दुर्गाडी किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

‘अशीच आमची आई असती सुंदर रूपवती,

आम्ही ही सुंदर झालो असतो...’

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले हे उभ्दार! हा शिवकालीन इतिहास ताजा करतो तो कल्याणचा इतिहासकालीन दुर्गाडी किल्ला आणि त्या भोवतीचा परिसर. कल्याणच्या खाडीकिनारी हा किल्ला उभा आहे, मराठी आरमाराचा साक्षीदार म्हणून इतिहासप्रेमींना आणि शिवबांच्या भत्त्कांसाठी सहजसफर करण्याचे हे एक महत्त्वाचे ठिकाण.

सातवाहन काळापासून कल्याण हे एक महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जात होते. १६५७ पर्यंत कल्याणचा ताबा आदिलशाहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचे महत्त्व जाणून छत्रपतींनी कल्याणमधील खाडीकिनारी किल्ला बांधण्याचे ठरविले. किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांना तिथे अमाप संपत्ती सापडली. देवी दुर्गेच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडली आहे, असे समजून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले आणि त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले.

कल्याण रेल्वे स्थानकापासून अर्धा तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आणि तटबंदी आहे. किल्ल्याचे बरेचशे अवशेष काळाच्या ओघाता नष्ट झाले. त्यामुळे किल्ला पाहण्यास अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे. गडावर जाण्यासाठी प्रवेशव्दार आहे. मात्र मूळ प्रवेशव्दार नष्ट झाले आहे. मात्र तेथील बुरूज शाबूत आहे. प्रवेशव्दारासमोरच गणेशाची मूर्ती असून, पूर्वी येथील प्रवेशव्दाराला गणेश दरवाजा असे नाव होते. किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात नव्याने प्रतिस्थापना केलेली देवीची मूर्ती असून, पुरातन मूर्तीही मंदिरात ठेवण्यात आलेली आहे. मंदिराची बांधणी आज मजबूत स्थितीत आहे. नवरात्राच्या काळात या मंदिरात भविकांची प्रचंड गर्दी असते. अन्य दिवशीही भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. किल्ल्याच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी आणि बुरूजाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरील बरेचशे अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले आहे. हा परिसर संवेदनशील असल्याने किल्ल्यावर नेहमीच पोलिसांचा पहारा असतो. त्यामुळे किल्ल्यावरील बराचसा भाग पाहता येत नाही. किल्ल्याच्या बाजूलाच खाडीकिनारी गणेश घाट हे रमणीय ठिकाण आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यामुळे या भागाला गणेश घाट हे नाव पडले.

महापालिकेने येथे सुंदर बाग फुलविली होती, मात्र दुर्लक्ष केल्याने या बागेची दुरवस्था झाली. परंतु संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बोटिंगचीही व्यवस्था असून, सायंकाळच्या वेळेत खाडीचा झोंबरा वारा खात तरूणाई येथे जमलेली असते. दुर्गाडी किल्ल्यावरून गणेश घाटाचे आणि कल्याणच्या खाडीचे नयनरम्य दृष्य दिसते. ते पाहताना छायाचित्रण करण्याचा मोह आवरता येत नाही.

दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला अनेक इतिहासकालीन ठिकाणे आहेत. जवळच सुभेदार वाडा आहे, जिथे कल्याणच्या सुभेदाराचे निवास्थान होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News