अमित ठाकरे यांच्या पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 January 2020

६,५०० कंत्राटी कामगारांच्या खात्यात पगारातील थकबाकी ९० कोटी रुपये जमा होणार
प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी
मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर कंत्राटी कामगारांचा फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष साजरा

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला मोठं यश आले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान तसेच आरोग्य यांसारख्या एकूण १७ विभागात कार्यरत असलेल्या ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या थकीत वेतनातील फरक ९० कोटी रुपये कंत्राटी कामगारांना मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला होता. 

या मोर्चात ३ ते ४ हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला. आज शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील आठवड्यात कामगारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पहिल्या ऐतिहासिक मोर्चाला मोठं यश मिळालेलं असल्याचे बोललं जात आहे. 

कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कंत्राटी कामगारांकडून शुक्रवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. कालच मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अमित राज ठाकरे यांची मनसे नेतेपदी निवड करण्यात आली आणि आज कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निव्वळ सुवर्णक्षण असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News