अशी मिळवा थकव्यापासून मुक्तता..!

डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ
Monday, 17 June 2019

थकवा ही सर्वसाधारण समस्या गरोदर महिलांना भेडसावत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रेग्नंसीमध्ये अत्यंत जलदगतीने प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सची निर्मिती आणि दुसरे कारण म्हणजे ऊर्जेचा समतोल बिघडल्यामुळे व त्याचबरोबर ऊर्जेचा पुरवठा व आवश्‍यकता याचा ताळमेळ चुकल्यामुळे. तीन प्रकारे थकव्याची मीमांसा करता येते.

थकवा ही सर्वसाधारण समस्या गरोदर महिलांना भेडसावत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रेग्नंसीमध्ये अत्यंत जलदगतीने प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सची निर्मिती आणि दुसरे कारण म्हणजे ऊर्जेचा समतोल बिघडल्यामुळे व त्याचबरोबर ऊर्जेचा पुरवठा व आवश्‍यकता याचा ताळमेळ चुकल्यामुळे. तीन प्रकारे थकव्याची मीमांसा करता येते. एक शारीरिक, दुसरे भावनिक आणि तिसरे म्हणजे कार्यक्षमता. शारीरिक थकवा कंटाळा येणे, गळून जाणे या स्वरूपात असू शकतो. भावनिक थकवा हा काळजी वाटणे अथवा नर्व्हसपणा येणे या प्रकारात मोडतो आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नसेल अथवा कोणतेही कार्य करण्यासाठी अंतर्मनातून इच्छा होत नसेल तर तो थकवा तिसऱ्या प्रकारात मोडतो.

याचप्रकारे बाळंतपणानंतर महिलांना याचा अनुभव येऊ शकतो आणि तो आठ टक्के डिलिव्हरीनंतर २ ते ३ वर्षांत आणि पाच टक्के नंतरच्या ३ ते ४ वर्षांत जाणवतो, असे इंडियन न्यूट्रिशन आणि लाइफस्टाइल या संशोधन नियतकालिकाने निदर्शनास आणून दिले आहे. देशातील शहरी भागात पाहणी करून हे निष्कर्ष नोंदवले आहेत. बाळंतपणानंतर येणारा थकवा हा प्रामुख्याने आईच्या स्वास्थ्यावर, रोजच्या दैनंदिन कार्यावर आणि आई; तसेच बाळाच्या संगोपनावर प्रचंड प्रमाणात फरक घडवितो. मातृत्व प्राप्त झालेल्या जगभरातील स्त्रियांचा आढावा घेता, असे लक्षात येते की, भारतात २५ टक्के स्त्रियांना या अनिष्ट थकव्याची समस्या असू शकते. जपान, ऑस्ट्रेलिया आणि कोरिया या देशांत याचे प्रमाण खूप जास्त म्हणजे ६५ ते ८२ टक्के आहे. सर्वांत कमी प्रमाण नेदरलॅंडमध्ये म्हणजे १८ टक्के दिसून आले. कदाचित भारत आणि नेदरलॅंड या देशात कौटुंबिक व सामाजिक पाठिंबा उत्कृष्ट असल्यामुळे हे प्रमाण कमी असावे.

स्त्रियांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीच्या अलीकडील आणि नंतरचा कालावधी. हा कालावधी तारेवरची कसरत असते. एकीकडे उतारवयाची धास्ती आणि दुसरीकडे हॉर्मोन्सच्या कमतरतेमुळे होणारी भावनिक उलथापालथ. यामुळे या वयात स्त्रियांना थकवा जाणवण्याची खूप शक्‍यता असते. सुमारे ८५ टक्के रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांना हा त्रास जाणवतो.

थकवा जाणवण्याची शास्त्रीय कारणे योग्यप्रकारे हाताळल्यास यावर मात करू शकतो. प्रथमतः डॉक्‍टरी सल्ला घेऊन आपल्याला येणाऱ्या थकव्याची कारणमीमांसा करणे योग्य राहील. उदा : रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून आपणास मधुमेह, थायरॉईड, हृदयरोग, ॲनिमिया यासारखे आजार तर नाहीत ना, हे जाणून घेणे. त्यावर तातडीने उपचार करून घेणे हितावह ठरते.

काही पथ्ये पाळल्यास फायदा होतो. म्हणजे, चौरस आहार घेणे, वेळी-अवेळी अन्न न ग्रहण करणे, आहारात तंतुमय आणि सत्वयुक्त पदार्थ, भाज्यांचा समावेश करणे, पाणी भरपूर पिणे याची दक्षता घेणे. काही पदार्थ खाल्ल्यावर शरीरात साखर लगेच वाढते आणि थोड्या वेळात साखरेची पातळी एकदम कमी होऊन थकवा जाणवतो व झोप येते. काही पदार्थांची ॲलर्जी असल्यास ते पचनास त्रासदायक होतात व त्यामुळेही थकवा जाणवतो. लोह, बी-१२, जीवनसत्त्वाची कमतरता ही थकव्यास कारणीभूत असतात.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News