पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020

मुंबई विद्यापीठाशी संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 6) जाहीर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा कट ऑफ यंदा पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 6) जाहीर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचा कट ऑफ यंदा पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढला आहे. त्यामुळे विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रवास खडतर राहणार आहे; तर व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा पारंपरिक अभ्यासक्रमांची कटऑफ यंदा चांगलीच वाढ झाली आहे.

बारावीत यंदा 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा कधी होणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये विज्ञान शाखेचा कट ऑफ आता पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. दरवर्षी बारावीची परीक्षा झाल्यावर महिनाभराच्या कालावधीत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमांसाठी राज्याची प्रवेश परीक्षा होते; तर राष्ट्रीय पातळीवर जेईई आणि नीट ही परीक्षा घेण्यात येते; मात्र यंदा या सर्व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही; तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षाही नेमक्‍या कधी होतील हे अद्याप सांगता येत नाही. यामुळे विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा बीएससी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवले आहेत. यामुळे विज्ञान शाखेचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढलेला दिसत आहे. याचबरोबर 90 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्‍क्‍यांनी वाढल्यानेही कट ऑफ वाढला आहे.

कला शाखेलाही पसंती
मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल वाढला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व, पारंपरिक शिक्षणासह अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी मिळणारा वेळ, असंख्य नव्या संधी यामुळे हा बदल घडताना दिसत आहे. त्यातच सर्व नामांकित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून आपले प्रवेश निश्‍चित केल्याने हा टक्का वाढला आहे.

- रुईया महाविद्यालयाचे कट ऑफ
विज्ञान- 87.08 टक्के
कला- 95.6 टक्के

- झेवियर्स महाविद्यालय
कला- 92 टक्के
विज्ञान- 94.0 टक्के

- मिठीबाई
कला- 96 टक्के
वाणिज्य- 91.40 टक्के
विज्ञान- 84.40 टक्के

- एन. एम. महाविद्यालय
वाणिज्य- 94.33 टक्के
कला- 93.8 टक्के
विज्ञान- 91.8 टक्के

- सोमय्या महाविद्यालय
कला- 88.20 टक्के
वाणिज्य- 88.20
विज्ञान- 61

विल्सन महाविद्यालय
कला- 93.6 टक्के
विज्ञान- 64 टक्के

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News