एक लढा आमचाही-कोरोनाशी...   

निशा दळवी
Monday, 31 August 2020
  • हा अनुभव यासाठी शेअर करतेय कारण अजूनही आपल्या मनात कोरोना या आजाराबद्दल प्रचंड भीती, तणाव आहे.
  • अर्थात आजूबाजूचे बरे वाईट अनुभव बघून आणि ऐकून याची भिती अजूनच वाढते.

हा अनुभव यासाठी शेअर करतेय कारण अजूनही आपल्या मनात कोरोना या आजाराबद्दल प्रचंड भीती, तणाव आहे. अर्थात आजूबाजूचे बरे वाईट अनुभव बघून आणि ऐकून याची भिती अजूनच वाढते. परंतु आपली प्रतिकारशक्ती जर चांगली असेल आणि आपल्याला आधी कोणताही गंभीर आजार नसेल तर अगदी घरातल्या घरात क्वारंटाईन राहूनही आपण ठणठणीत बरे होऊ शकतो.

२७ जून, शनिवारी सकाळपासूनच माझे पती जगन्नाथ दळवी यांचे प्रचंड डोकं दुखायला सुरुवात झाली, अर्थात ती नॉर्मल डोकेदुखी नव्हतीच. थोडी शंका पण आलीच, कारण लॉकडाउनच्या ३ महिन्यांच्या कालावधीत मुरबाड येथे धान्य वाटपाचे काम करून, त्यांना ठाण्यात येऊन एक आठवडा ही पूर्ण झाला नव्हता. संध्याकाळी तापही आला. फॅमिली डॉक्टर ने ५ दिवसांच्या गोळ्या देऊन जर नाहीच बरे वाटले तर टेस्ट करण्याचा सल्ला दिला. आतापर्यंत या कोरोना या आजाराबद्दल जे जे काही वाचलं होतं त्यावरून माझ्या पतींना लक्षणं तर सगळी तीच होती हे मला समजलं होतं. डोळ्यांची जळजळ होणे, डोकेदुखी, ताप आणि खोकला ही लक्षण त्यांच्यात दिसत असल्याने मी त्यांना पहिल्या दिवसापासूनच बेडरूम मध्ये क्वारंटाईन केलं. काही झालं तरी हॉस्पिटलची पायरी चढायची नाही, असं मनोमन ठरवलं होतं. हा खर तर माझा अतिआत्मविश्वास होता, पण करणार काय, एकतर त्यावेळेस ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच होती, हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी खाटा मिळणे अवघड होते, त्यात मोठ्या हॉस्पिटल ची धडकी भरवणारी बिलं... एकंदरीत परिस्थिती खूपच भयावह होती. आमच्या घरी मी, माझे पती, आणि आमचा मुलगा ऋग्वेद आम्ही तिघचं राहत होतो. आमची तिघांचीही प्रतिकारशक्ती ही बऱ्यापैकी चांगली असल्याने घरातच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला.

माझं निष्पाप लेकरू ऋग्वेद याला तर कोरोना म्हणजे आगंतुक पाहुणाच वाटत होता. सतत, "अगं आई, इतके लोक कोरोनाचा अनुभव घेतात तर आपण पण घेऊयात, बघुयात तर खरं कसं वाटतंय ते.."असं बोलायचा माझं टेन्शन बघून. हे भगवान!!! ही हल्लीची पिढी, यांना कशात थ्रिल वाटेल  काही सांगता येत नाही. त्याचे हे मोलाचे शब्द कानी पडले की होती नव्हती ती सगळी पॉझीटीव्हीटी निघून जायची. 

सुदैवाने माझ्या मिस्टरांना दोनच दिवस ताप होता, सोमवार पासून ताप कमी झाला. जेवणही उत्तम जात होत त्यामुळे टेन्शन थोडं कमी झालं. पुढील तीन ते चार   दिवसानंतर मिस्टरांना बाकी तसा कुठलाच त्रास नव्हता पण त्यांचा खोकला मात्र वाढला होता. शरीरातील ऑक्सिजन पातळी अगदी योग्य होती त्यामुळे आठ दिवसानंतर केव्हाही अँटीबॉडी टेस्ट करून घ्या असे डॉक्टरांनी सांगितले. नऊ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अँटीबॉडी टेस्ट चा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. पण या दरम्यान डॉक्टरांनी नैतिक आधार दिला. कुठल्याही प्रकारे रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला न देता काही दिवस घरीच राहून योग्य आहार घ्या...घाबरायचं कारण नाही, तुम्ही आधीच बरे झाला आहात... असे सांगितल्याने खूप खूप बरे वाटले. अर्थात लक्षणं समजल्यानंतर, तीन ते चार दिवसांनी ताप उतरत नसेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र अंगावर काढू नका. डॉक्टरांचा अवश्य सल्ला घेऊन रुग्णालयात योग्य उपचार घ्या. या सर्व परिस्थितीत डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची राहते.

आमचे फॅमिली डॉक्टर, डॉ. शर्मा यांनी आम्हाला खरंच खूप मोलाचं सहकार्य केलं. लॉकडाउनच्या दरम्यान पण त्यांनी कधीच दवाखाना बंद ठेवला नाही. अँटीजन किट सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असल्याने आम्हाला फार कुठेच धावाधाव करावी लागली नाही. आमचा नुसता एक मेसेज वाचून भर पावसात ती टेस्ट करण्यासाठी ते धावून आले होते. डॉक्टरांच्या या कार्याला खरंच सलाम आणि मनःपूर्वक धन्यवाद...

या वीस दिवसांच्या कालावधीत आमचा कुणालाही त्रास होणार नाही किंवा आम्ही कोणाच्या संपर्कात येणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेतली होती. घरपोच डबे, नाष्टे अशी कोणतीही अपेक्षा नातेवाईकांकडून किंवा शेजाऱ्यांकडून न ठेवता स्वतः करा, खा आणि बरे व्हा या तत्त्वाच पालन करून अखेर कोरोना सोबतची ही लढाई आम्ही जिंकलो.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News