गडाखालून गडावर लोकवर्गणीतून साकारलेली देशातील पहिली योजना 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • सदाशिवगड पाणी योजनेची चाचणी यशस्वी

  • अजूनही योजनेची कामे बाकी

कराड ःगडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने गडाखालून सुमारे दोन किलोमीटर पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेची सोमवारी सायंकाळी पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवगर्णीतून ही योजना हाती घेतली असून देशासह राज्यात सर्वप्रथम सदाशिवगड येथेच ही अभिनव योजना राबवण्यात आली आहे.

गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने महत्त्वकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपुजन केले होते. या योजनेसाठी बाबरमाची येथील शेतकरी जयवंत विठ्ठल मुळीक यांनी आपल्या विहिरीचे पाणी निःस्वार्थ भावनेने दिले असून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या योजनेसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.

आमदार बाळासाहेब पाटील, गजानन हौसिंग सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष एच. के. राव, डॉ. धनंजय चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी राजश्री चव्हाण, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कराड अर्बंन बँकेंचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सदाशिवगड भ्रमण मंडळाचे वसंतराव खंडेलवाल यांच्यासह हजारमाची, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची या गावांसह कराड तालुक्यासह परिसरातील सदाशिवगड प्रेमी नागरिक, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, यांनी या योजनेसाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सढळ हाताने मोठी आर्थिक मदत केली आहे.

याच गडप्रेमींच्या सहकार्यामुळे सहा महिन्यात पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पहिल्या चाचणीसाठी मोटर सुरू करण्यात आली आणि त्यानंतरच्या दहा मिनिटात गडावर पुरातन महादेव मंदिरासमोर असणार्‍या विहिरीत पाईप लाईनद्वारे पाणी पडले. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 19 तास सलगपणे मोटर सुरू ठेवण्यात आली. त्यामुळेच महत्त्वकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेची पहिली चाचणी यशस्वी ठरली असून आता सदाशिवगड पर्यटनासह विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे.

अजूनही योजनेची कामे बाकी
सदाशिवगड पाणी योजनेची पहिली चाचणी यशस्वी ठरली असली तरी योजनेची काही कामे करणे अद्याप बाकी आहे. त्याचबरोबर 22 लाख खर्चाच्या योजनेसाठी अजूनही साडेतीन ते चार लाखांचा निधी कमी पडत आहे. त्यामुळेच समाजातील दानशूर व्यक्तींनी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांच्यासह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने केले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News