शिकलेला मुलगा हुंडा घेण्यासाठी तयार असतो का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • लग्न करताना हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा असला तरी समाजात हुंडा पद्धती सुरु आहे.

आजचा समाज प्रगतीकडे वाटचाल करतोय, मात्र समाजात आजही शिकलेली माणसं जुन्या चालीरिती, परंपरा पाळतात. लग्न करताना हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा असला तरी समाजात हुंडा पद्धती सुरु आहे. मुले कितीही शिकली तरी समाजातून हुंडा हद्दपार झाला नाही. 'शिकलेला मुलगा हुंडा घेण्यासाठी तयार असतो याकडे तुम्ही कसे पाहता?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

शिकलेला मुलगा हुंडा घेण्यासाठी तयार होतो यावरूनच त्याच्या विचारात असलेलं मागासलेपण दिसून येत. लग्न म्हणजे व्यवहार न्हवे हे लोकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज लोक बदललेल्या काळाच्या, पिढीच्या गोष्टी करतात. स्वतःला नव्या विचारांचे म्हणवून घेतात... ही गोष्ट चांगलीच आहे, परंतु कृती ही तितकीच महत्त्वाची असते. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे जर हुंडा घ्यायला आणि द्यायलाही तयार असतील तर कदाचित आपण अजून खूप मागे आहोत... फक्त नव्याचा मुखवटा घालुन फिरणारे.
- मेघना जाधव.

अजूनही काही जिल्ह्यात जो जास्त हुंडा घेतो ती पार्टी म्हणजे खूप मोठी आणि जो कमी हुंडा घेतो ती म्हणजे थर्ड क्लास हा समज आहे.  डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, एवडा हुंडा घेईन ( लाखांच्या घरात ) आपली पार्टी काही कमी नाही. अमूख लाख हुंडा आणि एवडे तोळे सोनं बोला फोडायची का सुपारी. तोंडात मावा आणि लाखभर तरी हुंडा हवा हे काय कमी नाहीत. मुलगा शिक्षक आहे संस्थेवर पैसे भरले. नोकरीच काम झालं की मग काही टेंशन नाही फक्त तेव्हडे पैसे द्या म्हणजे बाकी काही नको. मुलींच्या घरच्या लाख हुंडा दिलाय आणि टेम्पो भरून सामान. आपल्याला काही लई मुली हाय व्हय. अहो गरीबाच्या मुलींनी काय करायचं. त्यांच्या बाप्पांनी कुठून आणायचा पैसा. जर दोन मुली झाल्या तर तिसरी मुलगी तो ठेवायला मागत नाही तिसरी पण मुलाच्या अपेक्षेने. कारण गरीब विचार करतो मुलींचं लग्न कसं करणार, कुठून आणार पैसा त्या पेक्षा नकोशी. बर हुंड्याला धरून बालविवाह देखील कारण आहे. लॉकडाऊनमध्ये किती तरी बाल विवाह झाले मोजता येणार नाहीत. समजा एखाद्या मुलाने हुंड्याला विरोध केला तर लई शहाणा नको होऊ आपल्यात चालतं. तू फक्त लग्नाला उभा राहा. आम्ही बघून घेऊ. (मध्यस्ती) तू काय येडा आहेस का? काल लाखात पार्टी जुळून दिली. आणि आपण काहीच नाही घ्यायचा अस कस होईल. आमच पोरगं हुंडा नाही घ्यायचं म्हणतंय पोरगी देऊ नको बरं, त्या पोरात नक्की काही तरी दोष असणार हाय. म्हणजे एखाद्याने हुंडा नाकारला तर त्याला अशा वाक्यांना सामोरे जावे लागते. अजूनही मुलींना अशा विषयावर बोलण्याचा अधिकार नाही ही खंत आहे. हुंडा पद्धतीने मानसिकता सुद्धा बद्दली आहे. आणि हुंडा देऊन सुद्धा आज कित्येक मुलींच नुकसान झालय हे भरून काढण्यासारखं नाही. कारण जो हुंडा देतो तो हुंडा घायला उभा रहातो. कायद्याने हुंडा बंदी कधीचं झाली आहे पण छुप्या पद्धतीने घेणारा हुंडा आपण जो पर्येंत ही पद्धत बंद करत नाही तो पर्येंत चांगल्या मुला/मुलींना त्यांच्या योग्य स्थळ मिळणार नाहीत.
-संदिप सुखदेव पालवे .

