आरटीई प्रवेशासाठी पाच हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढत असल्याने लातूरमधून प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या ५ हजार १२९ पर्यंत पोचली आहे.

 बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढत असल्याने लातूरमधून प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या ५ हजार १२९ पर्यंत पोचली आहे. मात्र, अर्ज करण्याची मुदत संपली की दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढवून देण्यात आली आहे, हे शिक्षण विभागातर्फे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

गरीब, गरजू, अनाथ मुलांना चांगल्या शाळांत प्रवेश घेता येत नाही. त्यांना ही संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सरकारने आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या प्रवेशप्रक्रियेत लातूर शहर आणि जिल्ह्यातील २३० शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांत २ हजार १३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. 
अर्ज भरण्यासाठी २९ फेब्रुवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली. या कालावधीत लातूर शहर आणि जिल्ह्यातून ५ हजार १२९ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अर्ज करण्याची मुदत संपली की नाही, हे अद्याप शिक्षण विभागाने स्पष्ट केले नाही.

दरवर्षी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन ते तीन वेळा वाढवून दिली जाते. तशीच ती यंदाही मिळणार आहे का, याकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अर्ज करण्याची मुदत चार मार्चपर्यंत वाढवून मिळण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे. मात्र, यासंदर्भात आरटीईच्या संकेतस्थळावर महिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

‘ॲप’ला शून्य प्रतिसाद

पालकांना घरबसल्या अर्ज भरता यावा, वेळ आणि पैसा वाचावा म्हणून शिक्षण विभागाने ॲपच्या माध्यमातून अर्ज भरण्याची सुविधा मागील वर्षापासून उपलब्ध करून दिली आहे. मागील वर्षी पहिले वर्ष असल्याने ॲपला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यंदाही तसेच चित्र आहे. राज्यभरातून केवळ १२ जणांनी ॲपच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरला आहे. यात मुंबई (०५), सातारा (०१), पुणे (०३), कोल्हापूर (०१), ठाणे (०२) या शहरांचा समावेश आहे. लातूरसह उर्वरित शहरांतून अॅपला शून्य प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News