सेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी

प्रा. रेणुका घोसपूरकर
Tuesday, 13 October 2020

फॅशनच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात... किती मिळतील हे तुमच्या स्किल्स आणि फॅशन सेन्सवर अवलंबून आहे. पण भारतामध्ये सरासरीचा विचार केला तर पर्सनल स्टायलिस्टला पंधरा ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दरमहा पैसे मिळू शकतात. नोकरीच्या पर्यायाव्यतिरिक्त तुम्ही म्युझिक व्हीडिओपासून ते जाहिरातींपर्यंत आणि टीव्ही शोपासून चित्रपटांपर्यंत अशा अनेक ठिकाणी काम करू शकता.

सेलिब्रिटींबरोबर इश्टाईलमध्ये काम करायचंय... जाणून घ्या काय आहेत संधी

- रेणुका घोसपुरकर

लेखिका या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नाॅलाॅजीच्या विभाग प्रमुख आहेत

कपड्यांवरून एखाद्याची ओळख, व्यक्तिमत्व ठरतं का याबद्दल अनेक वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात... पण आपल्या आवडी-निवडीनुसार एखाद्याने कपडे घालावेत असे कुणाला वाटत नाही... त्यात जर कोणत्या सेलिब्रिटीने घालावयाचे कपडे जर आपण ठरवू लागलो तर? मनीष मल्होत्रा, रिया कपूर, सब्यसाची मुखर्जी ही नावं आपण ऐकली असेलच... ते ठरवतील ती फॅशन असं चित्र सध्या आहे... पण त्यांच्यासारखीच तुम्हालाही फॅशन स्टायलिस्ट बनून ट्रेंड निर्माण करण्याची संधी आहे. आणि हो, सेलिब्रिटी म्हटलं की फक्त बाॅलीवूडमधले अॅक्टर असं नव्हे तर विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींनाही त्यांची स्वतःची फॅशन स्टेटमेंट करायला आवडतं... त्यामुळे फॅशन स्टायलिस्ट व्हायचं म्हणजे थेट बाॅलीवूड गाठायचं असं नाही!

फॅशन स्टायलिस्ट हे कोणत्याही व्यक्तीसाठी, फॅशन हाऊस आणि फॅशन ब्रँड्ससाठी काम करतात. फॅशनविषयी सुचविणे, माॅडेल्ससाठी फोटोशूटमध्ये आणि फिल्म, टेलिव्हिजनसाठी अॅक्टर्सच्या दृष्टीने योग्य कपडे निवडणे व त्याचा समन्वय साधणे, तसेच त्या कपड्यांवर शोभून दिसेल असे अन्य प्राॅप्स आणि अॅक्ससेरिजची निवड करणे हे फॅशन स्टायलिस्टचे काम असते.

फॅशन हे क्षेत्र एकदम डायनॅमिक आहे... कायम बदलत राहणारे... फॅशन स्टायलिस्ट म्हणून करिअर करण्याची संधी ही तुम्हाला बहुतांश मोठ्या शहरांमध्येच मिळू शकते. तेही अशा शहरांमध्ये जिथे डिझाईन, फिल्म आणि कला क्षेत्रातील गट, संस्था कार्यरत आहेत. या व्यतिरिक्तही ज्यांना कपडे आणि कपड्यांच्या मदतीने भन्नाट व्हिज्युअल्स निर्माण करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी फॅशन स्टायलिस्ट हे उत्तम करिअर असू शकते.

फॅशन स्टायलिस्ट होण्यासाठी काय करावं

भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यापीठांमध्ये स्टायलिंग या क्षेत्रातील कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. आपल्या देशात अनेक काॅलेजमध्ये बीएससी किंवा बीवोक फॅशन डिझाईन कोर्स उपलब्ध आहेत. तुमच्या फॅशन डिझाईन स्किल्स सुधारण्यासाठी या कोर्सेसचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या वरिष्ठ व्यक्ती किंवा फॅशन डिझायनरच्या हाताखाली काम करू शकता किंवा प्रशिक्षण घेऊ शकता.

फॅशन स्टायलिस्ट होण्यासाठी आवश्यक स्किल्स

 • फॅशन ट्रेंड्सचे नाॅलेज असावे
 • कलर स्किम्स
 • डिझायनर लेबल्स
 • कलेसंबंधी जाण
 • डिझाईन व फॅशनचा इतिहास
 • विविध प्रकारच्या शारीरिक रचनेची माहिती
 • कपडे घालण्याची व सगळ्यात उठून कसे दिसेल याची सर्वात भारी पद्धत माहिती असावी.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅशनच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात... किती मिळतील हे तुमच्या स्किल्स आणि फॅशन सेन्सवर अवलंबून आहे. पण भारतामध्ये सरासरीचा विचार केला तर पर्सनल स्टायलिस्टला पंधरा ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दरमहा पैसे मिळू शकतात. नोकरीच्या पर्यायाव्यतिरिक्त तुम्ही म्युझिक व्हीडिओपासून ते जाहिरातींपर्यंत आणि टीव्ही शोपासून चित्रपटांपर्यंत अशा अनेक ठिकाणी काम करू शकता.

फॅशन स्टायलिस्टची जबाबदारी

 • टीव्ही शो, चित्रपट, म्युझिक व्हीडिओ, काॅन्सर्ट, जाहिराती व संपादकीय लेखांसाठी कपडे व अन्य साहित्याची निवड करणे
 • डिझायनर्स, टेलर्स, माॅडेल्स, फोटोग्राफर्स, हेअर व मेकअप आर्टिस्ट, दुकानदार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, जाहिरात क्षेत्रातील व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणे व काम करणे
 • सेलिब्रिटींसाठी विशिष्ट चांगली प्रतिमा (इमेज) तयार करणे
 • फॅब्रिक्स, कपड्यांची निर्मिती आणि फॅशन अॅक्ससेरिजबाबत अभ्यास व संशोधन करणे
 • फॅशन शोमध्ये उपस्थित राहणे
 • फॅशन ट्रेंड्स ओळखता येणे व नव्या ट्रेंडविषयी भाकित करता येणे
 • जगभरातून आलेल्या कपड्यांच्या प्रकाराची माहिती असणे
 • कामासंदर्भात प्रोफेशनल नेटवर्क निर्माण करणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News