हा सगळा व्याभिचार' ब्रह्मगाठ' या शिक्क्याखाली चालतो
हा सगळा व्याभिचार' ब्रह्मगाठ' या शिक्क्याखाली चालतो. ही जबरदस्तीने बांधलेली 'गाठ' म्हणजे गुदमरून सोडणारा 'फास' होय.
किती विचित्र प्रकार असतो नं हा, अवघ्या दोन तासांच्या दृश्यखेळाने ब्रम्हगाठीचा पेच आयुष्यभरासाठी अडकवणे. अन् यातही सगळ्यांची नजर मुलीवरचं! तिच्या केसांच्या वळणापासून तर पायांच्या तळव्यापर्यंत सी.सी.टी.व्ही. सारखी चाणाक्ष नजर ठेवली जाते. तिने बटा काढल्या असतील तर, ती थिल्लर आहे. तिचे डोळे मोठे असतील तर, तिला राग आहे. तिचा आवाज मोठा असेल व ती स्पष्ट बोलणारी असेल, तर पोरगी उद्धट आहे. असे अनेक गैरसमज या खेळात कांदेपोह्यासोबत चवीने चाखले जातात.
तिच्या पायाची बोटं वाकडी असतील, तर तिला महारोग आहे. तळवे सपाट असतील तर ती सपाट पायाची अवदसा आहे. कुळाचा नाश करते; अशी भयंकर दुषणे देत मुलांकडील मंडळी हात मारून घेतात. काय हो? कुळाचा नाश मुलीमुळेच होतो का फक्त? तिचं लग्नाआधी कुणावर जिवापाड प्रेम असेल तर 'अनैतिक संबंध' या नावाखाली तिला चिरडून टाकायचे. मग व्हर्जिनीटीवरून वादळ उठवायचे, पोरगी बारा गावचं पाणी प्यालेली आहे, चारित्र्यहीन आहे, म्हणून जगभर बोभाटा पसरवायचा.
पोरीचं उसवणं दिसतं म्हणून तिच्यावर शिंतोडे आणि पोराचं दिसत नाही, म्हणून त्याचं कौडकौतुक! आम्हाला कोवळी काकडी पाहिजे, असं तोंडवर करुन सांगताना; स्वत:च्या मुलाने किती जणींसोबत चोचले पुरवून घेतले असतील, याचा पुसटसाही विचार मनात येत नसेल का त्यांच्या?
तो मुलगा मनाने कितीही घाणेरडा असला तरीही, तिने मुकाट्याने होकार द्यावा? अशा रितीने आयुष्यभर समाजमान्य बलात्कारासाठी स्वत:ला समर्पित करावे? हे इतकं सगळं कशासाठी? तर 'प्रतिष्ठेसाठी'! अन् हा मात्र तिला धाकात ठेवून, खोटा पुरुषार्थ बाजारात गाजवायला मोकळा!
हा सगळा व्याभिचार' ब्रह्मगाठ' या शिक्क्याखाली चालतो. ही जबरदस्तीने बांधलेली 'गाठ' म्हणजे गुदमरून सोडणारा 'फास' होय.