अंडर सेव्हन्टीन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना नवी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020

भारतात 17 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेतील लढती अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी आणि कोलकता येथेही होणार आहेत. 

मुंबई : विश्वकरंडक सतरा वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील नवी मुंबईतील अंतिम सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या स्पर्धेसाठी स्टेडियमचा आढावा सुरू झाल्यापासून त्याचे संकेत मिळत होते. आता स्पर्धेच्या नव्या कार्यक्रमानुसार नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर स्पर्धेतील एकंदर चार सामने होणार हे निश्‍चित करण्यात आले आहे.

भारतात 17 फेब्रुवारी ते 7 मार्च 2021 या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेतील लढती अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी आणि कोलकता येथेही होणार आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विश्वकरंडक 17 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेतील उपांत्य तसेच अंतिम आणि तिसऱ्या क्रमांकाची लढत कोलकत्त्यास झाली होती; तर त्या वेळी उपांत्य लढत नवी मुंबईत झाली होती. आता मुलींच्या स्पर्धेतील उपांत्य, अंतिम तसेच तिसऱ्या क्रमांकाचे सामने नवी मुंबईत होतील, तर कोलकता येथे उपांत्य लढत होणार आहे.
जागतिक फुटबॉल महासंघ परिषदेच्या ब्यूरोची बैठक झाली. त्यात लढतीची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. खरे तर ही स्पर्धा चार शहरातच होते; पण केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांनी ईशान्य राज्यांतील शहराचा आग्रह धरल्यामुळे गुवाहाटीचा समावेश करीत पाच शहरांत स्पर्धा झाली. त्यामुळे गुवाहाटीत केवळ साखळी लढत होतील, तर नवी मुंबईत केवळ बाद फेरीच्या लढती होतील. उपांत्यपूर्व (28 फेब्रुवारी) तसेच उपांत्य फेरीची (3 मार्च) प्रत्येकी एक तसेच तिसऱ्या क्रमांकाची, विजेतेपदाची अशा चार लढती होतील. उपांत्यपूर्व फेरीच्या लढती नवी मुंबईसह अहमदाबाद, कोलकता आणि भुवनेश्वर येथे होणार आहेत.

विश्वकरंडक महिला स्पर्धेपूर्वी

2023 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय जागतिक महासंघ 25 जूनला घेणार आहे. त्यापूर्वी या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींच्या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News