‘‘नां देडमधल्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात आम्ही काही विद्यार्थी गप्पा मारत उभे होतो. ते माझं कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं. प्रवेश घेऊन काहीच दिवस झाले होते. नवखेपणा अजून विरला नव्हता. वय जेमतेम सतरा वर्षं.
तेवढ्यात एक तिशीचा तरुण धावतच आमच्याजवळ आला. तो खूप घाबरलेला दिसत होता. त्यानं आल्या आल्या बोलायला सुरवात केली : ‘‘साब, मेरा नाम शकूर है... सुना है, यहाँ आयुर्वेद कालेज मे खून की बोतल मिलती है...मेरी छोटी सी तीन साल की बेटी सीरियस है... उसे खून की सख्त जरूरत है...’’
आणि तो बरंच काही बोलत राहिला.
‘‘ब्लड ग्रुप कौनसा है...?’’ मीही अधीरपणे विचारलं.
‘‘बी पॉझिटिव्ह.’’
‘‘अरे, ये तो मेरा भी ब्लड ग्रुप है! चलो, मैं देता हूँ आप की बेटी को खून।’’
तो तरुण जरासा आश्र्वस्त झाला तरी त्याची अस्वस्थता बराच वेळ कायम होती. मित्रांना तिथंच सोडून आणि पुढच्या तासाला दांडी मारून मी रक्त देण्यासाठी त्याच्यासोबत निघालो. कॉलेजपासून दहा मिनिटांच्या अंतरावर डॉक्टर भास्कर या बालरोगतज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. तिथं शकूरच्या कुटुंबातल्या तीन-चार महिला आणि दोन पुरुष जणू आमचीच वाट बघत उभे होते. मी आधी छोट्या सकीनाला बघितलं. ती बिछान्यावर निश्र्चल पडून होती. हिमोग्लोबिन साडेचारपर्यंत उतरलं होतं. गंभीरच होती ती. मरणासन्न अवस्थेत असलेल्या सकीनाला बघून मला गलबलून आलं. रक्त देण्याची प्रक्रिया त्वरित पार पडावी म्हणून मीही घाई करू लागलो. आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान करत होतो. थोडीशी भीतीही होतीच मनात. रक्तदानाविषयीचे गैरसमज माझ्याही मनात होतेच तेव्हा; पण आपल्या रक्तदानानं एका बालिकेचे प्राण वाचू शकतात याचं समाधान अधिक होतं.
मला बेडवर झोपवून हातात एक रबरी चेंडू देण्यात आला आणि सुरू झाली रक्त काढून घेण्याची प्रक्रिया. आपल्याच रक्ताच्या ४०० मिलिलिटरची ती बाटली मी पहिल्यांदाच बघत होतो. तोही अनुभव अपूर्वच होता! मात्र हेच रक्त एका चिमुकलीचे प्राण वाचवणार आहेत याचा आनंद कितीतरी पटींनी अधिक होता.
अखेर संपूर्ण प्रक्रिया पार पडली. मला ‘पार्ले’ची चार बिस्किटं आणि चहा देण्यात आला. इतक्या सन्मानानं यापूर्वी मला कुणी चहा दिला नव्हता. आपण रक्त दिलंय या अभिमानानं मन भरून आलं होतं. दहा मिनिटं विश्रांती घेऊन मी बाहेर पडलो.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेलो. एव्हाना रक्तदानाच्या फुशारकीचा बहर जरासा ओसरला होता. मधल्या सुटीत पुन्हा आम्ही मित्रमंडळी कॉलेजच्या प्रांगणात गप्पा मारत उभे होतो. तेवढ्यात मागून कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मागं वळून पाहतो तर हातात मिठाईचा डबा घेतलेला शकूर उभा! त्याच्या चेहऱ्यावर आनंद, आदर, ममत्व ओसंडून वाहत होतं. त्यानं वाकून माझे पाय धरले. त्याचे डोळे पाणावले.
‘‘डॉक्टरसाब, जुग जुग जिओ। आप ने मेरी बच्ची को बचा लिया. वरना...’’
