विश्वचषकात डगमगणाऱ्या पाकचा चा इंग्लंडला धक्का

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • रूट-बटलरची शतके, तरीही इंग्लिश फलंदाजांचा लढा तोकडा
  • व्रुक आणि आर्चर अपयशी​

नॉटिंगहॅम - यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ज्यो रूट आणि जॉस बटलर यांनी शतके करण्याचा बहुमान मिळवूनही इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. ३४९ धावांचे आव्हान इंग्लंडला पार करता आले नाही आणि तीन दिवसांपूर्वी दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानने १४  धावांनी थरारक विजय मिळवला.

पाकिस्तानकडून कोणालाही शतक करता आले नसले तरी त्यांच्या पाचही फलंदाजांनी निर्णायक योगदान दिले. तीन दिवसांपूर्वी १०५ धावांत गारद झालेल्या पाकिस्तानने आज तब्बल ३४८ धावा उभारल्या. संभाव्य विजेते म्हणून प्राधान्य मिळालेल्या इंग्लंडची ४ बाद ११८ अशी वाताहत झाली होती; पण त्यानंतर रूट आणि बटलर यांनी शतके करत आव्हानाचा पाठलाग कायम ठेवला. 

अखेरच्या ६७ चेंडूत १०१ धावांची गरज असताना रूट बाद झाला, तरी इंग्लंडच्या आशा कायम होत्या; परंतु ३३ चेंडूत ६१ धावांची आवश्‍यकता असताना बटलरही माघारी फिरला आणि इंग्लंडचा पराभव निश्‍चित झाला. त्यानंतर वाहेब रियाझने सलग दोन चेंडूत व्रुक्‍स आणि मोईन अली यांना बाद करून इंग्लंडचा खेळ खल्लास केला.

हा वर्ल्डकप सुरू होण्याअगोदर इंग्लंड-पाक यांच्यात झालेली पाच सामन्यांची मालिका इंग्लंडने ४-० जिंकली होती. 

त्यातील एका सामन्यात तर ३५८ धावांचे लक्ष्यही पार केले होते, पण आज वर्ल्डकपचा दबाव त्यांना पेलता आला नाही. 

इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ
स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका फलंदाजीचे कंबरडे मोडणारी इंग्लंडची गोलंदाजी पूर्ण ५० षटकांत निष्प्रभ ठरली; तसेच क्षेत्ररक्षणातील चुकाही त्यांना भोवल्या. खेळपट्टी आणि हवामान यांच्याकडून साथ मिळत नसेल, तर त्यांच्या गोलंदाजीच्या मर्यादा उघड करण्याची मोहीम इमान आणि फकर या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सुरू केली. 

व्रुक आणि आर्चर अपयशी ठरत असल्याने इंग्लंड कर्णधार मॉर्गनने आठव्या षटकातच फिरकी गोलंदाज मोईन अलीकडे चेंडू सोपवला. अखेर मोईननेच या सलामीवीरांना बाद केले. 

विसाव्या षटकात शंभर धावा झाल्यानंतर पाकिस्तान तीनशे धावा करणार याचे संकेत मिळत होते; मात्र त्यानंतरची लढाई तीनशे धावांच्या पलीकडे जाण्याची होती. बाबर आझम आणि महम्मद हफिझ यांनी त्यासाठी रचलेला पाया ८८ धावांच्या भागीदारीने भक्कम केला. मॉर्गनने भरवशाचा लेगस्पिनर आदिल रशिदला २२ षटकांनंतर गोलंदाजीस आणले.

त्याने दुसऱ्याच षटकांत हफिझला (१५) चकवले होते; पण त्यावेळी त्याचा सोपा झेल जेसन रॉयने सोडला आणि तो इंग्लंडला चांगलाच महागात पडला. हफिझने त्यानंतर ६२ चेंडूत ८४ धावांची खेळी करून संघाची गाडी टॉप गिअरमध्ये आणली होती. 

या संधीचा फायदा घेत सर्फराझनेही ४४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली; त्यामुळे अखेरच्या दहा षटकांत पाच फलंदाज गमावले असले, तरी पाकिस्तानने ११३ धावांची भर घातली. 

संक्षिप्त धावफलक l; पाकिस्तान ; ५० षटकांत ८ बाद ३४८ (इमान उल हक ४४ -५८ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, फखर झमान ३६ -४० चेंडू, ६ चौकार, बाबर आझम ६३ -६६ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, महम्मद हफिझ ८४ -६२ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, सर्फराझ अहमद ५५-४४ चेंडू, ५ चौकार, ख्रिस व्रुक्‍स ८-१-७१-३, मोईन अली १०-०-५०-३, मार्क वूड १०-०-५३-२) वि.

वि. इंग्लंड ५० षटकांत ५० षटकांत ९ बाद ३३४ (बेअरस्टॉ ३२ -३१ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, ज्यो रूट १०७ -१०४ चेंडू, १० चौकार, १ षटकार, जॉस बटलर १०३ -७६ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, शादाब खान १०-०-६३-२, महम्मद आमेर १०-०-६७-२, वाहेब रियाझ १०-०-८२-३)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News