उदगीर : सध्या सर्वत्र कोरोनाचीच चर्चा होत असलेली दिसते. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहून प्रत्येकजण स्वतःची काळजी घेताना दिसतोय. संचारबंदी सुरू झाल्यापासून हातावर पोट असणार्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा कामगारांना शहरातील सेवाभावी संस्था व काही दानशूर व्यक्तींनी अन्नधान्याची मदत केली आहे. या दानशूरांच्या मदतीने संचारबंदीत गरिबांना जगण्यासाठी मोठा आधार दिला. अशा अडचणीच्या वेळी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने चालू असले पाहिजेत. मात्र शहरातील अनेक खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी कोरोनाला घाबरत दवाखाने बंद केले असताना उदगीरात एका डॉक्टर दाम्पत्याने गरिबांना मोफत आरोग्य सेवा देत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.
डॉ. सचिनकुमार व डॉ. अश्विनी टाले यांचे नाईक चौक, उदगीर येथे विश्वा क्लिनिक आहे. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा करणाऱ्या या डॉक्टर दाम्पत्याची अल्पावधीतच उदगीर व परिसरातील रुग्णांना ओळख झाली ती त्यांच्या सेवाभावामुळेच..! कोरोना संचारबंदी सुरू झाल्यापासून डॉ. सचिनकुमार व डॉ. अश्विनी टाले यांनी आपल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून एक हेल्पलाईन नंबर सुरू केला. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी रुग्णांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक मोबाईल नंबर दिला आहे. संचारबंदीच्या काळात दवाखान्यापर्यंत येणे शक्य नसल्यामुळे ही हेल्पलाइन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अडचणीच्या वेळी ते स्वतः रुग्णांच्या घरी जातात व गरीब रुग्णांना मोफत सेवा देतात. संचारबंदीच्या कालावधीत या डॉक्टर दाम्पत्याने गरिबांसाठी केलेली मोफत आरोग्य सेवा ही समाजासमोर आदर्श निर्माण करणारीच आहे.
विशेष म्हणजे गरजूंना मोफत आरोग्य सेवा देताना त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत त्यांना प्रसिद्धीचा कसलाही हव्यास नाही हे त्यांच्या कार्यातून सूचित होते. रुग्णांनी किंवा इतर मंडळींनी गरीब रुग्णांची माहिती दिली तर ते तात्काळ त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करतात. रुग्णांच्या घरी जाताना स्वतःजवळ असलेली गोळ्या औषधे ते घेऊन जातात. व रुग्णांना मोफत गोळ्या औषधाचे वाटपही करतात. सध्याच्या या भयावह परिस्थिती डॉ. सचिनकुमार व डॉ. अश्विनी टाले यांच्या मोफत रुग्ण सेवेबाबत असंख्य गरजू रुग्णांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
फक्त कोरोना संचारबंदीत या डॉक्टर दांपत्याचे मोलाचे योगदान नसून इतर वेळीही ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ग्रामीण भागात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात हे दांपत्य मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करत आहे. रक्तदान शिबिर, मोफत रोग निदान शिबिर असे विविध उपक्रम ते सतत शहरात राबवत असतात.
शंकांचे निरसन करण्यासाठी रुग्णांनी 9405048466 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. सचिनकुमार टाले यांनी केले आहे. कोरोना संचारबंदीत त्यांच्याकडून होत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श कार्याबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.