त्याचे डोळे पुसून मी त्याला छातीशी धरलं.
‘‘मैं ने तो मेरा इन्सानियत का फर्ज निभाया शकूरभाई.’’
दाटून आलं होतं मला. मात्र, मी मनोमन सुखावलो होतो. सकीना वाचली होती.
माझ्या ४०० मिलिलिटर रक्तानं एका बालिकेला जीवदान दिलं होतं.
बस्स! त्या दिवशीपासून ठरवलं, रक्तदान करायचंच!’’
डॉ. सुरेश हनमंते (संपर्कक्रमांक : ९४२२१ ७०४४०) सांगत होते आणि मी त्यांचं बोलणं एकाग्रचित्तानं ऐकत होतो.
डॉ. सुरेश हे माझे मामा डॉ. अवधूत निरगुडे यांचे वर्गमित्र. मामा नेहमीच डॉ. हनमंतेंबद्दल बोलायचे. त्यांच्या ‘रक्तदान मिशन’विषयी सांगायचे. गेल्या आठवड्यात नांदेडला गेलो तेव्हा अवधूतमामांनी डॉ. हनमंते यांच्या अनोख्या विक्रमाबद्दल मला सांगितलं आणि मी चकितच झालो!
येत्या ११ ऑगस्ट रोजी डॉ. हनमंते त्यांच्या रक्तदानाचं शतक पूर्ण करणार आहेत, अशीही माहिती मामांनी मला दिली.
‘‘शंभर वेळा रक्तदान? त्यांचं वय किती आहे?’’ मी कुतूहलानं विचारलं.
मामांनीही मित्राबद्दलच्या अभिमानानं भारलेल्या आवाजात सांगितलं : ‘‘अरे, डॉ. सुरेश ११ ऑगस्ट रोजी वयाची ५० वर्षं पूर्ण करत आहेत.’’
पन्नासाव्या वर्षी १०० वेळा रक्तदान करणारे डॉ. हनमंते मला अजबच वाटले! मुळात रक्तदान करायला १८ वर्षं पूर्ण असावी लागतात अणि दोन रक्तदानांत किमान ९० दिवसांचं अंतर असावं लागतं. म्हणजे हिशेब केला तर वर्षातून चारच वेळा रक्तदान करता येतं. शिवाय, प्रत्येकदा म्हणजे नेमानं नव्वदाव्या दिवशी रक्तदान केलेलं असेल अशीही शक्यता नाही. आजारपण, वैयक्तिक किंवा इतरही कारणांनी खाडे झाले असतीलच. चार-सहा वर्षं माग-पुढं असली तरी डॉ. हनमंते काय वयाच्या अठराव्या-विसाव्या वर्षापासून सातत्यानं रक्तदान करत आले आहेत...? ...माझ्या मनात विचार येऊन गेला.
केवळ डॉ. हनमंते यांना भेटण्यासाठी मी पुणे गाठलं. अर्थात माझ्या येण्याची पूर्वकल्पना त्यांना दिली होती. त्यांच्या पहिल्या रक्तदानाचा किस्सा ऐकत बसलो आणि हातातला चहाचा कप हातातच राहून गेला. गार झालेला चहा वर्षावहिनींनी पुन्हा गरम करून दिला. सतराव्या वर्षापासून न विसरता डॉ. हनमंते रक्तदान करत आहेत.
