पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाने गाळला घाम

सुनंदन लेले
Tuesday, 4 June 2019
  • भुवीला फलंदाजीचाही सराव
  • विराट कोहलीने क्षेत्ररक्षणासोबत जाळ्यात फलंदाजीचा सराव केला​

साऊदम्पटन -  विश्वकरंडक स्पर्धेतील स्वतःच्या पहिल्या सामन्याला दोन दिवस बाकी राहिले असताना भारतीय संघाच्या सरावाला धार चढली आहे. साऊदम्पटन शहराच्या काहीशा बाहेरील बाजूला असलेल्या एजीस बाऊल मैदानावर भारतीय संघाने सोमवारी चांगला जोरकस सराव केला. विराट कोहलीने क्षेत्ररक्षणासोबत जाळ्यात फलंदाजीचा सराव केला; ज्याने त्याच्या दुखापतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

नव्या जमान्यातील भारतीय संघ मोठ्या सामन्याअगोदर दोन दिवस सर्वात जोरात सराव करतो. सामन्याच्या आदल्या दिवशीचा सराव पर्यायी ठेवला जातो. दोन दिवस अगोदर सगळेच्या सगळे खेळाडू सरावाला हजर असतात. सामन्याच्या आदल्या दिवशी सरावाची सक्ती केली जात नाही.  ज्या खेळाडूंना सराव करायची इच्छा असते, त्यांना प्रशिक्षक मैदानावर आणून भरपूर सराव मदत करतात. 

विराट कोहलीकडे पत्रकारांचे बारीक लक्ष होते. कोहली नेहमीच्या उत्साहाने मैदानात उतरला. प्रशिक्षक शंकर बासूच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यायामप्रकार मनापासून केल्यावर कोहलीने थोडे क्षेत्ररक्षण केले. मग त्याने जाळ्यात फलंदाजीचा सराव केला. फलंदाजीचा प्रशिक्षक संजय बांगर आणि खास चेंडू टाकायला भारतीय संघासोबत असलेला रघु कोहली २० मिनिटे फलंदाजीचा सराव देताना दिसले. 

सगळ्यात नंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजीच्या सरावाला मैदानात आला. जसप्रीत बुमराला नवा चेंडू हाती देत धोनीने फलंदाजीचा सराव केला. कुलदीप यादवच्या फिरकीला धोनीने खूप लांब लांब षटकार मारले. ‘माही भाई आज मिसाईल सोडत आहेत बॅटमधून’, असे सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या एका खेळाडूने म्हटले.

भुवीला फलंदाजीचाही सराव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी साऊदम्पटनला ढगाळ हवामानाची शक्‍यता लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमारला नुसता गोलंदाजीचा नव्हे; तर फलंदाजीचा सराव करायला सांगितले. सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनने जाळ्यातील सरावाबरोबर नंतर कमी अंतरावरून आखूड टप्प्याच्या माऱ्याचा सरावही केला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News