एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • हल्लेखोर आणि तरुणी दोघांनाही गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंधेरी : एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पश्‍चिम उपनगरातील खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. 26) घडली. हल्ल्यानंतर माथेफिरू तरुणानेदेखील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर आणि तरुणी दोघांनाही गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खार पोलिसांनी हल्लेखोर तरुण मोहम्मद जहांगीर फारुख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपी मोहम्मद जहांगीर फारुख हा मूळचा झारखंड राज्यातील आहे, तर गंभीर जखमी तरुणी उत्तराखंड राज्यातील आहे. ती खार परिसरात कुटुंबासह राहत असून घरकाम करते. दोन महिन्यांपूर्वी आरोपी हल्लेखोर मोहम्मद जहांगीर फारुख याने तरुणीला मागणी घातली होती. त्याला तरुणीने नकार दिल्याने आरोपी मोहम्मदने रविवारी खार येथील इएम इस्टेट येथे तरुणीला गाठून तिच्यावर चाकूने डोक्‍यावर आणि पोटावर वार केले. त्यानंतर गंभीर अवस्थेतही तरुणीने झटका देत आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली व घराकडे पळाली.

हल्ल्यानंतर आरोपी मोहम्मदने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी दोन्ही जखमींना सायनच्या शीव रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी जीवघेणा हल्लाप्रकरणी मोहम्मद जहांगीर याच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येईल, अशी माहिती खार पोलिसांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News