गर्भाशयाच्या तयारीची पहिली पायरी 'पाळी' 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 January 2020

प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येणारा एक अविभाज्य अनुभव. छोट्या मुलीची स्त्री होते, ती पाळी येण्यामुळेच! गर्भधारणेसाठी योग्य असे बीज पक्व झाले की गर्भधारणा न झाल्यास, ते दर महिन्याला बाहेर टाकणे म्हणजे पाळी येणे. लहान बाळाच्या संगोपनासाठी गर्भाशयाच्या तयारीची पहिली पायरी म्हणजे पाळी

पाळी! प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येणारा एक अविभाज्य अनुभव. छोट्या मुलीची स्त्री होते, ती पाळी येण्यामुळेच! गर्भधारणेसाठी योग्य असे बीज पक्व झाले की गर्भधारणा न झाल्यास, ते दर महिन्याला बाहेर टाकणे म्हणजे पाळी येणे. लहान बाळाच्या संगोपनासाठी गर्भाशयाच्या तयारीची पहिली पायरी म्हणजे पाळी येणे.

तसे पाहिल्यास मूत्रक्रिया, शौचक्रियांसारखीच ती एक जीवशास्त्रीय क्रिया आहे, पण आज समाज इतका बदलला, रूढी परंपराही बऱ्याच बदलल्या, पण पाळीभोवती असलेले गूढ आणि पाळीविषयी असलेले समज गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. 

मुख्य म्हणजे पाळीबद्दल मुलींच्याच मनात असलेली भीती. त्या चार दिवसांत मी नेहमीसारखी वावरू शकेन का, नृत्य शिकत असेल, तर नाचू शकेन का, खेळाडू असेन तर खेळू शकेन का? हे आणि असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात रुंजी घालत असतात. वास्तविक पाहता योग्य निगा राखली, नीट काळजी घेतल्यास रोजच्या कोणत्याच व्यवहारामध्ये पाळीमुळे बाधा येत नाही. हे सगळे समजून घेण्यासाठी आधी या गोष्टीभोवतीचे गूढतेचे वलय काढून टाकायला हवे.

मोकळेपणाने घरात यावर बोलले गेले पाहिजे. आजच्या पिढीतले बाबा खूप समंजसपणे आपल्या वयात येणाऱ्या मुलीशी बोलत आहेत. भाऊ-बहीणही अधिक मोकळेपणाने हा विषय ‘पार्ट ऑफ लाइफ’ म्हणून सहजपणे हाताळत आहेत, हा खूप आश्वासक आणि सकारात्मक बदल आहे. असाच वैचारिक बदल होण्यास हातभार लागावा म्हणून हा लेखन-प्रपंच. वर्षभर आपण स्त्री-स्वास्थ्याविषयीची अशीच माहिती या लेखमालेतून घेणार आहोत.

साधारणपणे १० ते १५ व्या वर्षी मुली वयात येतात. त्यांना विश्‍वासात घेऊन या नैसर्गिक प्रक्रियेविषयी, तिच्या महत्त्वाविषयी सांगितले पाहिजे. पॅड, टँपून तसेच ‘शी-कप’सारखी साधणे वापरून हल्ली पाळी खूपच सुखकर करता येते. शिवाय या काळात पोहणे, शरीर संबंध या किंवा अशा अनेक गोष्टी करू शकत नाही, असे गैरसमज व्यवस्थित अभ्यासून दूर केले पाहिजेत.

स्वच्छता, संसर्ग होऊ नये म्हणून नीट काळजी घेणे, पाळीला उशीर होत असल्यास डॉक्टरचा योग्य वेळी सल्ला घेणे या गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास हा काळ नक्कीच सुखाचा होईल. निसर्गाने स्त्रीला दिलेले हे वैशिष्ट्य आहे. ते आनंदाने स्वीकारायचे का चिडचिड, भीती अशा भावनांत या शारीरिक अवस्थेला मानसिक चिंता बनवायचे ते प्रत्येकीने विचार करून ठरवावे व कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News