अखेर लांबलेले नेमबाजी शिबिर ‘या’ दिवशी सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • भारतीय नेमबाजी संघटनेने अखेर १ ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आता हे शिबिर १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे संकेत भारतीय नेमबाजी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले.

मुंबई :- भारतीय नेमबाजी संघटनेने अखेर १ ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे शिबिर १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे संकेत भारतीय नेमबाजी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर १ ऑगस्टपासून होणारे शिबिर आघाडीच्या ३४ नेमबाजांसाठी सक्तीचे करण्यात आले होते. त्यास नेमबाज, मार्गदर्शक, एवढेच नव्हे, तर शिबिरासाठी नेमलेले समन्वयक रोनक पंडित यांनी विरोध केला होता. आता या शिबिराच्या ठिकाणी आलेल्या महिला मार्गदर्शकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही तासात शिबिर लांबवण्याचा निर्णय झाला.

शिबिर सुरू करण्यापूर्वी नेमबाज, सपोर्ट स्टाफच्या प्रवास तसेच निवासाचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिर लांबणीवर टाकण्यात आल्याचे संघटनेचे कार्यकारी सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले. आम्ही शिबिराबाबत मार्गदर्शक, नेमबाजांचे मत मागवले आहे. त्यांचे शिबिराबाबतचे मत तसेच सूचना लक्षात घेऊन निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हे शिबिर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी हे शिबिर आवश्‍यक आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपासून हे शिबिर सुरू करण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असेही संघटनेने नेमबाज तसेच मार्गदर्शकांना कळवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात अजूनही नेमबाज तसेच मार्गदर्शक शिबिराची घाई करण्याची आवश्‍यकता काय, अशी विचारणा करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News