निकाल घटल्याने शिक्षक-पालक नाराज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • दहावी परीक्षेत २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची सुरू झाली  आहे पद्धत
  • ही पद्धत अचानक बंद केल्याने  मुख्याध्यापकांनी  दर्शवला होता विरोध

मुंबई : शिक्षण विभागाने यंदापासून दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण देण्याची पद्धत बंद केली. यामुळे दहावी परीक्षेच्या निकालात विक्रमी घसरण झाली आहे. निकाल कमी लागल्याने शिक्षण तज्ज्ञ, मुख्याध्यापक आणि पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इतर मंडळांमध्ये विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य मंडळाबाबत पालकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

दहावी परीक्षेत २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पद्धत सुरू झाली. ही पद्धत अचानक बंद केल्याने त्याला मुख्याध्यापकांनी विरोध दर्शवला होता. यानंतरही शिक्षण मंडळाने आपला निर्णय कायम ठेवत यंदापासून अंमलबजावणी केली. याचा फटका आजच्या निकालातून दिसून आला. अनेक विद्यार्थी यामुळे अनुत्तीर्ण झाले आहेत; तर शाळांचा निकालही यंदा घसरला आहे. सीबीएसई, आयसीएसई मंडळांमार्फत अंतर्गत गुण देण्यात येतात. या तुलनेत राज्य मंडळाने अंतर्गत गुण देणे बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश धोक्‍यात आला असल्याने पालक संतप्त झाले आहेत.

या निर्णयाला मुख्याध्यापकांनीही विरोध दर्शवला होता. यानंतरही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय मंडळाने घेतला नाही. मंडळाने घेतलेला हा निर्णयच मंडळ संपवण्यास कारणीभूत ठरू शकतो. पालक आपल्या मुलांना राज्य मंडळाच्या शाळांऐवजी सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या शाळांत प्रवेश घेतील, अशी भीती मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केली.

मनोबल खचण्याची भीती
विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याची पद्धत रद्द करून मंडळाने चांगले केले नाही. ही पद्धत बंद करण्याऐवजी ते योग्य पद्धतीने कसे देता येतील याबाबत उपाययोजना करणे अपेक्षित होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या नापास होण्यावर झाला आहे. यामुळे मुलांचे मनोबल खच्ची होते. यातून मुले असामाजिक गोष्टींकडे वळतात. या निकालामुळे मुंबई, पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश घेताना अडचणी येणार आहेत. या निर्णयाने राज्य मंडळाबाबत पालक विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊन विद्यार्थी इतर मंडळांकडे जातील, अशी भीती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News