आयपीएलसाठी इंग्लंडचे जैव सुरक्षा मॉडेल वापरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • कोरोनाचे संकट असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे यशस्वी पुनरागमन करणाऱ्या इंग्लंडच्या जैव सुरक्षा मॉडेलचे सहाय्य आयपीएलच्या संयोजनासाठी घेण्यात येणार आहे.
  • महामारीच्या या विळख्यात क्रिकेट कसे खेळले जावे याचा आदर्श इग्लंड क्रिकेट मंडळाने घालून दिला आहे.

मुंबई :- कोरोनाचे संकट असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे यशस्वी पुनरागमन करणाऱ्या इंग्लंडच्या जैव सुरक्षा मॉडेलचे सहाय्य आयपीएलच्या संयोजनासाठी घेण्यात येणार आहे. महामारीच्या या विळख्यात क्रिकेट कसे खेळले जावे याचा आदर्श इग्लंड क्रिकेट मंडळाने घालून दिला आहे. त्याच धर्तीवर आता आयपीएलही होणार आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाचे हंगामी सीईओ हेमांग आमिन यांनी इंग्लंड मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे. त्यांच्याकडून जैवसुरक्षा वातावरणाचा प्रत्येक पैलू ते समजवून घेणार आहेत आणि त्यानंतर बीसीसीआय स्वतःची प्रमाणित कार्यप्रणाली तयार करणार आहे.

आव्हानात्मक परिस्थितीत इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका यशस्वीपणे पार पाडली. या मालिकेकडे संपूर्ण क्रिकेटजगताने लक्ष होते. या यशस्वी आयोजनामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळाचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे त्यांना अनुभव आम्ही वापरणार असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

इंग्लंड मंडळाकडून टिप्स घेतल्यानंतर बीसीसीआय स्वतःची कार्यप्रणाली तयार करणार आहे आणि ती आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत सर्व फ्रॅंचाईस, ब्रॉडकास्टर आणि इतर संबंधितांना देण्यात येणार आहे. प्रत्येकाला या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. अमिरातीत दाखल होण्याअगोदर खेळाडूंच्या वारंवार कोव्हिड चाचण्या करण्यात येणार आहे.

कशी असेल प्रमाणित कार्यप्रणाली

 

  • सर्व फ्रॅंचाईसना अमिरातीत जाण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल.
  • विमानात जाण्यापूर्वी प्रत्येकाच्या किमान दोन कोव्हिड चाचण्या केल्या जातील.
  • चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवासास परवानगी देण्यात येईल.
  • दुबईत दाखल झाल्यानंतरही दोनदा चाचण्या केल्या जातील.
  • सामन्याच्या वेळी ड्रेसिंग रूमध्ये कमीत कमी खेळाडू.
  • अंतर्गत प्रवासासाठी असणारे गाडीचालक, शेफ, मैदान स्टाफ, आयपीएल अधिकारी, फ्रॅंचाईसची माणसे, ब्रॉडकास्टर्स क्‍रयु, बीसीसीआय अधिकारी सर्वांना जैवसुरक्षा नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
  • खेळाडूंसह या सर्वांना अमिरातीत पर्यटनास बंदी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News