परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जात मुदत वाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

मुंबई :- आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता हे विद्यार्थी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या आगोदर ही मुदत १४ ऑगस्टपर्यंत होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत, अशा सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतचा गोंधळही संपुष्टात आणला आहे.

दरम्यान, २८ ऑगस्ट २०२० पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत, असे मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News