परीक्षांवरुन माजी शिक्षणमंत्री आशीष शेलारांचा सरकारवर आरोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 June 2020
  • उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले चोख प्रत्युत्तर 

मुंबई : राज्यातील तृतीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार ऍड. आशीष शेलार यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना भाजप आमदार आशीष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्‍न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसूत्री निर्णय नसून, हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रम व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम हा पहिला, तर एटीकेटीचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत निर्णय घेतले आहेत. त्यातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्द केल्या आहेत व त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे असल्यास त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणे मंत्री म्हणून बंधनकारक समजत नाही. विरोधकांनी टीका करत राहावी, आम्ही काम करत राहू, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्‍नाला दिले.

सत्तेत असताना काळजी का वाटली नाही?

राज्यातील 3 लाख 41 हजार 308 एटीकेटी आणि बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांबाबतीत स्पष्ट धोरण आहे. सगळ्या कुलगुरूंशी येत्या दोन-तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून निर्णय जाहीर करू, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच याबाबत गेले पाच वर्षे विरोधक सत्तेत असताना त्यांना विद्यार्थ्यांची काळजी वाटली नाही का, असा टोला सामंत यांनी लगावला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News