डॉ. हनमंते सांगू लागले :
‘‘सन १९८६ पासून मी रक्तदान करत आहे. ज्या वर्षी मी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला त्या वर्षीपासून ते आजतागायत रक्तदानाचं माझं कार्य अव्याहतपणे सुरूच आहे. त्या वेळी नांदेडमध्ये खासगी रक्तपेढी नव्हती. केवळ शासकीय रुग्णालयातच रक्तपेढी कार्यरत होती. रक्ताची गरज भासली तर आमच्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर तशी सूचना झळकत असे. संबंधित डॉक्टरचा फोन क्रमांक त्यावर असे. गरजू लोक सातत्यानं रक्तासाठी येत. मोठ्या आशेनं ते रक्तासाठी रुग्णालयात हिंडत असत. त्यांची ही तळमळ आणि तगमग पाहून काळीज पिळवटून निघे. मी तेव्हा निश्चय केला आणि गरजूंना तत्काळ रक्तपुरवठा व्हावा यासाठी माझ्या कॉलेजमधल्या मित्रांचा एक ग्रूप तयार त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केलं. त्याच काळात नांदेड शहरात ‘रेडक्रॉस’ सोसायटीची स्थापना झाली. रक्तदानाच्या चळवळीला त्यामुळे शहरात गती मिळाली. रेडक्रॉसकडून रक्तदानाची सातत्यानं माहिती मिळायची. वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध व्हायचे.
त्यानंतर रेडक्रॉसनं ‘जिल्हा रक्तदान समिती’ची स्थापना केली. त्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष सिव्हिल सर्जन असायचे. मी स्वतःहून त्या समितीचं सदस्यत्व स्वीकारलं. रक्तदानप्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतली. विविध कॅम्प्समध्ये भाग घेतला. काही कॅम्प्स स्वतः आयोजित केले. नांदेडचे स्थानिक डॉक्टर डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ. मोतेवार, डॉ. पी. डी. जोशी, पाटोदेकर, डॉ. हुंडीवाला, श्रीमती केटीबेन मेवावाला आदींनी रक्तदानाची चळवळ नांदेडमध्ये उभी केली.
हे सर्व करत असताना मला एक बाब सातत्यानं खटकत होती. रक्तदानाबद्दल सामान्य लोकांमध्ये असलेला गैरसमज कसा दूर करायचा? लोकांमध्ये जाऊन थेट काम करण्यासाठी आपण स्वतंत्र रक्तदान लोकचळवळ उभारावी काय असाही एक विचार मनात येऊन गेला.
त्यांना मध्येच थांबवून मी विचारलं : ‘‘रक्तदानाबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. तुम्हाला तर अनेकदा अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असेल. एखादा अनुभव सांगा...’’
काही तरी आठवल्यासारखं करून डॉ. हनमंते मनाशीच हसले.
‘‘सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४०-४२ वर्षांची एक महिला दाखल होती. गर्भाशयाची शस्त्रक्रिया (हिस्टरेक्टॉमी) करणं अत्यावश्यक होतं. तिचं हिमोग्लोबिन साडेपाच-सहा एवढं उतरलं होतं. नवरा सोबत होताच, पन्नाशीच्या आतलाच असावा. बाई सेमीकोमात होती. शस्त्रक्रियेसाठी रक्ताच्या दोन ते तीन बाटल्यांची आवश्यकता होती. तिचा रक्तगट ‘बी पॉझिटीव्ह’ होता. तिच्या नवऱ्याचाही तोच रक्तगट होता. डॉक्टरांनी नवऱ्याला रक्तदानाचा सल्ला दिला. तोच ती मलूल पडलेली ती बाई उठून बसली आणि म्हणाली : ‘‘जीव गेला तरी चालेल; पण नवऱ्याचे रक्त नको.’’ आम्ही सारे हैराण झालो. हिला का नकोय नवऱ्याचं रक्त? ती लगेच म्हणाली : ‘‘त्यांना रक्त दिल्यानं कमजोरी येईल. कृपया त्यांचं रक्त घेऊ नका.’’
नवराही रक्त देण्यासाठी फारसा उत्सुक नव्हताच. मात्र, प्रश्न त्या महिलेच्या जिवाचा होता. अखेर मी रक्त दिलं. आणखी बाहेरून दोन बाटल्या आणाव्या लागल्या. या वेळी रक्त देताना मला विशेष काळजी वाटत होती. कारण, याआधी रक्त देऊन मला ८२ दिवसच झाले होते. दोन रक्तदानांत किमान तीन महिन्यांचा अवधी असायलाच हवा. मी तर स्वतः डॉक्टर. मला याची पुरेपूर जाणीव होती. तरी जोखीम घेऊन मी रक्त दिलं.’’
