नृत्य, योगासनातून फिटनेस; सांगते माधुरी दीक्षित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत काही बदलले नसेल, तर ते माझे शरीर! एकीकडे यशस्वी कारकीर्द घडवणे, तर दुसरीकडे एक आई आणि बायको म्हणूनही माझ्यावर जबाबदारी होती.

आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत काही बदलले नसेल, तर ते माझे शरीर! एकीकडे यशस्वी कारकीर्द घडवणे, तर दुसरीकडे एक आई आणि बायको म्हणूनही माझ्यावर जबाबदारी होती. ही सर्व जबाबदारी मी स्वतःच्या शरीराची काळजी घेतच पार पाडत असते. यासाठी आवश्‍यक असलेले डाएट व वर्कआऊटमध्ये मी खूप शिस्त पाळते. यामुळेच मी माझे शरीर निरोगी आणि फिट ठेवू शकले आहे. 

हेल्दी राहायचे असल्यास खाण्याच्या सवयी या जपानी असल्या पाहिजेत. संपूर्ण पृथ्वीवर जपानी लोक जास्त हेल्दी आहेत. त्यामुळे मी जपानी लोकांप्रमाणे मासे वगैरे खात असते. मी पदार्थ भाजणे किंवा तळण्याऐवजी उकडून खाण्याला पसंती देते. माझी सकाळची सुरवात ही ओटमिल, तीन अंड्यांचा पांढरा भाग व टोस्ट खाऊन होते, तसेच सकाळी मी चहाही घेते. मला चहा आवडतो आणि मी दिवसातून किमान दोन वेळा चहा घेते.

त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळेत मी तात्पुरती भूक भागवण्यासाठी सुकामेवा व अर्ध्या फळासोबत वाटीभर दही खाते. दुपारच्या जेवणात एक माशाचा किंवा चिकनचा तुकडा, सोबत भाजी व बाजरीची भाकरी खाते. भात खाणे मी टाळते. संध्याकाळी एका अंड्याचा पांढरा भाग व चहा घेते किंवा प्रोटीन असलेले पदार्थ खाते. रात्रीचे जेवण मी ७ ते ७.३०च्या दरम्यान घेते. यामुळे अन्न लवकर पचते व वजनही आटोक्यात राहते. या जेवणात मी एक बाऊलभरून सलाड व भाजलेला माशाचा एखादा तुकडा किंवा चिकन आणि भाजी खाते. बाहेरचे कोणतेही सॉफ्ट ड्रिंक पिण्याऐवजी मी नारळ पाणी पिते. हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. गोड पदार्थ हा माझा वीक पॉइंट आहे. मला क्रंची कॅरमल पॉपकॉर्न व घरी केलेले तिळाचे लाडू फार आवडतात. 

फक्त पौष्टिक खाणे एवढेच शरीरासाठी पुरेसे नसते. यासोबत व्यायाम करणेही गरजेचे असते. मी रोज व्यायाम करते. मी फक्त स्वतःच व्यायाम करत नाही, तर माझ्या कुटुंबातील व मित्र-मैत्रिणींनाही माझ्या दैनंदिनीमध्ये सामाविष्ट करून घेते. मला जिम काही फार आवडत नाही, तरीही मी आठवड्यातून दोन वेळा जिमला जाते. यामध्ये कार्डिओ, पॉवर योगा व वेट ट्रेनिंग करते. यामुळे माझा स्टॅमिना व लवचिकता वाढते. माझे मानसिक आरोग्यदेखील चांगले ठेवण्यासाठी याची मदत होते. मी लहानपणापासूनच नृत्य करते आहे. मी ८ वर्षे कथक शिकले आहे. नृत्य माझे पहिले प्रेम आहेस, तसेच हे माझ्या फिट राहण्याचेही आणखी एक कारण आहे. आठवड्यातून तीन दिवस कथकचा सराव करते. कथक आणि वर्कआऊटमध्ये योग्य तारतम्य साधून मी हे करत असल्याने याचा मला फायदाच होतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News