शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या कंपन्यांना धडा शिकवणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • उद्धव ठाकरे यांचा जालन्यात इशारा

जालना : राज्यात पीकविमा योजनेसाठी नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांनी गावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा रक्कम मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना आता सरळ करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. विम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी पक्षाच्या मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या.

साळेगाव (ता. जालना) येथील चारा छावणीची पाहणी, संवाद आणि छावणीत वस्तीला असलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी (ता. ९) झाला, त्या वेळी ठाकरे बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत जनतेची मते, आशीर्वाद घेऊन मोकळा झालेलो नाही. दुष्काळात जनतेला आधार देण्याची जबाबदारी पार पाडण्याचे ओझे माझ्यावर आहे. दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे.’’

जालना जिल्ह्यातील ३२ छावण्यांत मुक्कामी असलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सहा शेतकरी महिलांना अन्नधान्य देण्यात आले.

मराठवाड्यातून दुष्काळ हद्दपार करणार
मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मराठवाड्यातील अकरा धरणे पाइपलाइनने जोडण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे ठाकरे म्हणाले. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद निसटू देणार नाही
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे दुर्दैवाने पडले. त्यांचा हा एकट्याचा पराभव नसून माझाही आहे. औरंगाबाद हातातून निसटू देणार नाही, तेथे पुन्हा भगवा फडकवणारच, असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News