दुर्गम भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी देशातला पहिलाच प्रयोग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत.
  • परंतु पुणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात एक वेगळा नविन उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी राबवला आहे.

जुन्नर :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. परंतु पुणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात एक वेगळा नविन उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी राबवला आहे. जिथे मोबाइला नेटवर्क नाही तिथे ऑनलाइन शिक्षण कसे पोहचणार हा प्रश्न होता यावर आयुष प्रसाद यांनी मार्ग काढला. विशेष म्हणजे हा उपक्रम देशात राबवणारी पुणे जिल्हापरिषद ही पहिली एकमेव जिल्हा परिषद आहे.

पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे हे निसर्गसंपन्न गाव आहे. पण या ठिकाणी ना मोबाईलची टिक-टिक वाजते ना पायाभुत सुविधा. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे गाव विकासकांमासाठी दत्तक घेतले आहे. परंतु इथल्या समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत. कोरोना काळात इथल्या डोंगर कपारीत आणि वाड्या वस्तीवर राहणाऱ्या मुलांचे काय होणार ही सुद्धा समस्या होतीच. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक आयडिया लढवली आणि पोरं जाम खुश झाली.

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांना आदेश देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यकता होती ती अँड्रॉईड मोबाईल आणि नेटवर्कची. त्यामुळे हा उपक्रम शहरी भागात आणि रेंज उपलब्ध आहे अशा ग्रामीण भागात यशस्वी झाला.

कोविड-१९ च्या कालावधीत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. पण राज्याच्या अप्पर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे तसेच गावातील मोकळ्या जागेत समाज मंदिर, चावडी गावातील उपलब्ध असलेला एखादा हॉल शालेय परिसरातील मोकळी जागा क्रीडांगण किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या पाच ते दहाच्या गटाने वेळेचे नियोजन करून कम्युनिटी क्लास म्हणजेच समुदाय वर्ग या माध्यमातून नियोजित शैक्षणिक अध्यापन करावे. तसेच हे होत असताना जास्त गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूचा फैलाव  होणार नाही. याबाबतची काळजी घेण्यात येऊन लॉकडाउन बाबतचे सर्व नियम पाळण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये. ज्या विद्यार्थ्यांकडे सोशल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांची उणीव आहे त्यांच्यापर्यंत शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करावे आणि या सगळ्यावर दर आठवड्याला केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांनी एकत्रित अहवाल करून जिल्हा परिषदेला पाठवावा असे म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद झाल्याने जुलै महिन्यात या आदिवासी भागातील कोपरे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता निर्मल आणि शिक्षक  शैलेंद्र देवगुणे यांनी या उपक्रमाला शिक्षक मित्रांच्या सहकार्याने सुरुवात केली. आदिवासी भागात बऱ्याच ठिकाणी मोबाईल आणि नेटवर्क नसल्याने या दुर्गम आदिवासी भागात शाळा बंद झाल्याने आणि नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारच असे वाटत होते.

पण अत्यंत दुर्गम आदिवासी समजल्या जाणाऱ्या कोपरे-मांडवे, मुथाळणे, पुतांचीवडी, जांभुळशी या भागातील आश्रमशाळेसह जिल्हा परिषदेच्या शाळेतील शेकडो विध्यार्थी या वर्षी शिक्षणापासून वंचित राहतात की काय? अशी भीती असतानाच याच भागातील पूजा विठ्ठल कवटे, शंकर गेनू माळी, उमेश बुधा माळी, निलेश रमेश माळी, रवींद्र मनोहर मुठे, गणपत नामदेव मुठे, पांडुरंग जयराम माळी, अंकुश हरिभाऊ माळी, महेंद्र बुधा माळी या पदवीधर आणि उच्चपदवीधर तरुण स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.

स्थानिक शिक्षकांच्या सहकार्याने "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू" या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने मुलांना शिकविण्यास पुढाकार घेतला आणि शिक्षकमित्र म्हणून काम करायचे ठरविले ज्यामुळे या दुर्गम आदिवासी मुलांचा शिक्षण प्रवाह चालू राहण्यासाठी मदत झाली आहे. हे सर्व शिक्षकमित्र गटागटाने आणि कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करून मुलांना शिकवत आहेत. या स्वयंसेवक शिक्षकमित्रांचे आपल्या आदिवासी बांधवावरील शैक्षणिक प्रेम पाहून  कोपरे जांभुळशी ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच हौसाबाई काठे, विद्यमान सदस्य विठ्ठल कवटे, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आपण दत्तक घेतलेल्या कोपरे - जांभुळशी भागातील नेटवर्किंगची समस्या दूर करण्यासाठी टॉवर लवकरात लवकर सुरु करावे यासाठी विनंती पत्र लिहिले आहे.

जिल्हा परिषदेच्या कम्युनिटी स्कुल उपक्रमाच्या पुढे जात या गावातल्या माजी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेत "शाळा बंद पण शिक्षण चालू!"  या उपक्रमाची जोड देत स्वतः खारीचा वाटा उचलला. केमस्ट्री मध्ये एम.एस.सी.  झालेली पूजा कवटे ५ वी ते दहावीच्या मुलांना मारुती मंदिरात शिकवताना दिसली. पीक अप शेडमध्ये उमेश माळी १ ली ते ५ वीला शिकवत होता आणि गावा बाहेरील समाज मंदिरात ९ वी मध्ये शिकणारी स्वाती कवटे अंगनवाडीततल्या चिमुरड्या मुलांना शिकवत होती.

हा उपक्रम मागील महिन्या पासून इथे अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांनीही मोठे कौतुक केले आहे. शिक्षक आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने गावातली मुले शिक्षणाबाहेर राहणार नाहीत याचे ही समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमात गावातील माजी विद्यार्थी सहभागी झाले आणि "शाळा बंद पण शिक्षण चालू" उपक्रम राबवला गेला. यामुळे कोणत्याही सुविधा नसताना आदिवासी आणि दुर्गम भागातली ही पोर कुरकुर न करता शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हा उपक्रम इतरही जिल्ह्यातल्या आदिवासी भागात यशस्वी झाला असता तर सुविधा नसणाऱ्या मुलांना फायदा होणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News