तुम्हाला फुटबॉल खेळता येतो? तर मिळवा सरकारी नोकरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • या गावात फुटबॉल व्यतिरिक्त कोणताच खेळ खेळला जात नसल्याचे येथील गावकरी सांगतात. 

आज सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे कसरत लागते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास आणि मुलाखतीनंतरच सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होते. मात्र आता फुटबॉल खेळून तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. राजस्थानमधील एका गावात फुटबॉल खेळणाऱ्या अनेकांना आधी नोकरी मिळत असल्याचे समोर आले आहे. 

राजस्थानमधील जावर माईन्स या गावाला 'फुटबॉल व्हिलेज' म्हणून ओळखले जाऊ लागले. गेल्या ४२ वर्षांपासून या गावात फुटबॉलची स्पर्धा खेळली जाते. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत शीख रेजिमेंट जालंधर आणि एअरफोर्स दिल्ली यांचा अंतिम सोहळा पार पडला. यामध्ये शीख रेजिमेंटने बाजी मारली. हे गाव आदिवासी असल्याने याठिकाणी शिक्षणापेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे, याठिकाणी अनेकांना फुटबॉल खेळून सरकारी नोकरी मिळाल्याची संख्या अधिक आहे. 

जावरमध्ये देशातील सर्वात मोठी झिंकची खाण आहे. या गावातील १७० लोकं अशी आहेत, ज्यांनी या स्पर्धेत भाग घेल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. यामधील अनेकजण पीटीआय तर सब इंस्पेक्टर झाले आहेत. इतकंच नाही, याठिकाणी गावकरी फुटबॉलची पूजा करतात. या गावात फुटबॉल व्यतिरिक्त कोणताच खेळ खेळला जात नसल्याचे येथील गावकरी सांगतात. 

या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व देखील केले आहे. जावर गावात साधारणतः २०० घरे आहेत. मात्र ज्यावेळी या गावात फुटबॉलच्या स्पर्धा भरविण्यात येतात, त्यावेळी आजूबाजूच्या गावातील लोक याठिकाणी खेळ पाहण्यासाठी येतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News