‘‘ऑपरेशन झालं का तिचं सफल?’’ मी मध्येच विचारलं.
डॉक्टर हसले.
‘‘हो. ऑपरेशन झालं नीटनेटकं. दुसऱ्या दिवशी नवरेबुवा आले पेढे घेऊन. म्हणाले : ‘‘तुमच्यामुळे माझी बायको वाचली.’’ ते पेढे मी तसेच ठेवून दिले. रक्तदानाविषयीच्या गैरसमजुतीचा कडवटपणा मनात ठेवून मला ते पेढे कसे गोड लागले असते?’’ त्यांचा हा अनुभव ऐकून मी सुन्न झालो. नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात मीही अशाच एका प्रसंगाला तोंड दिलं होतं. ‘बायकोला रक्त द्या’ असं सांगताच एक पतीमहाशय चक्क पळून गेले होते. मग आम्ही काही मित्रांनी रक्त देऊन त्या महिलेचे प्राण वाचवले होते.
‘रक्त विकत आणा, आम्ही त्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार आहोत; पण आमचं रक्त घेऊ नका...’ अशी विनंती करणारी कितीतरी माणसं मी पाहिली आहेत...डॉक्टर जरासे खिन्न झाले होते.
रक्तदानासाठी खासगी, शासकीय आणि कॉर्पोरेट पातळीवर अतोनात प्रयत्न होत असताना आजही असे अनुभव येतात. यामुळे मोठं नैराश्य येतं. अनेक ठिकाणी चाललेला रक्ताचा बाजार आहेच आहे.
या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. हनमंते यांचं काम थांबलेलं नाहीये. कॉलेजमध्ये असताना आणि तिथून बाहेर पडल्यावरही रक्तदानाचं त्यांचं काम अव्याहतपणे सुरू आहे. कॉलेजमध्ये असताना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन’चं अध्यक्षपद भूषवतानाच रक्तदानाची चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. सातत्यानं रक्तदान शिबिरं, औषधवाटप, एनएसएसचे कॅम्प्स, कॉन्फरन्सेस, राज्य पातळीवरील वादविवाद स्पर्धांचं आयोजन करून त्यांनी रक्तदान हा विषय आपल्या आयुष्याशी कायमचा बांधून घेतला आहे.
मुलांचं शिक्षण आणि रक्तदानप्रसाराच्या काही नव्या संकल्पना राबवण्याच्या उद्देशानं दहा वर्षांपूर्वी डॉ. हनमंते यांनी नांदेड सोडून पुणे गाठलं. ठरल्यानुसार तिथं त्यांनी आपल्या कामाचा व्याप वाढवला आहे. पुण्यात विविध महाविद्यालयांत आणि संस्थांमध्ये ते व्याख्यानं देतात. रक्तदान ही चळवळ मनामनात रुजली पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू आहेत. पोटासाठी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहेच. पत्नी डॉ. वर्षा यांनीसुद्धा आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे; पण रक्तदानाच्या प्रसाराच्या कामात दोघांनीही स्वतःला झोकून दिलं आहे.
‘‘डॉक्टर, तुमच्याशी किती तरी लोकांचं रक्ताचं नातं आहे. कारण, Blood Donation is blood relation. चला, मीही या आपल्या नात्याची सुरवात रक्त देऊनच करतो. येत्या शिबिरात तुम्ही मलाही सहभागी करून घ्या,’’ मी म्हणालो.
डॉ. सुरेश हनमंतेंचा निरोप घेताना त्यांना मी वाकून नमस्कार केला. कारण, हनमंते हे मला विज्ञानवादी चळवळीचे जनक वाटत होते. त्यांच्या घरी भिंतींवर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या तसबिरीपुढं मी हात जोडून वाकलो. प्रतिमा आणि प्रतिभेच्या या संयोगाला मी एकत्रित नमन केलं आणि बाहेर पडलो. विचार खूप डोक्यात होते; पण मनात सतत घुमणारा विचार होता : आपण लवकरात लवकर रक्तदान करायचंय...!