खरं आहे आज मराठवाड्यात हुंडा किती  घेतात याच्यावर त्याची किंमत कळते प्रत्येकाचे रेट ठरलेले आहेत अनुदानीत कॉलेजचा प्राध्‍यापक  रेट वीस ते पंचवीस लाख आहे एखाद्याने हुंडा नाकारला तर त्याच्या मध्ये काहीतरी नकीच प्रॉब्लेम आहे असे लोक म्हणतात अशी लोकांची मानसिकता झालेली आहे .माझ्या एका मित्राने देशमुख नावाचा त्याने गुंडा  न घेण्याचे ठरवले पण लोक त्याच्याकडे संशयाने बघू लागले .हुंडा का घेत नाही नक्कीच त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अशी समाजाची त्याबद्दल मानसिकता बनली आहे . प्रत्येकाचे रेट ठरलेले आहे जेवढा पगार जास्त आणि सरकारी नोकरी असेल तर तेवढा हुंडा जास्त भेट जो हुंडा घेत नाही त्याला समाजात मान भेटत नाही त्याला वेडा समजले असते जाते. आजकालचे प्रशासकीय अधिकारी पण बघा मोठ्या मोठ्या गप्पा मारतील पण हुंडा मात्र रेटून घेतील. 50 लाख ,एक कोटी रेट अधिकार्‍यांचे पण ठरलेल्या आहेत जमीन किती आहे पुन्हा किती मदत करू शकतात मुलगी एकुलती एक आहे का अशा अनेक गोष्टी लग्नापूर्वी विचार करून लग्न करतात. मसणात आदर्शवादी गप्पा मारते पण आयुष्यात जे करायचे तेच करते अशीही दुटप्पी भूमिका शिकलेले तरुण पण घेतात.
- डॉ. रामकृष्ण भिसे

माझं मत थोडसं वेगळं आहे, अजूनतरी लग्न केल्यानंतर मुलगी  मुलाच्या घरी जाते, त्यामुळे हुंडा हा छुप्या मार्गाने अजूनही घेतला जातो. जेव्हा लग्न करून मुलगा मुलीच्या घरी जाईल तेव्हा हुंड्याचा प्रकार बंद हॊईल अस मला वाटतं.
- महेश घोलप

मुळात हुंडा घेणे ही चुकीची बाब आहे. त्यातून जर शिकलेला मुलगा हुंडा घेत असेल तर मग त्याचा शिक्षण घेऊन काही अर्थ नाही. म्हणजे त्यांना शिक्षण हे फक्त पास होण्यापूर्ती घेतल असेल अस मला वाटत. काही ठिकाणी मी पाहिले आहे की, उच्च शिक्षित मुलगा हुंडा नको बोलतो पण त्यांचे आई-वडील हुंडा मागतात पण तो त्या गोष्टीसाठी तयार नसतो. मग तेव्हा मतभेद होत खूप त्यातून दोन गोष्टी घडतात. एकतर मुलीकडचे हुंडा देण्यास तयार होतात. कारण त्यांना वाटत की, मुलगा चांगला शिकलेला आहे. घरीची चांगली आहेत मुलांच्या सुखासाठी आपण हुंडा देऊ आणि दुसर म्हणजे हुंडा नाही दिल तर एवढ चांगल स्थळ आलेल जाईल. असा मुलीच्या आई वडिलांचा विचार असतो. पण मला एक सांगायच मुलीची आई-वडील मुलांच्या घरचे चांगले आहेत असा विचार कसा करतात. जर ते चांगले असते तर हुंडा मागितलाच नसता. मुलींच्या आई वडीलांना मुलीच सुख कळत मग मुलांच्या आई-वडीलांना मुलांच सुख कळत नाही का? कधी-कधी तर मी साताऱ्याच्या इकडे पाहिले आहे की, हुंडा दिला नाही म्हणून भर मांडवातून मुलाला घेऊन जातात.  शिकलेला मुलगा असतो त्याला आई -वडीलांच्या पुढे काही बोलता येत नाही, हे मला मान्य आहे पण त्यांने त्यांच्या आई-वडीला जर व्यवस्थित समजून सांगितले तर त्यांना सुध्दा त्यांचे म्हणणे पटू शकते. अनेक मुला-मुलींचे संसार या हुंडामुळे अर्धवट राहिले आहेत.  मुलांचे आई किंवा वडील सांगतात नाही त्याच एवढं शिक्षण झाल आहे. मी त्याच्या शिक्षणावर खूप खर्च केला आहे. म्हणजे मला वाटत त्याला तुम्ही शिकवलं हे काय लग्नात मुलींच्या वडिलांन कडून हुंडा घेण्यासाठी का?  पैशाच्या स्वरूपात हुंडा मागतात तो वेगळा आणि नंतर वरून म्हणतात की, काही तुमच्या मुलीच्या अंगावर चार दागिने घाला आणि बोलततात ते काय आम्हाला नको तुमच्याच मुलीला देणार आहेत. 

