जग बदलेले तरी माणसांच्या मनातून जात का नष्ट होत नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • आजची चर्चा. माझा अधिकार, माझे मत...
  • आधुनिकीकरणामुळे जग वेगाने बदलू लागले, समाज सुशिक्षित झाला, त्यामुळे अनेक सकारात्मक परीवर्तण झाले, तरी देखील जात कायम टिकून आहे.

मुंबई : जात ही जन्माने मिळते आणि मृत्यू नंतरही कायम राहते. जात नष्ठ करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केला, संपुर्ण आयुष्य खर्च केले. मात्र जात नष्ट होऊ शकली नाही. आधुनिकीकरणामुळे जग वेगाने बदलू लागले, समाज सुशिक्षित झाला, त्यामुळे अनेक सकारात्मक परीवर्तण झाले, तरी देखील जात कायम टिकून आहे. 'जात नावाचे विष कितीही जग बदलेले तरी अजून माणसांच्या मनातून का जात नाही?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

आज कुठेही जा कॉलेजमध्ये अॅडमिशन असो की लग्न ठरवायचे असो जातीचा प्रश्न नेहमीच विचारला जातो. जातीच स्टिकर असल्याशिवाय आजकाल काहीच होत नाही. जातिजातीत सुद्धा अजून जाती पडल्या जातात आणि माणुसकी जातींच्या रंगात वाटली जाते. आजही गावाकडे जातीवरून हाका मारल्या जातात. चार चौघात जातीवरून बरवाईट बोलल जात. जातीवरून बरेवाईट बोलल गेल्याने  नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या घटना आपण पहिल्याच आहेत. पण तरीही लोकांच्या विचारांत काही बदल दिसून येत नाही.. जितका प्रयत्न कॅशलेस होण्यासाठी करण्यात आला ना तितकाच प्रयत्न कास्टलेस होण्यासाठी पण करण्यात यायला हवा.
- मेघना 

ज्या गोष्टीमुळे हिंदुस्थानाची फाळणी झाली ती जात....
ज्या गोष्टीमुळे दंगली घडतात ती जात....
ज्या गोष्टीमुळे परिवार विभक्त होतात ती जात...
ज्या गोष्टीमुळे माणुसकी संपते ती जात....
ज्या गोष्टीमुळे राजकारण होते ते ती जात....
ज्या गोष्टीमुळे आज काल शिक्षण सुध्दा होऊ शकत नाही ती जात...
ज्या गोष्टीमुळे आपण सरकारी नोकरी सुध्दा करू शकत नाही ती जात...
अशा प्रकारे अनेक गोष्टीत जी आडवी येते ती म्हणजे " जात ".
आपण जोपर्यंत जात नावाचा विषय आपल्या देशातून हद्दपार करत नाही तोपर्यंत प्रगती होणे अशक्यच!!!!
- तेजेस पाटील

जात नावाचे विष समाजाला दुभागून टाकेल. मुळात याला कारणीभूत आपणचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज ही जर शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर आधी जात तिथे नोंदवावी लागते. मुळात प्रत्येक ठिकाणी जात वापरल्या शिवाय कोणतेच कामे होत नाहीत. सर्वधर्म समभाव ही संकल्पना केवळ बोलायला छान वाटते मात्र ती कुठेच दिसून येत नाही. खरं तर आधी तुम्ही सर्व जाती पाती ह्या काढून टाका. मूलतः निसर्गाने सुद्धा दोनच जाती केल्या आहेत ती म्हणजे स्त्री आणि पुरुष. बाकी आपण ज्या जाती मानतो त्या कामानुसार नाव होते पण आपण त्यालाच जाती बनून बसलो. आज प्रत्येक जण फक्त जाती साठी लढतो आहे. राजकारण सुद्धा जातीच्या आधारावर होत आहे. एवढंच नाही तर सरकार सुद्धा साधी परीक्षा फिस जाती नुसार घेत आहे. म्हणजे इतका भयंकर जातीपातीचा किडा डोक्यात रेंगाळत आहे. आज अनेक लोक आडनाव पाहून जात तपासतात. ही खरी शोकांतिका आहे. मला वाटते बस झाला आता जातीपाती. आता तरी आपली जात ही भारतीय होयला पाहिजे आणि जाती पेक्षा माती श्रेष्ठ झाली पाहिजे
- व्यंकटेश नारलावार

