प्रत्येक भाषा ही चालते-बोलते विद्यापीठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020


‘नवीन भाषा शिका’

  • देवाने माणसाची निर्मिती गोष्ट सांगण्यासाठी केली.
  • प्रत्येक माणूस म्हणजे एक गोष्ट आहे. त्यामुळे जितक्‍या जास्त भाषा तुम्ही शिकाल, तितक्‍या त्या भाषांतील गोष्टी तुम्हाला कळतील; माणसे कळतील, असा सल्ला सौमित्र यांनी दिला. कोणतीही नवीन भाषा शिकणे आनंददायी गोष्ट असते, असे ते म्हणाले.

मुंबई : आई म्हणजे विद्यापीठ असते. त्याचप्रमाणे प्रत्येक भाषाही विद्यापीठच असते. हे विद्यापीठ तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करते, अशी भावना अभिनेते, कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी व्यक्त केली. माणसाने मात्रुभाषेसह दोनपेक्षा जास्त भाषा शिकल्या पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी गुरुवारी मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई महापालिका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केले. 

मराठी भाषा दिन आणि संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून गुरुवारी मुंबई महापालिका सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला महापालिकेच्या संगीत विभागाने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ आणि अन्य मराठी गीते सादर केली. या कार्यक्रमाला नगरसेवक, भाषाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कवी सौमित्र यांनी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज आणि स्वतःच्या काही कविता सादर केल्या.

 
आईची तुलना अन्य कोणाशीही करता येणार नाही. मराठी भाषेला आईसारखेच जपले पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईतील दुकाने आणि अमेरिकन कॉन्सुलेटवरील फलक मराठीत लावण्याची सक्ती करावी. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. 

या वेळी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाला उपमहापौर ॲड्‌. सुहास वाडकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News