‘हाउज द जोश’ म्हणत तरुणाईत संचारला उत्साह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

स्पर्धा परीक्षांपासून तर व्यवसाय-उद्योगांसह कृषिक्षेत्रात यशस्वी होण्याचा मंत्र व त्यापलीकडे जाऊन आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी हव्या असणाऱ्या गुणांची जाणीव तरुणाईला मिळाली.

नाशिक - स्पर्धा परीक्षांपासून तर व्यवसाय-उद्योगांसह कृषिक्षेत्रात यशस्वी होण्याचा मंत्र व त्यापलीकडे जाऊन आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी हव्या असणाऱ्या गुणांची जाणीव तरुणाईला मिळाली. व्यक्‍तिमत्त्व खुलविणाऱ्या ‘यिन समर यूथ समीट’मध्ये रविवारी (ता. ९) दुसऱ्या दिवशी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्‍त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह बारामती ॲग्रो लिमिटेडचे सीईओ रोहित पवार यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. ‘भारतमाता की जय’, ‘वंदेमातरम्‌’, ‘हाउज द जोश’, ‘हाय सर’चा नारा देताना आत्मविश्‍वासाने संचारलेली तरुणाईच्या पंखांना बळ मिळाले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्यातर्फे झालेल्या ‘यिन समर यूथ समीट-२०१९’च्या रविवारी दुसऱ्या दिवशी विविध सत्रांतून सहभागींमध्ये उत्साह संचारला होता. जीवनात यशस्वी होण्याची नवी उमेद डोळ्यात घेऊन समीटच्या समारोप कार्यक्रमातून तरुणाई आपल्या घरी परतली. दोनदिवसीय समीटमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनातून प्रोत्साहित झालेल्या युवक-युवतींनी जीवनात स्वत:ला सिद्ध करण्याचा ध्यास मनी बाळगत निरोप घेतला.
समारोपाप्रसंगी समीटच्या संयोजनात परिश्रम घेणाऱ्या ‘यिन’च्या नाशिकसह धुळे, जळगावच्या स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘यिन’च्या विस्तारासाठी मदत करणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, कम्युनिटी सर्व्हिसचे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी यांनी केले. स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी (नाशिक) प्रस्तुत हे समीट बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्या सहयोगाने व मराठा विद्याप्रसारक समाज संस्था यांच्या विशेष सहकार्याने झाले. जेएपीएम पॉवर्डबाय असणाऱ्या या समीटचे असोसिएट्‌स स्पॉन्सर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ (पुणे), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स (पुणे), सृजन कॉलेज ऑफ डिझाइन (पुणे) आणि रांका ज्वेलर्स प्रा. लि. (पुणे) होते. नित्यानंद अनुभूती फाउंडेशन, पिनॅकल एज्युकेशन यांचे सहप्रायोजकत्व लाभले.

स्पर्धा परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्त्वाची चाचणी नव्हे : सूरज मांढरे
युवकांना यशप्राप्तीसाठी उंच आकाशापर्यंत उत्तुंग भरारी घेण्याची संधी असते; परंतु युवा वयात ध्येयापासून भरकटण्याची भीतीदेखील असते. लाखो युवक सध्या स्पर्धा परीक्षांमधून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगत आहेत. पण स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले तर आयुष्यातही आपण अपयशी आहोत, असा विचार युवकांनी करायला नको. स्पर्धा परीक्षा ही व्यक्तिमत्त्वाची चाचणी नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की लक्ष विचलित होत असल्याने युवकांची एकाग्रता कमी होते. आपल्यातील क्षमतांना कमी समजू नका. कठीण परिस्थितीतील युवकांमध्ये ऊर्जा अधिक असते. या ऊर्जेचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अपयश जरी आले तरी त्यानंतर दुसऱ्या पर्यायाचाही विचार करायला हवा. आता तरुणांसाठी अनेक क्षेत्रे निर्माण झाली असून, त्‍यात करिअरचे उज्‍ज्‍वल मार्ग आहेत. त्‍यामुळे आयुष्यात उमेद हरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

