेला असतो.

सोहळा संपल्यानंतर उत्साही तरुण गडावरून खाली उतरण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात. गेल्या वर्षी वाघ दरवाजावरून खाली उतरताना एकाचा मृत्यू झाला होता. रोप-वेने खाली उतरणे शक्‍य नसल्याने चिंचोळ्या पायवाटेने उतरताना गर्दी होते. यातून एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. गडावर दरवर्षी किमान सात-आठ मोठे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या शिवप्रेमींची संख्या मोठी असते. या सर्वांची व्यवस्था करणे हे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
रायगडचा पायथा ते जवळचे शहर असलेल्या महाडपर्यंतचा रस्ता उत्सवादरम्यान तोकडा पडतो. गर्दीच्या वेळेला तेथून मोठी वाहने निघू शकत नाहीत. यासाठी या मार्गाचे रूपांतर महामार्गात केले जाणार आहे.

पाचाडपर्यंतचाही मार्ग काही प्रमाणात वाहनांसाठी योग्य आहे; पण पुढील टी पॉइंटपर्यंतचा घाटरस्ता धोकादायक वळणांचा आहे. घाटरस्त्यात वाहने अडकण्याचे प्रकार घडत असतात. अपघात झाल्यास तिथपर्यंत पोचणेही पोलिस, वैद्यकीय पथकाला शक्‍य नसते. ही समस्या दरवर्षी जाणवत असल्याने या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रथमच चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली होती. गडाच्या पायथ्यापर्यंतचे हे २४ किलोमीटर अंतर पार करतानाही तितकीच कसरत करावी लागते. तेथे संपर्कासाठी कोणतीही सुविधा नाही. मोबाईलची रेंज नसल्याने संपर्क साधता येत नाही.
 

गडावर विकासकामांना वेग
जिल्हा प्रशासनाने सहा जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला शिवप्रेमींना गडावर सुखरूप पोचता यावे, यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या. काही प्रमाणात हा सोहळा मागील सोहळ्यांपेक्षा सुरळीत झाला. मात्र, यामध्ये सातत्य आवश्‍यक आहे. गडावर जिल्हा परिषदेने पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारलेली आहे. परंतु, ती उत्सवादरम्यान अपुरी पडते. निवासाची तीच अवस्था आहे.

रायगडावर टकमक पॉइंट, हिरकणी बुरूज, नगारखाना, होळीचा माळ, महाराजांची समाधी, राजमहाल, जगदीश्‍वराचे मंदिर, धान्याची कोठारे, राज्याभिषेक स्थळ, गंगासागर, अष्टप्रधान कार्यालय, वाघ दरवाजा, महाराज न्यायनिवाडा करायचे ते ठिकाण, अशी अनेक स्थळे आहेत. या स्थळांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी ६०७ कोटी रुपये खर्च येणार आहे. परंतु, पर्यटक तसेच शिवप्रेमींसाठी पायाभूत सुविधांची वानवा कायम आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News