उद्योगी शिल्पकार

संदीप काळे
Sunday, 14 June 2020

एखाद्याला व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणं, तशी त्याची मानसिकता घडवणं, कर्ज मिळवून देण्यापासून ते आख्खा सेट अप् उभारण्यासाठी पुढाकार घेणं...अशा सगळ्या प्रक्रिया साताऱ्यातले एक उद्योजक मोठ्या उत्साहानं पार पाडतात. असं करण्यामागचा त्यांचा उद्देश? इतरांनीही आपल्यासारखंच उद्योजक-व्यावसायिक व्हावं, एवढाच...

एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्याला जाणं झालं. कार्यक्रम संपला, ओळखीपाळखीची मंडळी अवतीभवती जमायला लागली. त्यात सीताबाई लोखंडे नावाच्या एक महिला होत्या. माझे लेख वाचून त्या मला सतत फोन करायच्या. स्वतःच्या जगण्याच्या लढाईवर त्यांनी कविता केल्या होत्या. त्यांच्या हातातल्या पिशवीत त्या कविता होत्या. त्यांच्या त्या लंब्याचौड्या कविता वाचताना त्यात एक नाव सातत्यानं आढळायचं.
मी सीताबाईंना विचारलं :
‘‘ज्या श्रीनिवास यांचं नाव तुमच्या कवितेत सातत्यानं असतं ते श्रीनिवास तुमचे शिक्षक आहेत का?’’
त्या म्हणाल्या : ‘‘नाही. ते माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत! त्यांनी मला स्वयंरोजगाराचे धडे दिले आणि त्यातून मी उभी राहिले.’’
सीताबाईंसमवेत आलेल्या इतर दोघांनीही असंच सांगितलं. ‘आम्ही पूर्वी उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामं करायचो; पण आता आम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. आमचं आता नाव झालं आहे. हे सगळं घडलं ते वाठारेसरांमुळे. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी अनेकांना  आपापल्या पायावर उभं केलं आहे,’ असं त्या सगळ्यांच्या बोलण्याचं सार होतं.
श्रीनिवास वाठारे यांना भेटावं असं माझ्या मनात साहजिकच आलं. सीताबाईंनी फोन लावून दिला आणि दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं.
मी श्रीनिवास वाठारे (९४२२४००६०९) यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते काही महिलांच्या प्रशिक्षणाचा वर्गच घेत होते. वेगवेगळ्या वस्तू तयार कशा करायच्या, बचतगट कसे उभारायचे, कर्ज कसं मिळतं, कुठल्या कुठल्या योजना आहेत, त्या योजनांचं प्रशिक्षण कसं घ्यायचं...हे त्या वेळी सुरू होतं. प्रशिक्षणवर्ग संपण्याची वाट पाहत मी शेजारच्या खोलीत बसलो. तिथं हे सगळं मला ऐकू येत होतं. उद्योग-व्यवसायाबाबतची बरीच पुस्तकं त्या खोलीत होती. मी ती चाळली.
साताऱ्यात शाहूपुरीमध्ये असलेलं हे घर अनेक लोकांनी गजबजलेलं होतं. वाठारे यांचा प्रशिक्षणवर्ग संपला. त्यांना भेटायला आलेल्या काहीजणांशी ते बोलू लागले. नागपूर, कोल्हापूर, लातूर या भागांतून अनेक लोक त्यांना भेटायला आले होते. नवीन उद्योग सुरू करण्यापूर्वीचं मार्गदर्शन त्यांना हवं होतं. त्या लोकांशी वाठारे  यांचं बोलणं होईपर्यंत मी प्रशिक्षणार्थी महिलांशी बोललो.
‘तुम्ही इथं कधीपासून येता, कशाचं प्रशिक्षण घेता, किती फी द्यावी लागते,’ असे काही प्रश्न मी त्यांना विचारले. माझं विचारणं संपत नाही तोच एक महिला म्हणाली : ‘‘इथं काहीही शिकायचं असेल तर फी घेतली जात नाही. ‘एक माणूस म्हणून गेटच्या आत या आणि उत्तम उद्योजक बनून परत जा,’ अशी जादू आहे या घरातल्या माणसांत.’’
