ऑनलाइन वर्ग भरतात; मग ऑनलाइन परीक्षा का नको?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाला आहेत.
  • त्यामुळे आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

मुंबई :-  अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाला आहेत. त्यामुळे आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र आणि दिल्ली येथील विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे; मात्र त्यांचा ऑनलाइन परीक्षेला नकार का, असा प्रश्‍नही विद्यापीठ अनुदान आयोगाने उपस्थित केला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. दिल्ली किंवा महाराष्ट्र सरकार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाहीत, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल, असा कोणताही निर्णय विद्यापीठ अनुदान आयोग घेणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्राला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्राचीही साथ मिळाली आहे. युवा सेनेने परीक्षा घेऊ नये, याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गृहमंत्रालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार मंत्रालयानेही परीक्षेस अनुकूलता दर्शवत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

सर्व विचार करूनच परवानगी!

परीक्षा घेण्यास आमची कोणतीही हरकत नसून काही सुरक्षा उपाययोजना करून परीक्षा घेण्यास आम्ही परवानगी दिल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने न्यायालयात स्पष्ट केले आहे. आयोगाला ही परवानगी देताना सर्व बाबींचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. यामुळे याविरोधात दाखल केलेली याचिका रद्द करावी, अशी विनंतीही केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News