आता तर काय नविन पध्दत आली आहे, हुंडा मागण्याची म्हणजे कायद्याने हुंडा घेणे आणि देणे चुकीच आहे. म्हणून मुलांचे आई-वडील म्हणतात.  आम्हाला हुंडा नको तुमच्याकडून असे बोलतात. मग मुलींच्या आई-वडीलांच्या चेहऱ्यावर एक स्मित हस्य येते. पण त्या नंतर त्यांची अट असते ते म्हणतात की, हुंडा नको पण लग्न संपूर्ण तुम्ही करायच म्हणजेच लग्नाला जेवढा खर्च होईल तो सगळा तुम्ही करायचा. आता अशा पध्दतीत हुंडा मागितला जातो अस माझ मत आहे. मुलीचे आई-वडील मुलींच्या सुखासाठी ह्या सर्व गोष्टी करण्यास तयार होतात. पण मुलगी कधीच तयार नसते. कारण तिने लहान पणापासून वडीलांना कष्ट करताना बघितलं आहे. आपल्या वडीलानकडे काय आहे हे तिला माहिती असत. मग वडिल कर्ज करून थाटा माटात लग्न करून देतात. मुलाकडच्या लोकांना पाहिजे तसे ते लग्न लावून देतात. मुलांकडच्या लोकांना फक्त समाजाला दाखवायच असत की, आम्ही आमच्या मुलांच लग्न कस थाटात केल आहे. एवढच कारण असत मग ते स्वत: काही खर्च करत लग्नात हा मला प्रश्न नेहमी पडतो. मुलींच्या आई-वडीलांवर जिवावर मिजास करतात असे मला वाटते.

मुलगी पण शिकलेली असते पण त्यांच त्या मुलांकडच्या लोकांना काही घेण-देण नसत. त्या मुलींच्या आई-वडीलांनी रक्ताच पाणी करून लहानाची मोठी केली असते. तिच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन तिला शिकवलेल असत. एवढं सगळ करून सुध्दा मुलींच्या वडिलांनी मुलांकडच्याना हुंडा द्याच. पण मुलीच्या वडीलांना पण हे काही पटत नसत पण आपल्या मुलीला या घरात काही कमी पडणार नाही हा त्यांचा भाबडा गेैरसमज असतो. मुलाच्या आई-वडीलांना काय वाटते की, त्यांची मुलींची बाजू आहे. म्हणजेच मुलांकडेचे मुलींच्या वडिलांना पाण्यात बघत असतात. मला कधी-कधी  वाटत हे जेव्हा मुलींकडून हुंडा घेतात म्हणजे ते त्यांच्या मुलाला विकतात. ते मुलीच्याच घरात त्या मुलांची बोली लावतात अस मला वाटत. सगळेच मुलांचे आई-वडील सारखे नसतात. काही मुलांचे आर्-वडील असे देखील म्हणता की, फक्त नारळ आणि मुलगी द्या. पण समाजात काही असे देखील मुलांचे आई-वडील असतात की, त्यांना भरपूर प्रमाणात हुंडा पाहिजे असतो.  काही जण म्हणतात मुलीचा जन्म हा गरीबाच्या घरी नको कारण पुढे जाऊन खूप सहन करवा लागत बोलतात. पण माझ व्यक्तिक मत अस आहे की, ज्या घरात मुलगी आहे ते घर खरं श्रीमंताच घर आहे.  कारण स्वत:च्या पोटचा गोळा देण्यासाठी मोठ काळीज लागत आणि ते फक्त एक मुलीचा बापचं करू शकतो. आणि म्हणून तो हुंडा देण्यासाठी तयार होतो कारण तो विचार करतो की, मी माझं काळीज त्यांना देतो आहे मग तिच्या पुढे पैसे काय आहे तो देखील देऊच की, पैसे परत कमावता येतील. हुंडा मागताना फक्त मुलांच्या आई-वडिलांनी विचार करावी की, आपण आपला मुलगा त्यांना विकतो आहे का? म्हणूनच मला वाटत की, देवा पण अशाच घरात मुलगी देतो, ज्या घरात तिला व्यवस्थित संभाळ होईल.
- रसिका जाधव