उद्योजक-व्यावसायिक तयार करण्याचा वाठारे यांचा हा उपक्रम साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
उत्तम व्यावसायिक निर्माण करणारे ते हाडाचे शिक्षक आहेत. शाहूपुरीतल्या त्यांच्या घरी आणि जुन्या एमआयडीसी भागात हे काम सातत्यानं केलं जातं. वाठारे आणि मी गप्पांना सुरुवात करणार तेवढ्यात ओंकार आणि सौरभ ही त्यांची मुलं तिथं आली आणि म्हणाली :  ‘‘बाबा, अजून काही माणसं तुम्हाला भेटायला आली आहेत.’’
मात्र, वाठारे यांनी आता आधी माझ्याशी बोलायचं ठरवून आलेल्यांना काही वेळ बसायला सांगितलं. वाठारे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांशी माझी ओळख करून दिली. ओंकार हा बडोद्यात एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. ते काम सोडून तो आता आपल्या वडिलांचा व्यवसाय चालवतो. सौरभनंही व्यवसाय सुरू केला आहे. उच्चशिक्षित असणारे दोघंही वडिलांची रुची असलेल्या व्यवसायात गुंतलेले आहेत.
वाठारे यांनी त्यांचा प्रवास उलगडला. त्यानुसार, एका प्रसिद्ध उद्योजकाचं भाषण दहावीत असताना त्यांनी ऐकलं होतं. शिवाय, वाठारे यांना त्यांच्या वडिलांनीही व्यवसायाचं महत्त्व सांगितलं होतंच. या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून, व्यवसाय करायचा असं त्यांनी ठरवलं. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना सुरुवातीला नगरमध्ये एका छोट्याशा कंपनीत नोकरी करावी लागली. तेव्हा त्यांना पगार होता साडेचारशे रुपये. त्या नोकरीत त्यांचं मन काही  लागेना. मग पुण्यात येऊन त्यांनी रिक्षा विकत घेतली...पंचवीस रुपयांचं भांडवल गुंतवून दारोदार फिरून उदबत्त्या विकण्याचाही काम केलं.  
आपला काही तरी वेगळा व्यवसाय असायला पाहिजे असं रसायनशास्त्रात बीएस्सी असलेल्या वाठारे यांना सातत्यानं वाटायचं. ऑफसेट प्रिंटिंग कोटेडप्लेट तयार करणं, इतर छोट्या-मोठ्या वस्तू तयार करणं असेही काही उद्योग त्यांनी सुरू केले. काही वर्षांतच त्यांना व्यवसायात खूप यश मिळालं. पुण्यात हा त्यांचा व्यवसाय वाढत असतानाच त्यांनी अनेकांना व्यवसाय सुरू करण्याविषयीचं प्रशिक्षण द्यायला सुुरुवात केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी स्वत:चा व्यवसाय करायला प्रोत्साहित केलं. व्यवसाय उभारायला मदतही केली. तो त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे.
त्यांनी सांगितल्यानुसार, कुठलीही व्यक्ती त्यांच्याकडे उद्योग-व्यवसायाच्या उभारणीसंदर्भात आली तर ते त्या व्यक्तीला भागभांडवलासह आजही मदत करतात.
वाठारे यांनी एक पत्र मला दाखवलं.  पूर्वी सायकलवरून आइस्क्रीम विकणाऱ्या चांगदेव जाधव या व्यक्तीचं ते परभणीहून आलेलं पत्र होतं. त्या पत्रात जाधव यांनी म्हटलं होतं : ‘तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी आज लाखोंचा व्यवसाय करत आहे. माझ्या तिन्ही मुलींची लग्न झाली. मुलाचं शिक्षण झालं. मुलगा आता परदेशात नोकरी करतो. मी माझ्या मुलाला म्हणालो होतो, ‘व्यवसाय कर, व्यवसाय कर....’ पण तो जोखीम घ्यायला तयार नव्हता.’ पत्राच्या शेवटी लिहिलेलं होतं : ‘माझ्या आयुष्याचं सोनं झालं ते तुमच्यामुळे. तुम्ही मला व्यवसाय करण्याची गोडी लावली नसती तर मी सायकलवरून आइस्क्रीम विकणाराच राहिलो असतो.’
असे अनेक अनुभव वाठारे यांनी मला सांगितले.
