जाणून घ्या... सोशल मीडियावर काय चाललंय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 June 2020
  • #NoExamsInCovid या हॅशटॅग
  • मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण
  • हास्यविनोदांचे व्हिडीओ
  • भारतीयांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार

 

राज्यामध्ये कोरोनाचे थैमान जराही शमले नसून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयाचे समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी स्वागत केले होते. त्यासोबत अनेक परीक्षा असतात, त्यांच्याबाबतही शिक्षण विभागाने निर्णय घ्यावेत याबाबतची मागणी #NoExamsInCovid या हॅशटॅगसह नेटकरी करीत होते. त्यामुळे राज्यात होणाऱ्या सीईटी परीक्षासुद्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत नेटकरी समाजमाध्यमांवर व्यक्त होत होते. परीक्षा घेण्याच्या निर्णयाची वेगवेगळ्या बाजूने समीक्षा करण्याची चढाओढ सर्वत्रच सुरू आहे.

कोरोनाचा विळखा राज्याला घट्ट बसला असताना, मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी तिसऱ्या मंत्र्यालाही उपचारानंतर आता घरी सोडण्यात येणार असल्याची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या नेत्याचे चाहते शहरी भागापासून ते ग्रामीण भागातही असल्याने ते कोरोनामुक्त झाल्याची चर्चा नेटकरी करीत होते.

राज्यात अनेक मराठी हास्य कलाकारांनी अभिनय क्षेत्र समृद्ध केले. असाच एक अभिनेता म्हणजेच मकरंद अनासपुरे. आपल्या अस्सल ग्रामीण भाषेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मकरंद यांचा सोमवारी जन्मदिवस होता. त्यामुळे असंख्य मराठी नेटकरी त्यांना शुभेच्छा देत होते. त्यासोबतच त्यांच्या हास्यविनोदांचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर शेअर करीत होते.

भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. त्याचा परिणाम म्हणून, भारतीयांकडून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही चिनी कंपन्यांची महाराष्ट्रातील 5 हजार कोटींची गुंतवणूक थांबवली आहे. त्यामुळे देशभरातून नेटकरी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करीत आहेत.

अभिनेता सुशांतसिंग याच्या निधनानंतरही नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी चर्चा अजूनही सुरूच आहेत. बिहारसारख्या राज्यातून येऊन संघर्ष करत अभिनय क्षेत्रात त्याने आपले नाव कमावले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील लॉबिंगवर नेटकरी सडकून टीका करीत आहेत. बॉलीवूडमधील प्रसिद्ध घराण्यांनी अनेक यंत्रणा आपल्या नियंत्रणात ठेवल्या असल्याने सुशांतसारख्या कलाकाराला संघर्ष करावा लागत असल्याचे नेटकरी व्यक्त होत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News