तरुणाई मध्ये ई-सिगारेटची वाढती क्रेझ

नेत्वा धुरी
Monday, 3 June 2019

हल्ली ई-सिगारेट शाळा, महाविद्यालयांजवळच्या गिफ्ट शॉप्समध्ये मिळत असल्याचं दिसतंय. 

परवा एका नातेवाईकांच्या घरी जाणं झालं. मुलानं बारावीत चांगल्या श्रेणीत गुण मिळवल्याने मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं मित्रांसोबतचं स्पेशल सेलिब्रेशन कसं पार पडलं, याबाबतची चर्चा रंगलेली असताना आपल्याला मिळालेलं मित्रवर्गाकडून ई-सिगारेटचं गिफ्ट बघताच त्याला या भलत्या गिफ्टचा धक्काच बसला. आठवण म्हणून मित्रांनी एकमेकांना ई-सिगारेट गिफ्ट दिली होती. ई-सिगारेट आजकाल सगळीचं मुलं घेतात, अशा वक्तव्यानं त्यांचं सुरू झालेले बोलणं, ई-सिगारेट ओढण्याविषयीचं कुतूहल हे सगळं ऐकताना तरुण पिढी किती सहजतेने ई-सिगारेटच्या जाळ्यात ओढली जातेय, याची अनामिक भीती वाटली.

हल्ली ई-सिगारेट शाळा, महाविद्यालयांजवळच्या गिफ्ट शॉप्समध्ये मिळत असल्याचं दिसतंय. पॉकेटमनी म्हणून साठवलेल्या बजेटमध्ये ई-सिगारेट सहज मिळत आहे. मुलांमधील वाढती क्रेझ लक्षात घेण्यासाठी नुकतंच याबाबतच सर्वेक्षण करण्यात आलं. ‘सलाम फाऊंडेशन’च्या वतीने मुंबईतील ३०६ तरुणांपैकी ३३ टक्के मुलं ई-सिगारेटच्या आहारी गेल्याचं सर्वेक्षणात मांडण्यात आलंय. त्यापैकी ५६ टक्के मुलं ई-सिगारेट हा सुरक्षित पर्याय असल्याचा दावा करताहेत. ई-सिगारेट हा पर्याय कितपत सुरक्षित याबाबत आता गोंधळजनक हवालाही कित्येक जण प्रसिद्ध करताहेत. असाच एक अहवाल नुकताच वाचनात आला.

कॅटानिया विद्यापीठातील ‘इंटरनल मेडिसीन आणि क्‍लिनिकल इम्युनोलॉजी’ संस्थेचे संचालक रिकार्डो पोलोसो यांनी ई-सिगारेटबाबत बऱ्यापैकी सकारात्मक भूमिका मांडली आहे. ई-सिगारेट जवळपास ९५ टक्के सुरक्षित असल्याचा दावा ते करतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ‘क्रोनिक ऑबस्ट्रॅक्‍टिव्ह पल्मनरी डिसोर्डर’ (पीसीओडी) हा आजार फार भयावह आहे. रिकार्डो यांच्या मते ई-सिगारेटच्या सेवनाने सीओपीडीची संभाव्यता फार कमी आहे. मात्र त्यातील निकोटीनचा अंश मात्र शरीराला घातक असल्याने ई-सिगारेट नकोच, अशी मागणी भारतीय वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.

ई-सिगारेट पारंपरिक सिगारेटच्या तुलनेत कमी अपायकारक असल्याचा दावा केला जातोय.  ई-सिगारेट हा ज्वलनशील आणि उत्तेजक पदार्थ आहे. हाफकिन या औषधनिर्मिती केंद्राचे माजी संचालक डॉ. अभय चौधरी ई-सिगारेटच्या सेवनाला कडाडून विरोध करतात. रक्तापासून ते शरीराच्या प्रत्येक अवयवावर निकोटीन घातक परिणाम करते. ई-सिगारेटचे व्यसन युवापिढीला लवकरच वेगवेगळ्या आजारांमध्ये विळखून टाकेल, अशी भीती डॉ. चौधरी व्यक्त करतात.

ई-सिगारेटचे असंख्य धोके आहेत. बॅटरीवर चालणारी ई-सिगारेट प्रसंगी फुटण्याची शक्‍यता असते. ती शरीरातील ॲण्टीओक्‍साईट तयार करण्यासही प्रतिबंध निर्माण करतात. ई-सिगारेटमुळे पारंपरिक धूम्रपानाकडेही कालांतराने तरुणाई वळण्याची शक्‍यता असते, त्यामुळे सिगारेटच्या व्यसनाचेही दुष्परिणाम माणसाच्या शरीरात दिसून येतात. कर्करोगापासून ते शरीरात अन्य दोष निर्माण होईपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ, निकोटीन घातक आहे. त्यामुळे या पारंपरिक आणि अपारंपरिक तंबाखूजन्य पदार्थांपासून तरुणाईने लांबच राहिलेलं फायदेशीर ठरतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News