हुंडा देणे आणि घेणे कायद्याने बंद केले तरी समाजात सर्रासपणे सुरु आहे. यामागची मानसिकता समजून घेणे महत्त्वाचे आहेत. आपली मुलगी चांगल्या घरात दिली पाहीजे, मुलागा नोकरीवाला, शिकलेला किंवा मोठा व्यवसाईक असावा असे बहुसंख्ये आई- वडिलांना वाटते. त्यामुळे उच्च शिक्षित, नोकरीवाला, व्यावसाईक मुलाला विकत घेण्याची स्पर्धा सुरु होते. मुलांचे आई- वडील पैसे, सोने, गाडी, बंगला असा स्वरुपात बोली लावतात. मुलाला वाटत कोणतेही कष्ठ न करता सहज सर्वकाही मिळत आहे, त्यामुळे मुलगा हुंड्याला होकार देतो. 
- स्वप्नील भालेराव

जो शिकलेला मुलगा हुंडा घेण्यासाठी तयार असतो, मुळात तो शिकलेला नसून हुकलेला मुलगा असतो असे मला वाटते. मुळात आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. येथे स्त्री आणि पुरुष दोघेही समान मानले जातात. स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. आज स्त्री ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे मग ती राष्ट्रपती पद, अंतराळवीर, डॉक्टर, वकील, अशा एक ना अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. पण आजच्या काळात हुंडा पद्धत नावाचा राक्षस सर्वत्र दूरवर पसरलेला दिसून येतो. मागासलेल्या या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विक्राळ रुपात पोहोचलेली आहे. मुळात हुंडा घेणे ही प्रथाच चुकीची आहे. पण आपला सुशिक्षित समाज हा हुंड्याला जास्त प्राधान्य देत आहे. मुख्य म्हणजे मुलाचे आईवडील यांना हुंड्याची जास्त आस लागलेली असते. मुलगा चांगला चार पैसे कमवणारा आणि शिस्तबद्ध असल्यामुळे मुलीचे आईवडील कर्जबाजारी होऊन सुद्धा लग्न करून देतात. आणि त्यानंतर त्यांच्यावर आत्महत्येचे वेळ आलेली असते. या हुंड्याच्या हट्टासापायी आज कितीतरी मुलींना आणि तिच्या आईवडिलांना आत्महत्येला बळी पडावे लागते. लग्न म्हणजे दोन गावे, दोन घरे, दोन तालुके, दोन जिल्हे दोन शिकलेली कुटुंबे यांचे नाते जुळले जातात. मुख्य म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे जमपलेला पोटच्या गोळ्याला, आईबापांच काळीज असलेल्या मुलीचा हात कोणत्याही प्रकारचा विचार न करता मुलाच्या हातात दिला जातो त्यात ही हुंड्याची प्रथा त्यांना मेटाकुटीला नेऊन सोडते. त्यामुळे हुंडा ही प्रथाच बंद होणे गरजेचे आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या पारनेर तालुक्यामध्ये हुंडा ही प्रथाच बंद आहे. आमच्याकडे फक्त तुमची मुलगी द्या दुसरं काही नको आम्हाला असे बोलले जाते. आणि जर एखाद स्थळ आले तर आईबाप स्वतः सांगतात की आम्ही फक्त मुलगी देऊ पटत असेल तर करा नाहीतर जाऊद्या त्यामुळे मला असे वाटते प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी एकच विचार केला की मुलगी सोडून काही मिळणार नाही तर नक्कीच हुंडा ही प्रथा बंद होईल असे मला वाटते.
- शिल्पा नरवडे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News