इंटरनेटच्या अति वापरामुळे मुलांचे भावविश्व दूषित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020
  • अलिकडे मुलांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
  • इंटरटेनटचे अनेक चांगले फायदे देखील आहेत.
  • तसेच त्याचे वाईट परिणाम सुध्दा आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.

मुंबई :- अलिकडे मुलांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. इंटरटेनटचे अनेक चांगले फायदे देखील आहेत. तसेच त्याचे वाईट परिणाम सुध्दा आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच इंटरनेटचे देखील फायदे आणि तोटे आहेत. एका तरुणाकडे ७०० अल्पवयीन मुलींची आक्षेपाऱ्ह फोटो आणि व्हिडिओचा साठा आढळल्यामुळे प्रकरणाचा तपास सायबर पोलीस तपास करीत आहेत, तरी या गुन्ह्यामुळे काही सामाजिक प्रश्नांवर प्रकाश पडला आहे. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे मुलींची होणारी घुसमट आणि इंटरनेट वापराची अमर्याद मुभा यांचे दुष्परिणाम, त्याचबरोबर लक्ष वेधण्यासाठी शरीराचाच वापर करण्याचा मुलीं मध्ये रूजू लागलेला गैरसमज आणि मुख्य म्हणजे पालकांचे दुर्लक्ष याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या पण ‘इन्स्टाग्राम’वर नस्ते उद्योग करणाऱ्या एका मित्राला अनेक मुलींनी आपली नग्नावस्थेतील फोटो दिले. पण या कृतीने त्यांच्या मनावर आघात करणारे प्रकार घडले. त्या मुलींचा हा मित्र म्हणजे एक सायबर गुन्हेगार होता. त्याने मुलींच्या छायाचित्रांमध्ये बदल घडवून त्याद्वारे त्यांना धमकावले. त्यांच्याकडून आणखी आक्षेपाऱ्ह प्रकार करवून घेतले. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील सर्वात लहान मुलगी आठ वर्षांची आहे. आठ वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामवर असल्याचे ऐकून पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘रस्ता ओलांडताना आपण मुलांना मोकळे सोडतो का? मग इंटरनेट-समाजमाध्यमे हाताळण्याची मुभा देताना त्यातील धोक्यांचा विचार का करत नाही?  बंद खोलीत लहान मुलाला मोबाईल-इंटरनेट वापराची मुभा देणे गैर आहे.’’

समाजमाध्यमांवरील लैंगिक गुन्हेगारी आणि मुलींचे शोषण यामागे लैंगिक शिक्षणाचा आणि घरात संवादाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे डॉ. वीणा कुलहळी यांचे निरीक्षण आहे. डॉ. कुलहळी म्हणाल्या, ‘‘अलीकडे मुलींचे वयात येण्याचे वय सरासरी १० वर्षांवर आले आहे. बौद्धिक, भावनिकदृष्टय़ा परिपक्व नसल्यामुळे शरिरात घडणाऱ्या तारुण्यसुलभ बदलांमुळे मुली घाबरतात, लाजतात. हे बदल म्हणजे दुष्परिणाम तर नाही? असा प्रश्नही त्यांना पडू शकतो. या शिवाय अनेक प्रश्न मुलींच्या मनात घोंघावत असतात. परंतु आई-वडील कमावते असल्याने अशा नाजूक क्षणी मुलींकडे दुर्लक्ष होते.’’ आपण कितीही प्रगत जगात वावरत असलो तरी मुलींना वयात येताना होणाऱ्या बदलांची माहिती त्यांची आई देत नाही. एकतर तिला वेळ नसतो किंवा ती संकोच करते. त्यामुळे मुलींच्या मनातली ही घुसमट हल्ली समाजमाध्यमांद्वारे मोकळी होऊ शकते. या विषयावर मैत्रिणीने संवाद साधल्यास मुली त्यांच्याकडे मन मोकळे करतात, असे डॉ. कुलहळी यांनी सांगितले.

आठ ते १३ या वयात मुले जे पाहतात, ऐकतात त्यावर त्यांचा पटकन विश्वास बसतो. अशा गोष्टी त्यांच्या मनावरही लवकर बिंबवल्या जातात, असे डॉ. शुक्ला आणि डॉ. वीणा यांचे निरीक्षण आहे. सध्या इंटरनेट, समाजमाध्यमे, दूरचित्रवाणी या माध्यमांवर माहितीचा महापूर असतो. तेथून प्रसारित होणाऱ्या माहितीद्वारे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी पुन्हा त्यांना इंटरनेट, समाजमध्यमांचाच आधारा असतो. तेथून त्यांना शास्त्रीय माहिती मिळेलच याची खात्री नसते. बऱ्याचदा अशास्त्रीय, बीभत्स माहिती मिळते. मुले त्यांत गुंतत जातात, अशी खंत डॉ. शुक्ला आणि डॉ. वीणा यांनी व्यक्त केली.

