फॅशन म्हणजे साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • हिंदी चित्रपटांमधील त्या काळची सर्वांत गाजलेली व आजही टिकून असलेली फॅशन म्हणजे साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज.
  • सण-समारंभांमध्ये काठपदराची साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज ही हिट फॅशन आहे.

हिंदी चित्रपटांमधील त्या काळची सर्वांत गाजलेली व आजही टिकून असलेली फॅशन म्हणजे साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज. आजही सण-समारंभांमध्ये काठपदराची साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज ही हिट फॅशन आहे.

चाळिशीच्या दशकात देशाला स्वतंत्र भारत चळवळीने झपाटून टाकलं होतं. खादी कपड्यांचा प्रसार त्या वेळच्या नेत्यांप्रमाणेच सामान्य नागरिकांतही वाढत होता. एकीकडे शहरी उच्चशिक्षित समाजात विदेशी फॅशन्स रुजत होत्या; तर दुसरीकडे स्वदेशीच्या नाऱ्याने देशात खादी आणि इतर भारतीय कपड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातील सिनेमांमधूनही तत्कालीन परिस्थितीचं प्रतिबिंब उमटताना दिसत होतं.

देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमांचं प्रमाण या काळात जास्त होता. पौराणिक चित्रपट वगळता भारतीयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांवर अधिक भर होता. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत बोलायचं तर तत्कालीन समाजात वापरले जाणारे कपडे आणि दागिने सिनेमांमध्येही दिसत असतं. याच कालावधीत बेगम पारा यांनी घातलेला स्कर्ट आणि क्रॉप टॉप चर्चेत आला होता. १९४९ मध्ये आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात अभिनेत्री नर्गिस यांनी पाश्‍चिमात्य कपडेदेखील वापरले होते. अशा काही मोजक्‍या घटना वगळता सिनेमातील फॅशन विश्‍वाचा जनसामान्यांवर फारसा प्रभाव पडलेला दिसत नव्हता.

एखाद्या सिनेमात वापरले गेलेले वेगळे कपडे चर्चेचा विषय असायचे, पण ते लोकांमध्ये फारसे रुजले जात नव्हते. त्या एकतर या वेगळ्या फॅशनचं प्रमाण अगदी नगण्य तर होतचं; पण दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या तुलनेत त्या काळातील बदलाचा वेग फारच कमी होता. आज चित्रपटात, मालिकांमध्ये दिसणारी फॅशन दुसऱ्या दिवशी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते. त्यामुळे फॅशन विश्‍वात सिनेमातील कलाकार आणि सर्वसामान्य माणूस यात फारस अंतर दिसून येत नाही. 

स्त्रियांच्या पेहरावामध्ये साडी ही कायमच भारतीय स्त्रियांची पहिली पसंती राहलीय. हिंदी सिनेमा जगतातदेखील साडी हाच भारतीय पोषाख विशेष लोकप्रिय होता. ब्लाऊजच्या मात्र अनेक फॅशन्स त्या काळातदेखील पहायला मिळत होत्या. गोल गळा, चौकोनी गळा, कॉलरवाले, बंद गळ्याचे अशा अनेक प्रकारच्या ब्लाऊजची फॅशन सुरू झाली होती. शहरी भागात सिनेमामधल्या अभिनेत्रींनी ब्लाऊजच्या केलेल्या फॅशन लोकप्रिय झाल्या होत्या. १९४६ मध्ये आलेल्या ‘अनमोल घडी’ या चित्रपटात अभिनेत्री नूरजहान हिने घातलेल्या चौकोनी गळ्याच्या ब्लाऊजची फॅशन हिट झाली होती. अगदी पन्नाशीच्या दशकातही ही फॅशन लोकप्रिय ठरली होती.

िचत्रपटांमधली त्या काळची सर्वांत गाजलेली आणि आजही टिकून असलेली फॅशन म्हणजे साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज. आजही सणासमारंभांमध्ये काठपदराची साडी आणि फुग्या हातांचे ब्लाऊज ही हिट फॅशन आहे. ब्लाऊजच्या फॅशनमध्ये आजवर शेकडो प्रकार आले आणि गेले; पण त्यातले मोजकेच प्रकार टिकून राहिले. त्यातील एक म्हणजे फुग्या हातांचे ब्लाऊज. चाळिशीच्या दशकातली ही हिट फॅशन साठीतही पुन्हा पहायला मिळाली. त्यानंतरही नवी फॅशन म्हणून हे ब्लाऊज काही वर्षांच्या गॅपने येतच राहिले. अलीकडे बाहुबलीतल्या देवसेनेने ही फॅशन पुन्हा एकदा टॉपवर नेऊन ठेवली. सिनेमातील अनेक दृष्यांमध्ये भरजरी साड्यांमधल्या देवसेनेला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्याचप्रमाणे तिच्या साड्या आणि फुग्या हाताचे ब्लाऊजही अतिशय लोकप्रिय ठरले. सिनेमांमधून जनसामान्यात फॅशन यायला अवघ्या काही तासांचा अवधी सध्या पुरेसा ठरतो. त्यानुसार देवसेना साडी आणि ब्लाऊज हिट ट्रेंड ठरले.

 प्रत्येक प्रांताच्या संस्कृतीनुसार साडी नेसण्याची पद्धत वेगवेगळी होती. महाराष्ट्रीय नउवारी, गुजराथी साडी, साऊथ इंडियन साड्या अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांची फॅशन सिनेमांद्वारे सामान्य लोकांपर्यत पोचत होत्या. काही काळाने म्हणजे दशकाच्या शेवटी पुरुषांच्या कपड्यामंध्ये पाश्‍चिमात्य कपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. शर्ट, पॅन्ट हा पोशाख दैनंदिन वापरात यायला लागला. सिनेमामुळे ही फॅशन ग्रामीण भागातही पोचू लागली होती.  पन्नाशीच्या दशकापासून खऱ्या अर्थाने बॉलिवूड म्हणजे हिंदी चित्रपटाचा भारतीय फॅशन विश्‍वावर मोठा प्रभाव पडला. राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी हे कलाकार त्या काळचे फॅशन आयकॉन होते. 

मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी
सरपे लाल टोपी रुसी,  फिर भी दिल है हिंदुस्थानी
१९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातील हे गाणं म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय फॅशन विश्‍वाचं चित्रण होतं. कापड व्यवसायातील आयात-निर्यातीने जसा वेग घेतला, तसतसा भारतीय विश्‍वात पाश्‍चिमात्य फॅशनचा बोलबोला वाढत गेला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News