'जात' म्हणजे माणुसकीला लागलेला एक असा कलंक आहे, जो समाजाचं अधःपतन करत आहे. असं म्हणतात की मेल्यावर माणसाबरोबर त्याचं सर्व संपून जातं. परंतु माणसानेच त्याच्या नशिबी जात नावाचं असं लेबल लावलं आहे. जे त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या अस्थींवर कायम राहते.
- नागेंद्र स्वामी

संपूर्ण भारतीय समाजामध्ये प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेने समानतेचा अधिकार दिलेला आहे. आणि मग जात नावाचे विष माणसानेच माणसाच्या मनामध्ये का पेरले? तर याला एकच कारण म्हणजे पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टींमूळे माणूस माणसापासून विभागला गेला. आणि मग यातूनच  जात नावाच्या विषाचा जन्म झाला. माणूस ही एकच जात आणि एकच धर्म आहे. तरीसुद्धा माणसानेच माणसामध्ये फूट का पाडली. माणसाच्या शरीरातील रक्ताचा रंग एकच मग जात का वेगळी? माणसाने माणसाला लावलेला हा डाग कधी नष्ट होणार? मुख्य म्हणजे पालकवर्ग हाच मुलांमध्ये जात नावाचे विष कालवतो. मग ते एखाद्याचे प्रेम असेल किंवा शाळा कॉलेज असो,  जात नावाचे विष जर खरोखर नष्ट करायचे असेल, ना तर पहिली सुरवात ही आपल्यापासून करायला हवी आणि मग नक्कीच ह्या विषाचे अमृत झाल्याशिवाय राहणार नाही.
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती भेद केला नाही. मग आपण 21 व्या शतकामध्ये जगणारी माणसे जातीभेद करणारे कोण, आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.
- शिल्पा नरवडे

लहानपणी मनात पेरलेली बीजे मोठेपणी तीच फळे देतात. समाजात अजूनही एक असा वर्ग आहे जो जातीपातीच्या राजकारणाला बळी पडतो, याला दुजोरा मिळतो तो आरक्षणाच्या मुद्यातून. जोपर्यंत या वर्गाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी जात हा शब्द कालबाह्य होणार आहे. याच्या विरुद्ध बाजूला जो शिक्षित वर्ग आहे, यांचं चित्र मात्र जातीच्या बाबतीत बदलेल पाहायला मिळतं. त्यांच्या दिनचर्येतुन जात नावाचा कोणताही उच्चार पाहायला मिळत नाही. सार एवढाच की, जोपर्यंत योग्य शिक्षण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत जातीवाद पाहायला मिळणार..
- विनायक पाटील

देशातील समाज रचना जातीवर आधारीत आहे. जातीची उतरंड फोडण्याचा अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केला, संपुर्ण आयुष्य खर्ची घातले मात्र, त्यांना यश आले नाही. आधुनिक काळात काही विचारवंत जात नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जात टिकवण्यासाठी विरोधक दुप्पटी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जात अधिक घट्ट होत आहे. जातीच्या बाहेर प्रमे केले म्हणून जातीचे भकक्षक प्रेयसी किंवा प्रियकराला मृत्यू दंड देतात. जात नष्ट करायची असेल तर जतीच्या मुळावर घाव घातला पाहीजे, अंतरजातीय विवाह जात नष्ट करण्याचा एक मार्ग आहे. मात्र या मार्गात अनेक काटे असल्यामुळे सहजासहजी कोणी अवलंब करतात दिसत नाही. 

-स्वप्नील भालेराव  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News