एनर्जी ड्रिंक्‍स पिल्याने हे होणार आजार! सांभाळा स्वत:ला

डॉ. प्रदीप गाडगे
Monday, 10 June 2019

कोणतेही नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक, ज्यामध्ये कॅफिन, टॉरिन (अमिनो ॲसिडचा प्रकार) आणि व्हिटॅमिन व अन्य घटक असतात, अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात. मात्र, एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर; तसेच आपल्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

आजकाल तरुणाईला एनर्जी ड्रिंक सेवन करण्याची सवय मोठ्या प्रमाणात दिसून येते. एका संशोधनानुसार, एनर्जी ड्रिंकचे नियमित सेवन करण्याची सवय असलेल्या व्यक्तीच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. प्रसंगी नैराश्‍य, मानसिक अस्थैर्य, इतकेच नव्हे; तर स्वतःवरील नियंत्रणदेखील सुटू शकते. कोला किंवा कॅफेनयुक्त इतर पेयांपेक्षा एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचे प्रमाण तिप्पट असते. स्वाभाविकच ही पेयं झटपट ऊर्जा देत असली, तरी ती कालांतराने शरीराला हानिकारक ठरू शकतात. कॅफेनच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, भीती वाटणे, घाम फुटणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा प्रकारच्या समस्या उद्‌भवू शकतात.  

एनर्जी ड्रिंकमुळे शरीरातील कॅफेनचे प्रमाण वाढते; त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. मात्र मेंदू आणि शरीराला किमान ६ ते ८ तास शांत झोपेची आवश्‍यकता असते. एनर्जी ड्रिंकमधील कॅफीनमुळे तुम्हाला झोप येत नाही. त्यामुळे एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे निद्रानाशाचा आजार होऊन नैराश्‍य येते आणि त्याचे रूपांतर पुढे मानसिक आजारामध्ये होते. अगदी थोड्या कालावधीसाठी भरपूर उत्साह, आत्मविश्वास देणाऱ्या या पेयांच्या सेवनाचे विपरीत परिणाम हृदयाच्या चलनवलनावर होत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय, एनर्जी ड्रिंक सेवन केल्यावर मोठ्या प्रमाणात उत्साह येतो. त्या उत्साहाच्या भरात जी शक्ती खर्च होते, त्यामुळे नंतर प्रचंड थकवा येतो.

एनर्जी ड्रिंकमधील उत्तेजित पेय हे हृदयासाठी घातक असतात. मद्यासोबत एनर्जी ड्रिंक प्यायल्यास हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. त्यामुळे मधुमेह होण्याची शक्‍यता असते. एनर्जी ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात असते. ही साखर प्रामुख्याने सुक्रोज, ग्लुकोज किंवा उच्च फ्रूटोज कॉर्न सिरपच्या रूपात असते.

अनेक प्रकारचे स्पोर्टस ड्रिंक व्हिटॅमिन आणि मिनरल्सयुक्त असतात. त्यातदेखील साखरेचे प्रमाण जास्तही असते. एका २००-२५० मिलि एनर्जी ड्रिंकमध्ये साधारणतः आठ चमचे साखर असते. दीर्घ कालावधीत साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढणे आदी आजार होऊ शकतात. तसेच साखरेच्या अधिक प्रमाणामुळे दाताच्या समस्यादेखील उद्‌भवू शकतात. स्पोर्टस ड्रिंकच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रो-इंटेस्टाईनलच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. ज्या व्यक्ती व्यायाम करत नाहीत किंवा शारीरिक हलचाली ज्यांच्या कमी प्रमाणात होतात अशा व्यक्तींनी स्पोर्ट ड्रिंकचे सेवन केल्यास वजनवाढीस नक्कीच कारणीभूत ठरू शकते. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते, लहान आणि किशोरवयीन मुलांनी एनर्जी ड्रिंकचे सेवन करू नये.

वारंवार या एनर्जी ड्रिंकचे सेवन न करता कधीतरी हे पिण्यास हरकत नाही. मात्र, याचे व्यसन नक्कीच आरोग्याला घातक ठरू शकते. शारीरिक ऊर्जेसाठी मुलांनी समतोल आहाराचे सेवन करणे आवश्‍यक आहे. पुरेशी झोप आणि समतोल आहार हे ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. जीवनशैलीत अचूक बदल केल्यास प्रत्येक व्यक्तीला  

निरोगी आयुष्य जगता येऊ शकते. ऊर्जा मिळविण्यासाठी एनर्जी ड्रिंकचे सेवन न करता नैसर्गीकरीत्या ऊर्जा  मिळविण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. 

 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News