यशासाठी शॉर्टकट नको, कठोर परिश्रम घ्या : नांगरे-पाटील
विचार हेच आपले शब्द ठरवितात. आपण उच्चारत असलेल्या शब्दांतून कृती ठरते. कृतीतून सवय जडत असते. चांगली सवय ही चांगले चारित्र्य घडवत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग निवडायला नको. त्यापेक्षा कठोर मेहनतीतून मिळविलेले यश दीर्घकाळ टिकते, असे मत पोलिस आयुक्‍त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की देहामध्ये शक्‍ती, मनात उत्साह, बुद्धीत विवेक, मनगटात बळ व शुद्ध चारित्र्य असलेला खऱ्या अर्थाने युवक असतो. आपले वय, वजन किंवा वेशभूषा नव्हे, तर आपण काय बोलतो, काय वाचतो यावर आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची छाप पडते. युवकांची डोकी सुपीक असतात. आवश्‍यकता असते त्यांची योग्य पद्धतीने मशागत करण्याची. सोशल मीडिया, मोबाईलला अडथळा ठरू न देता करिअरसाठीची ब्लू-प्रिंट तयार करा. उद्दिष्ट निश्‍चित केल्यानंतर त्या दिशेने मार्गक्रमण करा, असे नमूद करताना त्यांनी पोलिस खात्यात काम करतानाचे अनुभव विशद केले. भरकटल्याने गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणांना योग्य दिशा दाखविताना ७० हजार युवकांचे समुपदेशन केल्याचे त्यांनी सांगितले. 

मोठ्या यशासाठी जोखीम घेण्याची तयारी ठेवा : रोहित पवार
कुठलीही गोष्ट हाती घेताना त्यात आपल्याला यश मिळेलच, असा विचार न करता सचोटीने प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी. विद्यार्थिदशेत फारशी जबाबदारी नसल्याने मोठे यश मिळवायचे असेल तर जोखीम घेण्याची तयारीदेखील ठेवली पाहिजे, असे मत बारामती ॲग्रो लिमिटेडचे सीईओ रोहित पवार यांनी व्यक्‍त केले. व्यवसाय, शेतीपासून सामाजिक क्षेत्रातील अनुभव विशद करताना त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. युवकांपुढे अनेक अडथळे व आव्हाने आहेत. ध्येयापासून भरकटवण्यासाठी, विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अपयशाची भीती न बाळगता विचारात स्पष्टता ठेवत ध्येयाकडे वाटचाल करत राहायला हवी. व्यवसायाला उंचीवर नेल्यानंतर समाजकारणाची आवड जोपासत असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी, व्यवसायासह समाजकारण व राजकारणाविषयी त्यांनी आपले मत मांडले. कार्यातून जगात आपली ओळख निर्माण होईल, असे काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करा. आपली आवड असलेल्या क्षेत्राला करिअर म्हणून निवडल्यास अधिक प्रभावीपणे काम होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

आत्मविश्‍वास, जिद्द, धाडसातून संघर्षासाठी प्रेरणा : ॲड. निकम
छत्री पाऊस रोखू शकत नाही; परंतु पावसात भिजण्यापासून आपले संरक्षण करते. त्याप्रमाणे आत्मविश्‍वासातून यश मिळेलच असे नाही. पण आत्मविश्वास, जिद्द व धाडस यातून जीवनात संघर्ष करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे मत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले. ते म्हणाले, की अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर अपण दु:खी होत असतो; परंतु प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेलच असे नसते. आयुष्यात अनेक संकटे येत राहणार. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाताना चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवता आले पाहिजे. नेहमी स्वत:शी संवाद साधल्यास मनात आलेल्या विचारांतून योग्य मार्ग सापडू शकतो. करिअरचा विचार करताना पैसे कमावणे सर्वश्रेष्ठ समजू नये. चुकीच्या मार्गावर नेणारा पैसा आपल्याला व आपल्यामुळे इतरांना आनंद मिळवून देऊ शकत नाही. जीवनात संवेदनशील असल्यास प्रगतीचा मार्ग सापडतो. पण संवेदनशील होताना दुःखाच्या जवळ जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणावापासून दूर राहण्यासाठी निर्मळ स्वभाव असला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. भाषणादरम्यान खुमासदार शैलीत कविता सादर केल्‍या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News