लढा ‘खलिस्तान’ विरुद्धचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

ऑपरेशन ब्लॅक थंडर 
ऑपरेशन ब्लॅक थंडर या मोहिमेचा पहिला टप्पा ३० एप्रिल १९८६, त्यानंतर दुसरा टप्पा ९ मे १९८८ रोजी राबवला. नॅशनल सिक्‍युरिटी  गार्डच्या ब्लॅक कॅट कमांडोंनी सुवर्णमंदिर परिसरातील शीख दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी ते राबवले होते. शीख दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ऑपरेशन मेटल, ऑपरेशन वूडरोझही राबवले गेले.

अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्णमंदिर (हरमंदिरसाहिब) येथे आश्रय घेतलेल्या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी १ ते ८ जून १९८४ या कालावधीत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले होते. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारने पंजाबमधील दहशतवाद, फुटिरतावादी चळवळ मोडीत काढली. तथापि, त्याची इतिहासात अनेक अर्थाने नोंद केली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच, ३१ ऑक्‍टोबर १९८४ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. 

का करावे लागले ऑपरेशन 
शिखांसाठी खलिस्तान (खालसाभूमी) या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना करण्याच्या हेतूने फुटिरतवाद्यांनी चळवळ सुरू केले. साधारण १९४०-५० दरम्यान सुरू झालेल्या या चळवळीने १९७०-८० मध्ये जोर पकडला होता, प्रभाव खूपच वाढला.

शीख फुटिरतवाद्यांचा नेता जर्नेलसिंग भिंद्रनवालेने यात उडी घेतली आणि ती अधिक फोफावली. १९८२ मध्ये त्याने फुटिरतावादी मागण्यांची तयारी केली. १९८३ च्या मध्याला त्या सादर केल्या, त्याला खूप प्रतिसाद लाभला. जुलै १९८२ मध्ये त्याने हरमंदिरसाहिबमध्ये तळ हलवला, अकाल तख्तवर ताबा मिळवला. तेथे शस्त्रास्त्रांचा साठाही केला. त्याला तेथून हाकलून लावण्यासाठीच ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले. 

खलिस्तानची ही चळवळ ऐंशीच्या दशकात खूपच फोफावली होती. पंजाबात दहशतवाद्यांचे थैमान होते. त्याला संपवण्यासाठी राबलेल्या या ऑपरेशनच्या दरम्यान ८३ जवान आणि ४९२ नागरिक मारले गेले. 

ऑपरेशन सनडाउन 
भिंद्रनवालेचा उपद्रव लक्षात घेऊन सुवर्णमंदिरातून त्यांना उचलून नेण्यासाठी इंदिरा गांधींच्या मनात ‘ऑपरेशन सनडाऊन’ची योजना होती. पण जीवितहानी टाळण्यासाठी ते रद्द करण्यात आले. 

ऑपरेशन ब्लॅक थंडर 
ऑपरेशन ब्लॅक थंडर या मोहिमेचा पहिला टप्पा ३० एप्रिल १९८६, त्यानंतर दुसरा टप्पा ९ मे १९८८ रोजी राबवला. नॅशनल सिक्‍युरिटी  गार्डच्या ब्लॅक कॅट कमांडोंनी सुवर्णमंदिर परिसरातील शीख दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी ते राबवले होते. शीख दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ऑपरेशन मेटल, ऑपरेशन वूडरोझही राबवले गेले.

‘ऑपरेशन’चा परिणाम 
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईने प्रचंड खळबळ माजली. यावेळी भिंद्रनवालेसह शेकडो लोक मारले गेले. सुवर्णमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठीच ते राबवले गेले. त्यानंतर, ३१ ऑक्‍टोबर १९८४ रोजी ऑपरेशन ब्लू स्टारला परवानगी देणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हत्या केली. त्या वेळचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही पुण्यात त्यानंतर हत्या करण्यात आली. 

घटनाक्रम : १९८४
१ जून : दुपारी १२.४० वाजता लष्कराच्या आदेशानुसार बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी गुरू रामदास लंगरच्या इमारतीमध्ये गोळीबार केला. यात आठ जणांचा मृत्यू. 
   

२ जून : निमलष्करी दलाकडून लष्कराने अमृतसरचा ताबा घेतला. भाविक असल्याचे सांगून एक तरुण शीख अधिकाऱ्याचा सुवर्ण मंदिरात प्रवेश. परिस्थितीचे निरीक्षण करून मोहिमेची आखणी. रात्रीनंतर माध्यमांना बंदी. पंजाबमधील सर्व प्रकारची वाहतूक बंद. पाणी आणि विद्युत पुरवठाही बंद. 
   

३ जून : रात्रीनंतर लष्कराने सुवर्ण मंदिराला वेढा घातला. 

४ जून :  लष्कराकडून कारवाईला सुरवात. गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा. भिंद्रनवालेबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न अयशस्वी. 
   

५ जून : सुवर्ण मंदिर परिसरात बाँबफेक. लष्कराकडून जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न. दहशतवाद्यांकडून छुपा हल्ला. 
संध्या. ७ ते रात्री १० : बीएसएफ आणि सीआरपीएफने मंदिर परिसरातील इमारतींवर ताबा मिळविला. 
रात्री १० ते सकाळी ७.३० : रात्री मुख्य भागावर ताबा मिळविण्याचे लष्कराचे प्रयत्न फसले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक जवान हुतात्मा. 
   

६ जून : विजयंता रणगाड्यांमधून अकाल तख्तवर मारा. इमारतीच्या काही भागाचे नुकसान. 
   

 ७ जून : लष्कराचा अकाल तख्तमध्ये प्रवेश. भिंद्रनवालेसह काही दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले. सुवर्ण मंदिरावर लष्कराचे नियंत्रण
८ ते १० जून : तळघरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बीमोड.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News