जाणून घ्या ईदला ‘शीरखुर्मा’ का बनवतात...

प्रशांत ननावरे
Wednesday, 5 June 2019

‘ईद-उल-फितर’ हा अरबी भाषेतील शब्द असून ‘ईद’ म्हणजे ‘आनंद’ आणि ‘फितर’ म्हणजे ‘दान करणे’, असा त्याचा अर्थ होतो. या सणाला मुख्यत्वे अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते.

‘ईद’ हा मुस्लिम धर्मातील महत्त्वाचा सण. अफगाणिस्तान, भारतीय उपखंड आणि मध्य आशियामध्ये ‘ईद-उल-फितर’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ‘ईद-उल-फितर’ हा अरबी भाषेतील शब्द असून ‘ईद’ म्हणजे ‘आनंद’ आणि ‘फितर’ म्हणजे ‘दान करणे’, असा त्याचा अर्थ होतो. या सणाला मुख्यत्वे अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तींना ‘ईद’च्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आलेली आहे. ‘जकात’ ही साधारणपणे ‘ईद’च्या आधी दिली जाते. जेणेकरून संपूर्ण समाज या आनंदात सहभागी होऊ शकेल. मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ‘ईद’च्या शुभेच्छा देतात आणि त्यानंतर ‘शीरखुर्मा’ या गोड पदार्थाचे वाटप करून सणाचा आनंद साजरा करतात. म्हणून या ईदला ‘मिठी ईद’ असेदेखील म्हणतात. 

‘शीरखुर्मा’ किंवा ‘शीरखोर्मा’ हा खरं तर मुस्लिम सणांमध्ये तयार केला जाणारा न्याहरीचा पारंपरिक पदार्थ आहे. जो त्या दिवशी घरी येणाऱ्या लोकांना देऊन त्यांचा पाहुणचार केला जातो. पर्शियन भाषेत ‘शीर’ म्हणजे ‘दूध’ आणि ‘खुर्मा’ म्हणजे ‘खजूर’ होय. इतिहास असं सांगतो की, सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात खजुराची शेती होत असल्याने लोक खजूर खाऊन उपवास सोडत असत. ती परंपरा आजही सुरू आहे. नंतर त्यांनी दूध आणि खजुराचा गोड पदार्थ तयार केला; जो प्रत्येक मुस्लिम घरात ‘ईद’च्या दिवशी बनवला जातो. पण यामध्ये शेवयांचा समावेश कधी आणि कोणी केला याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. बाराव्या शतकात व्हेनिस येथे जन्मलेला व्यापारी, प्रवासी, लेखक मार्क पोलो याने शेवयांचा शोध लावला, असं म्हटलं जातं. चीन, जपान, हाँगकाँग, कोरिया, मंगोलिया या देशांच्या दौऱ्यात मार्कने प्रथम शेवयांची दखल घेतली आणि त्यानंतर संपूर्ण जगाला त्याची माहिती झाली. 

‘शीरखुर्मा’ हा गरम किंवा थंड अशा दोन्ही पद्धतीने खाल्ला जातो. खजूर हे मुळातच गोड असल्याने यामध्ये साखर टाकली जात नाही आणि त्यामुळे पदार्थाची मूळ चव कायम राहते. पंधराव्या शतकात मुघलांसोबत अनेक पदार्थ भारतात आले. ‘शीरखुर्मा’ हासुद्धा त्यापैकीच एक असं म्हणता येईल. मुघल खानसामे शाही चवीला न्याय देण्यासाठी रात्रभर मोठमोठ्या हंड्यांमध्ये दूध आणि खजूर एकत्र करून उकळवत ठेवत असत. म्हणूनच घट्ट आटवलेला ‘शीरखुर्मा’ अधिक लज्जतदार लागतो.    

मुस्लिमांच्या घरी शेवयांची खीर बनवतानाही दोन पद्धतीने बनवली जाते. त्यांची नावे अनुक्रमे ‘शीरखुर्मा’ आणि ‘किमामी शेवया’ अशी आहेत. ‘शीरखुर्मा’ हा फारसा घट्ट नसतो; परंतु ‘किमामी शेवया’ या शुद्ध तुपात तयार केलेल्या पदार्थामध्ये भरपूर सुका मेवा घालतात आणि इलायचीचा सुगंध दरवळत असतो. भारतातील लखनौ, बनारस, अवध या प्रदेशात किमामी शेवया अधिक प्रसिद्ध आहेत.
 nanawareprashant@gmail.com
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News