मोठेपणी कोण होणार असा प्रश्न विचारला तर अनेक मुले ‘‘यूटयुबर’’ असे उत्तर देतात. मायली सायरस, रेहाना, हिलरी डफ आदींसह चित्रपट सृष्टीतील तारका त्यांच्या आदर्श असतात. त्यांच्यासारखे सौंदर्य, आकर्षक शरीर आपल्यालाही लाभावे यासाठीची धडपड वयात येण्याआधीपासून सुरू होऊ शकते. आपण त्यांच्यासारखे न दिल्यास कदाचित आपल्याला कुणी विचारणार नाही, आपल्याकडे कुणीही लक्ष देणार नाही, ही भावना मुला-मुलींमध्ये घर करते. त्यामुळे त्यांना आभासी जगाबाबत आणि त्याच्या धोक्यांबाबत मुलांना माहिती देणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. शारीरीक सौंदर्याशिवाय क्रीडानैपुण्य, अभ्यास, नेतृत्व, वक्तृत्व या गुणांचा विकास केला तर आपले प्रभावी व्यक्तिमत्व घडवता येते, याची जाणीव मुलांना करून दिल्यास मुलांची निकोप मानसिक वाढ होईल, असा सल्ला डॉ. शुक्ला आणि डॉ. वीणा यांनी दिला.

पूर्वी मुलांच्या मनात रंगाचा न्यूनगंड, भयगंड असे. पण आता शरीर सडपातळ हवे, ही भावना त्यांच्यात जोर धरते आहे. सुंदर दिसलो नाही, आपले शरीर आकर्षक नसेल तर आपल्याला कोणीही विचारणार नाही, हा गैरसमज मुलांमध्ये आहे. दिलेला डबा न खाणे, खाण्याबाबत अतिरेकी सजगता, पोट वाढले का? गाल जास्त वर आलेत का? असे प्रश्न विचारत राहणे हे प्रकार त्याचेच द्योतक आहेत, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.

डॉ. मनोज भाटवडेकर यांनी सध्याच्या ऑनलाईन शिक्षणालाच आक्षेप घेतला. आई, वडील किंवा मोठया भावंडाने वापरलेला मोबाइल काही काळासाठी लहान मुलांच्या हाती येतो. त्यामुळे इंटरनेटवर मोठयानी पाहिलेली संकेतस्थळे, त्यातील माहिती मुलांच्या हाती लागू शकते. त्यातून एखाद्यावेळी मोठयानी पाहिलेल्या आक्षेपाऱ्ह किंवा प्रोढांसाठीच्या संकेतस्थळांवरील माहिती मुलांवर आदळते. त्यातून दुष्पपरिणाम संभवतात, असे डॉ. भाटवडेकर म्हणाले.

प्रकरण काय?

सायबर पोसिलांनी अटक केलेल्या अफजल जमानी याने इन्स्टाग्रामद्वारे तो मुलगी असल्याचे भासवून सुमारे ७०० हून अधिक अल्पवयीन मुलींना मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याच्या मोबाईलमध्ये ८ ते १५ या वयोगटातील मुलींची आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्या. तो मुलींना, तुमच्या वयाच्या मनाने तुमच्या शरीराची वाढ झाली नसल्याची टिप्पणी करून त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करीत असे. मुलींच्या मनातील न्यूनगंड आणखी घट्ट व्हावा यासाठी इतर तरुणी,  महिलांची नग्न फोटो स्वत:ची म्हणून या मुलीना पाठत असे. तसेच त्यांना तशी फोटो पाठविण्यास सांगत असे. न्यूनगंड निर्माण झालेल्या अनेक मुलींनी त्याला आपली आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. नग्न फोटो पाठवण्यास नकार देणाऱ्या मुलींची त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरील छायाचित्रे ‘मॉर्फ’ करून तो ती मुलींच्या पालकांना, मैत्रिणींना पाठवण्याची धमकी देत असे. अशा पद्धतीने धमकावून आरोपीने ७०० मुलींकडून त्यांची आक्षेपाऱ्ह छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती मिळवल्या.

मानसोपचारतज्ज्ञांचा पालकांना सल्ला

  • मुलांच्या इंटरनेट, मोबाइवरील हालचालींवर लक्ष ठेवावे.
  • मुले नेमकी कोणती संकेतस्थळे पाहतात याचा तपास हिस्ट्रीत जाऊन करावा.
  • मुले इंटरनेटवर असताना त्यांच्या शेजारी बसावे.
  • मुलांना ईयर फोन, हेडफोन देऊ नये.
  • मुले सज्ञान होईपर्यंत त्यांना समाजमाध्यमांपासून दूर ठेवावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News