मार्च महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे भारतात अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परिणामी शाळाही बंद झाल्या; परंतु त्याचा सर्वात वाईट परिणाम इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांवर झाला. इंग्रजी माध्यमांच्या शाळा या पूर्णत स्वयं अर्थसाहाय्यित असल्याने त्यांना शासनाचे कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. या शाळेतील सर्व कारभार व शिक्षकांचा पगार पूर्णत विद्यार्थ्यांच्या फीसवर अवलंबून असतो. मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने इंग्रजी शाळेला येणारी फीस पूर्णपणे बंद झाली. कारण विद्यार्थीच शाळेत येत नसल्याने पालकांनी फीस भरणे बंद केले. वर्षभर जरी पालकांनी फीस भरली नाही तरी व्दितिय सत्र परीक्षेच्या अगोदर म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातील सर्व पालक फीस भरतात. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचा पगार होण्यास मदत होते. या वर्षी मात्र मार्च महिन्यातच शाळा बंद झाल्याने फक्त मार्चपर्यंतच शिक्षकांना पगार मिळाला. एप्रिलपासून आजपर्यंत म्हणजे जवळपास तीन-चार महिन्यापासून शाळा बंद असल्याने शाळेला मिळणारी फीस बंद झाली परिणामी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांचा पगार मिळणे बंद झाले. आज ना उद्या शाळा चालू होतील या आशेवर शिक्षक थांबले परंतु शाळा काही चालू झाल्या नाहीत. कोरोनाचा वाढता प्रभाव आणि परिस्थिती लक्षात घेता इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांनी शाळेतील शिक्षकांचा कुठलाही विचार न करता त्यांना घरचा रस्ता दाखवला. याचा परिणाम असा झाला की, शिक्षकांच्या हाताला काहीच काम राहिले नाही त्याचे कुटुंब जगवणे त्याला डोईजड झाले. परिणामी त्यांच्या कुटुंबातील अडचणी वाढतच गेल्या. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक जेमतेम पगारावर घर चालवतात. तरीही ज्ञानदानाच्या कार्यात कुठेही कमी पडत नाहीत. खाजगी क्षेत्र असल्याने त्याला कुठल्याही प्रकारची पगाराची व कायम स्वरुपी नौकरीची हमी नसते. त्यात काही संस्थेत या शिक्षकांची पिळवणूकहोते.
कोरोनाच्या या जागतीक महामारीमुळे एकाच शाळेवर पाच-दहा वर्ष काम करणऱ्या शिक्षकांचाही संस्थाचालकांनी विचार केला नाही. काही ठिकाणी तर त्यांना अध्ध्या पगारावर काम करण्याची वेळ आली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शक्षिकांना पगार कमी आणि त्यातही अर्धा पगार मिळायला लागला तर त्याने आपला संसाराचा गाडा कसा हाकायचा. या परिस्थितितही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी ऑनलाईन शिकवणी घेण्याची तयारी दर्शवली. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे व सरकाराच्या धरसोड वृत्तीमुळे शिक्षकांचा धीर खचला आहे त्याची सहनशीलता संपत चालली आहे. त्यात संस्थाचालकांनी हात आखडल्याने इंग्रजी माध्यमांचे शाळेच शिक्षक बरोजगार झाले आहेत. ज्या पेनाच्या साधनाने शिक्षकांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले त्या शिक्षकावर आज उपासमारीची वेळ येऊन तो बरोजगार झाला आहे. हातातील खडूच्या जोरावर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या हातातील खडू कोरानामुळे सैल होत चालला आहे. त्याच्या हातात आज टिकाव, फावडे व आसूडासारखे हत्यार येऊ लागले आहे. अशा परिस्थितीत जर या शिक्षकांना समजून घेतले नाही तर उद्याची नवीन पिढी घडवण्याची त्याची उमीद कमी होईल, कोरोना आज ना उद्या निघून जाईल, शाळाही चालू होतील परंतू आजच्या त्याच्या जीवनातील कठीण प्रसंग तो विसरु शकणार नाही परिणामी नवीन विद्यार्थी घडवण्याची त्याची नवनिर्मिती क्षमता कुठेतरी कमी होईल.
इंग्रजी माध्यमांच्या शिक्षक पगारावर आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताता, मेहनत, कष्ट व जास्तीचे तास घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक बनवतात. आज या गोष्टीचा चुकूनही कोणाच्या मनात विचार येत नाही, या शिक्षकांना कोणीही सहानूभूती दाखवत नाही, कारण त्याला पगार कमी आहे. पण आता या शिक्षकातील आशेचा किरण मावळत चालला आहे. जर आज रोजी त्याच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे. आज कोरोना काळात डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार इत्यादींना तुम्ही देवदूत मानता परंतु याच काळात कमी पगारावर काही ठिकाणी मोफत शिक्षण देऊन तुमच्या मुलांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाबद्दल कोणी माणूसकी दाखवायलाही तयार नाही. देशाचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाला जर या देशात एवढा त्रास होत असेल तर देश घडवतांना शिक्षकही काही प्रमाणात का होईना अंतमुख होईल. म्हणून शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांचा थोडा तरी विचार करावा त्याच्या विषयी सहानूभूती दाखवावी जेणे करुन तो आपला भारत देश घडवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. कुठल्याही शिक्षकाला हे ज्ञानदानाचे कार्य सोडण्याची इच्छा नाही म्हणूनच या कोरोना महामारीच्या वादळात त्याचा विचार व्हावा. त्याला त्या वादळात एकटे सोडू नये, तर आणि तरच त्याला विद्यार्थ्यांविषयी असणारे प्रेम, जिव्हाळा व आपुलको कायम राहिल. नसता तो या ज्ञानादानाच्या कार्याला कायमचा राम - राम ठोकेल.