श्रोत्यांच्या मनात घर करणारा लोककलावंत

तारका हरेंद्र जाधव
Saturday, 23 May 2020

आदरणीय लोककलावंत छगन चौगुले यांना लेखाच्या माध्यमातून  शब्दांजली वाहण्याचा आणि त्यांनी सादर केलेल्या लोककवी हरेंद्र जाधव यांच्या ७५ हुन अधिक कथा, ध्वनिमुद्रिका, ऑडिओ सीडी, विडिओ सीडी याबद्दल व्यक्त होण्याचा प्रयन्त करणार आहे. त्याचबरोबर या कथा जेव्हा लिहिल्या गेल्या… साधारणपणे १९९५ ते १९९७ दरम्यानचा काळ तेव्हाच्या काही आठवणीं सांगणार आहे.

माझे वडील म्हणजेच लोककवी हरेंद्र जाधव हे जेव्हा विंग्स च्या मराठी विभागात लेखक म्हणून कार्यरथ होते तेव्हा जवळ जवळ  ७५ हुन अधिक कथा त्यांनी लिहिल्या आणि  इतर अनेक  ध्वनिमुद्रिका साठीचे लिखाणही त्यांनी केले. ज्या आदरणीय छगन चौगुले यांनी गायल्या आणि त्यांना संगीत दिले ख्यातनाम संगीतकार आदरणीय मिलिंद मोहिते यांनी महत्वाचे म्हणजे साऱ्यांचे ध्वनिमुद्रण केले होते. प्रमोद घैसास यांच्या या कथा साधारणपणे १९९५ साली प्रसिद्ध झाल्या. अगदी गोड आवाजात चिलिया बाळाची कथा सादर करणारे लोकगायक म्हणून चौगुले मामांनी ख्याती मिळवली होती. पुढे या कथा फारच प्रसिद्ध झाल्या, त्यांचा एक वेगळा ढंग होता, एक वेगळी चाल होती, संबळ ठेक्यावरच्या या कथा चौगुले मामांना गातांना, लोककवी हरेंद्र जाधव यांना लिहितांना, मिलिंद मोहिते मामांना त्या संगीतबद्ध करतांना, आदरणीय प्रमोद घैसास यांना त्या ध्वनिमुद्रित करतांना आणि प्रकाश भाई आणि जेठा भाई यांना विंग्स च्या माध्यमातून त्या प्रकाशित करतांना पाहिलंय. तो काळ  नजरे आड  होणे अशक्यप्राय आहे. बऱ्याच वेळेला  मुंबईच्या व्हि-२ स्टुडिओत रेकॉर्डिंग  होत असे.  पुढे छगन चौगुले मामांनी इतर ढंगाची गाणीही गायला सुरुवात केली. इथे मला प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते की, कथा प्रवासात त्यांना श्रीमान गवळी हे साथ देत असत (जसा गाण्यात कोरस असतो ना त्याप्रकारे कथा सादर करतांना एक आणखी एक गायक साथ देत असतो.) 

काही प्रसिद्ध कथा इथे नमूद कराव्याश्या वाटतात ज्या खरंच अगदी वेगळ्या आहेत. ज्या तेव्हाच्या परिस्थितीवर लिहिल्या गेल्या होत्या. लोककवी हरेंद्र जाधव, संगीतकार मिलिंद मोहिते आणि लोकगायक छगन चौगुल... “कथा गुजरात भूकंपाची, कथा भीमरायाची, कथा संत कबीराची, कथा गुलब्या नाईकांची, कथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची, कथा संत कान्होपात्राची, कथा भक्त प्रल्हादाची, कथा भाऊबहीणीची, कथा ज्ञानेश्वर समाधीची, कथा गौतम बुद्धांची, कथा भाऊ बहिणीची, कथा हुंडाबळीच्या, कथा श्रावण बाळाची” अशा अनेक अनेक कथा आणि मग २००९ पर्यंत अनेक गीतांचे अल्बम ही निघाले आणि त्या ध्वनिमुद्रिका तितक्याच लोकप्रिय झाल्या त्यातील काही...

“धन्य धन्य हो कानिफनाथ, जशी पंढरी तशीच शिर्डी, भीमराया माझा भारी गुणवान”. संगीतमय कथा प्रवासातली एक छानशी आठवण आज मी तुम्हांला इथे सांगणार आहे, या कथा ग्रामीण भागात भरपूर लोकप्रिय होत होत्या आणि त्यामुळे दर महिन्याला एक कथेचा प्रोजेक्ट असे... घरी तितक्या वेगाने त्या लिहिता येत नसत म्हणून मग पप्पा त्या लिहायला जुईनगर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ५ ला निवांत जाऊन बसत. कारण तेव्हा तिथे माणसांची वर्दळ कमी असायची आणि शांत वातावरणही असायचे. अनेक वेळा आम्ही पप्पांना बोलवायला जात असू किंवा कधी कधी तर टिफिनही घेऊन जात. तिथला कर्मचारी वर्गही गुरुजी इथे येतात लिहायला म्हणून भेटायला येत असत. 

तेव्हा मोबाईल नव्हता... हो पण एक पेजर होता पप्पांकडे आणि घरी लँडलाईन ही दोन प्रमुख साधने संपर्काची... मग बराच वेळेला चौगुले मामा आणि मिलिंद मोहिते मामांचा घरी फोने येत असे... गुरुजी कुठे आहेत? मामा ते जुईनगर स्टेशनला आहेत प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि मग ही मंडळी घरी न येत थेट जुईनगरलाच जात असत आणि इथेच गीत, संगीत आणि आवाजांची रेकॉर्डिंगची तयारी केली जात. अशा प्रकारे एक नाही दोन नाही चक्क ७५ हुन अधिक कथेचे प्रोजेक्ट विंग्स म्युझिक, गीतकार हरेंद्र जाधव, संगीतकार मिलिंद मोहिते आणि अतिशय गोड गळ्याचे गायक आदरणीय छगन चौगुले यांनी प्रेक्षकांसाठी सादर केले होते जी एक विलक्षण आणि प्रशंसनीय बाब आहे. त्यांचे लोक- कलाक्षेत्राला दिलेले मोठे योगदान आहे, आज महाराष्ट्राचे नामवंत लोककलावंत छगन चौगुले आपल्यात शरीराने नसले तरी त्यांच्या आवाज आणि कलेच्या रूपाने ते सदैव श्रोत्यांच्या मनात आणि कलाक्षेत्राच्या दालनात वंदनीय राहतील  धन्यवाद !

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News