त्यांचा मुलगा सौरभ आता सॉप्टवेअर डेव्हलपिंगचं काम करतो. त्याचं काम राज्यभर चालतं. २४ वर्षांच्या सौरभच्या हाताखाली आज २४ हून अधिक माणसं आहेत! आपल्या वडिलांचा केमिकल तयार करण्याचा व्यवसाय थोरला ओंकार पुढं नेतोय. घरगुती वापरासाठीचं आणि गाड्या स्वच्छ करण्यासाठीचं केमिकल इथं तयार केलं जातं. शाळा, समाजमंदिरं आणि मंदिरं यांसाठी मोफत केमिकल देण्याचं काम हे कुटुंब अनेक वर्षांपासून करतं. उद्योगाविषयीचं वाठारे यांचं बोलणं सतत ऐकावंसं वाटत होतं. आपल्या महाराष्ट्रात उद्योग-व्यवसायाची कास कुणी धरत नसल्यामुळे आपलं किती मोठं नुकसान झालं आहे याची आकडेवारीसह मांडणी वाठारे यांनी मला करून दाखवली.
''व्यवसाय’ या विषयावरचा त्यांचा जगभरातला अभ्यास, तसंच भारतातलं सगळं टॅलेंट कसं परदेशात चाललंय हे त्यांचं निरीक्षण विचार करायला लावणारं होतं.
वाठारे म्हणाले : ‘‘ ‘मी व्यवसायच करीन’ ही भूमिका घेऊन शिकणारा तरुण आज कमी झालाय, म्हणून आपलं आर्थिक खच्चीकरण सुरू आहे. आता कोरोनानं डोळे उघडले असतील तर परदेशांतल्या सर्वांनी परत यावं.’’
ते पुढं म्हणाले : ‘‘आम्ही उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं चांगलं पाऊल उचलतो तेव्हा सरकार आम्हाला टोकतं. ‘नॉनवन’चा माझा उद्योग सरकारची धोरणं बदलल्यामुळे बंद पडला. या व्यवसायाच्या शाखा राज्यभर होत्या. असंख्य लोक एका क्षणात बेरोजगार झाले. या सर्व बेरोजगार लोकांना मी वेगवेगळे व्यवसाय सुरू करून दिले. पुण्यात माझ्याबरोबर तेव्हा रिक्षा चालवणारे माझे मित्र आज महागड्या चारचाकींमधून फिरत आहेत. गाड्यांच्या सुट्या भागांच्या विक्रीचं दुकान सुरू करायला मी माझ्या मित्रांना त्याच वेळी उद्युक्त केलं. त्यात ते यशस्वी झाले. कारण, त्यांनी न घाबरता व्यवसायाची कास धरली.’’
‘‘लोकांनी व्यवसाय करावा यासाठी तुम्ही पुढाकार घेताना दिसता. हा पुढाकार तुम्ही का घेता,’’ या प्रश्नावर  भावुक होत वाठारे म्हणाले : ‘‘माझे वडील एलआयसीत होते. त्यांनी लोकांची खूप दु:खं पाहिलेली होती. ते म्हणायचे,
‘आपण ब्रिटिशांची गुलामी करत जगलो आणि आताही कुठल्या तरी मालकाकडे नोकरी करत गुलामीच करत असतो. ही गुलामी थांबवायची असेल तर प्रत्येक माणूस उद्योगाकडे वळला पाहिजे. केवळ आपणच तेवढे उद्योगाकडे वळून चालणार नाही. आपल्या भोवतीसुद्धा उद्योगाचं वातावरण कायम ठेवलं पाहिजे. ‘उत्तम उद्योगी’ आणि ‘उद्योजक व्हायला प्रवृत्त केल्याबद्दल लोकांचे आशीर्वाद घेणारा,’ अशी आपली दुहेरी ओळख झाली पाहिजे. आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला उत्तम व्यावसायिक म्हणून तयार करायचं हा उपक्रम वडिलांच्या कानमंत्रातून मिळाला. त्याला आज ३७ वर्षं होऊन गेली आहेत. उद्योगांच्या यशस्वितेविषयीचा
‘विद्याधन’ नावाचा एक उपक्रम आम्ही सुरू केला. त्यातून  हजारो महिलांना काम मिळालं. बचतगट असेल, महिलांचे छोटे छोटे उद्योग असतील, गावपातळीवर महिलांचे छोटे छोटे ग्रुप असतील...या सगळ्यांना डेव्हलप कसं व्हायचं,  हातात नेहमी चार पैसे कसे खेळते ठेवायचे याचं प्रशिक्षण आम्ही सातत्यानं देत आहोत.’’
