आयआयटी मुंबईप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करा! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • दिल्लीतील स्मॉग टॉवर प्रकल्पातून माघार घेतल्याने आयआयटी मुंबईवर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी या प्रकल्पाच्या समन्वय करारावर आयआयटी मुंबईतर्फे लवकरच स्वाक्षरी करण्यात येईल.
  • तो सर्वांना बंधनकारक असेल, असे केंद्राच्या वतीने न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

नवी दिल्ली :- दिल्लीतील स्मॉग टॉवर प्रकल्पातून माघार घेतल्याने आयआयटी मुंबईवर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी या प्रकल्पाच्या समन्वय करारावर आयआयटी मुंबईतर्फे लवकरच स्वाक्षरी करण्यात येईल. तो सर्वांना बंधनकारक असेल, असे केंद्राच्या वतीने न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. याबाबत केंद्राने आयआयटी मुंबईसह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्य तांत्रिक सल्लागारांसह चर्चा केल्याचेही महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले.

गुरुवारी सुनावणीदरम्यान आयआयटी मुंबई, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य यंत्रणांसह करण्यात येणारा करार पटलावर ठेवावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच आम्ही कराराची तपासणी केल्यानंतर, प्रत्येकाची जबाबदारी निश्‍चित केल्यानंतर एखाद्याला प्रकल्पातून माघार घेता येईल का?, असा सवाल न्यायालयाने केंद्राला विचारला. यावर आयआयटी मुंबईच उत्तर देऊ शकले, असे तुषार मेहता यांनी सांगितले. यावरून केंद्राला धारेवर धरत याबाबतीत आणखी दिरंगाई करता येणार नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. बुधवारी सुनावणीवेळी या प्रकल्पातून आयआयटी मुंबईने माघार घेतल्याने केंद्रातर्फे सांगण्यात आले होते. त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत न्यायालयाने आयआयटी मुंबईवर कारवाईचा इशारा दिला होता.

प्रकल्प रखडल्याचे खापर आयआयटी मुंबईवर

आम्ही प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितला होता. तो पूर्ण का झाला नाही, असा प्रश्न न्यायमूर्ती मिश्रा यांनी केंद्राला विचारला. यावर प्रकल्पाचे आरेखन करण्यास दोन महिने, तांत्रिक बाबी पूर्ण करण्यास तीन महिने आणि प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीस दहा महिने लागतील, असे आयआयटी मुंबईने सांगितल्याचे मेहता यांनी सांगितले. मेहता यांनी तांत्रिक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या आड का लपून राहता. आमच्या आदेशाचे पालन केले नाही. तसेच ते करण्याचा हेतूही दिसत नाही, असे न्यायालयाने सुनावले. आता सोमवारी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा, असे न्यायालयाने सुनावले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News