सदाबहार फॅशन आयकॉन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 20 August 2019
  • हिंदी सिनेमातील कलाकारांचा फार मोठा प्रभाव
  • भारतीय फॅशन विश्‍वाला उत्तेजन देणारा
  • पहिला स्टाईल आयकॉन म्हणजे सदाबहार देवआनंद
  • केसांचा पफ हा त्या काळचा सर्वाधिक गाजलेला हेअरकट

देवानंद यांच्या फॅशन्सचे, त्यातून खुलणाऱ्या त्यांच्या सौंदर्याचे आणि त्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या फॅन्सचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यातला एक किस्सा म्हणजे देवआनंद यांच्या काळ्या कोटाचा.

भारतीय फॅशनविश्‍वावर हिंदी सिनेमातील कलाकारांचा फार मोठा प्रभाव अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो. भारतीय फॅशन विश्‍वाला उत्तेजन देणारा, भारतीयांना नवनव्या स्टाईल्सची ओळख करून देणारा पहिला स्टाईल आयकॉन म्हणजे सदाबहार देवआनंद. ज्यांच्या अनेक फॅशन्स आजही तरुण कलाकार मोठ्या दिमाखात मिरवताना दिसतात.

मोहब्बतें हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा गळ्याभोवती स्वेटर बांधलेल्या शाहरूखने तरुणाईला वेड लावलं होतं. ती स्टाईल एवढी प्रसिद्ध झाली, की थंडी नसतानादेखील केवळ फॅशन म्हणून तरुणाई गळ्याभोवती स्वेटर गुंडाळायला लागली होती. आमच्या लाडक्‍या शाहरूखची स्टाईल म्हणून मिरवणाऱ्या तरुणांना शांतपणे आधीच्या पिढीने समजावलं असणार बाळा, तुझ्या शाहरूखला गळ्याभोवती स्वेटर बांधून कितीही क्‍यूट दिसू देत, ही स्टाईल मूळची आमच्या देवआनंदची बरं का! १९७३ च्या हिरा पन्ना या सिनेमातून ही फॅशन देवसाब यांनी पडद्यावर आणली होती.

देव आनंद या देखण्या चेहऱ्याने सिनेविश्‍वाच्या माध्यमातून फॅशन विश्‍व अक्षरशः गाजवलं. त्यांच्या अनेक फॅशन्स प्रचंड लोकप्रिय ठरल्या. देवआनंद यांच्या हेअरस्टाईलने तर त्या वेळी तरुणाईवर गारूड केलं होतं. केसांचा पफ हा त्या काळचा सर्वाधिक गाजलेला हेअरकट होता.

ज्या काळी पुरुषांचे कपडे आणि हेअरस्टाईल्स यावर फारसे प्रयोग केले जात नसत अशा काळात देव आनंद यांचे फुलाफुलांचे शर्टस, वेगवेगळ्या रंगांच्या पॅन्टस, केसांचा पफ, गळ्यातला मफलर, गळ्याभोवती गुंडाळलेला स्वेटर, जॅकेटस, कॅप, स्कार्फ या सगळ्या स्टाईल्सनी फॅशनविश्‍वात बहार आणली होती. गाईड, हरे रामा हरे कृष्णा यासारख्या सिनेमांमधील त्यांचे कपडे या त्या काळातल्या हिट फॅशन्स तर होत्याच, पण आजही रेट्रो लूक करायचा म्हटला तर आवर्जून या फॅशन्स डोळ्यासमोर येतात.

देवआनंद यांच्या फॅशन्सचे, त्यातून खुलणाऱ्या त्यांच्या सौंदर्याचे आणि त्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या फॅन्सचे अनेक किस्से सांगितले जातात, त्यातला एक किस्सा म्हणजे देव आनंद यांच्या काळ्या कोटाचा. पांढरा शर्ट आणि काळा कोट हा पोषाख त्यांना कमालीचा खुलून दिसत असे. या कोटामधल्या देवआनंद यांची क्रेझ तरुणींमध्ये कमालीची वाढली होती. या कपड्यातल्या देव आनंद यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून अनेक तरुणी जीवावर उदार होत असत.

चाहत्यांच्या या पराकोटीच्या प्रेमामुळे, त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी देवआनंद यांना काळे कपडे न घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. देव आनंद यांनीदेखील हा सल्ला मानून काळे कपडे घालणे बंद केले होते.फक्त शहरी भागातच नव्हे, तर खेड्यापाड्यापर्यंत लोकांना फॅशन विश्‍वात प्रवेश करायला लावणारा हा पहिला स्टाईल आयकॉन.

फॅशनच्या दुनियेत त्यांना आजही ट्रेण्डसेटर म्हणून ओळखलं जातं. एका मुलाखतीत त्यांनी फॅशनविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यात ते म्हणतात, ‘मी जे कपडे घालतो, ते परिपूर्ण असावेत असं मला वाटतं. मी दररोज आरशात स्वत:ला पाहतो आणि म्हणतो, मी छान दिसतो. जे मला करायला आवडतं ते मी करतो, मला चांगले कपडे घालायला आवडतात तसे मी ते घालतो. त्याबद्दल कोण काय म्हणतं त्यापेक्षा आपल्याला काय आवडतं ते महत्त्वाचं असतं. आपल्या चेहऱ्याला, शरीरयष्टीला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभते ती खरी फॅशन. फॅशन म्हणजे काय आणि ती कशी केली पाहिजे, यासाठी भारतीय फॅशन विश्‍वातील ट्रेण्डसेटरचे हे मत लक्षात घ्यावे असे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News