ज्या सीताबाई लोखंडे यांच्या सांगण्यावरून मी वाठारे यांना भेटायला आलो होतो त्यांचे यजमान दृष्टिहीन आहेत. त्यांना मागं-पुढं पाहणारं कुणी नाही. वाठारे यांच्याकडे येऊन पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. अनेक महिलांना एकत्रित करून एक ग्रुप स्थापन करण्यात आला. मागणी वाढली आणि उत्पादनही वाढायला लागलं. चार पैसे खेळते झाले आणि झोपडीत राहणाऱ्या सीताबाई सिमेंटच्या पक्क्या घरात राहू लागल्या.
मी निघणार तितक्‍यात वाठारे   यांच्या पत्नी स्वाती काही तळलेले खाद्यपदार्थ प्लेटमध्ये घेऊन आल्या. पदार्थ रुचकर होते.
मी त्यांना विचारलं : ‘‘काकू, हे पदार्थ तुम्ही घरी तयार केलेत का?’’
त्या म्हणाल्या :  ‘‘नाही. आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या अनेक महिला अशा प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करतात. काल सांगलीत पारू जाधव नावाच्या महिलेनं आपला छोटासा कारखाना उभा केला. त्याच्या उद्‌घाटनाला मी गेले होते. मी निघताना त्यांनी मला हे कच्चे पदार्थ दिले होते. मी ते तळले. गावाकडच्या धान्याचे हे सर्व पदार्थ आहेत.’’
मी त्यांना विचारलं : ‘‘तुम्हीसुद्धा काही शिकवता का?’’
वाठारे मध्येच म्हणाले : ‘‘हो, सर्व जणांनी आपापली कामं वाटून घेतली आहेत.’’
गावपातळीवरची अनेक माणसं जेव्हा कारखान्याचे मालक होतात तेव्हा त्यामागची प्रेरणा म्हणून श्रीनिवास वाठारे यांचा नामोल्लेख करतात. असे कितीतरी फोटो मी वाठारे यांच्याकडच्या अल्बममध्ये पाहिले. एखाद्याला व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणं, तशी त्याची मानसिकता घडवणं, कर्ज मिळवून देण्यापासून ते आख्खा सेट अप उभारण्यासाठी पुढाकार घेणं...अशा सगळ्या प्रक्रिया वाठारे  पार पाडतात.
त्यांनी स्वत: उद्योग उभा करून खूप काही कमावलं नाही हे खरं आहे; पण उद्योग उभा करण्यासाठी त्यांनी ज्यांना ज्यांना प्रोत्साहित केलं, व्यवसाय उभारायला मदत केली अशांची संख्या मोजल्यावर वाठारे यांची श्रीमंती लक्षात येते. नगरच्या नोकरीपेक्षा त्यांनी सातारा, पुणे इथं उभं केलेलं साम्राज्य कितीतरी मोठं आहेच; पण त्यापेक्षाही मोठं आहे ते मनाला मिळणारं समाधान. पुढचे चार महिने वाठारे यांच्या तारखा उपलब्ध नाहीत, एवढे कार्यक्रम ते याही वयात स्वीकारतात.   
वाठारे काकांचा निरोप घेऊन मी निघालो. ‘मुंबईत कार्यक्रमाची एखादी तारीख आम्हाला द्या,’ अशी त्यांना विनंती केली.  आमच्या गप्पा सुरू व्हायच्याआधी काही लोक वाठारे यांना भेटायला आले होेते. त्यांना तब्बल तीन तास वाट पाहावी लागली होती.  
गाडीत बसल्यावर मी विचार करू लागलो...आपण प्रत्येकाचं भलं करू शकतो असं एखाद्या माणसानं ठरवलं तर तो ते करू शकतो...एखाद्या माणसानं ठरवलं की आपण पारतंत्र्यात जगायचं नाही, स्वत:च्या हिमतीवर जगायचं, नोकर म्हणून कुणाच्या हाताखाली राबायचं नाही, तर तोही तसं करून दाखवू शकतो...आपण श्रीमंत होऊ, आपण गडगंज संपत्ती कमावू; पण एखाद्यानं ठरवलं की, नाही...आपण श्रीनिवास वाठारे यांच्यासारखं उद्योगी शिल्पकार व्हायचं, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आयुष्यभर काम करायचं, तर तसंही तो एखादा करू शकतो...असे कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले.
मलाही वाटू लागलं की आपणही व्यवसायाची कास धरली पाहिजे...  तुम्हाला?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News