कोरोनामुळे भारतीय नेमबाजी संघाचा वर्ल्ड कप मधून काढता पाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

भारताने माघार घेतली असली तरी सायप्रसमध्ये कोरोना विषाणूचा एकही संशयित सापडलेला नाही

नवी दिल्ली: टोकियोमधील ऑलिंपिक स्पर्धा नियोजित वेळेत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत असला; तरी जागतिक स्पर्धांना कोरोना विषाणूचा विळखा अधिक तीव्र होऊ लागला आहे. सायप्रस येथे ४ ते १३ मार्चदरम्यान होणाऱ्या विश्‍वकरंडक शॉर्टगन नेमबाजी स्पर्धेतून भारताने माघार घेतली आहे. त्याचवेळी किर्गिस्तान येथे याच महिन्यात होणारी आशियाई ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धा बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना विषाणूमुळे आम्ही शॉर्टगन नेमबाजी स्पर्धेतून माघार घेत आहोत, केंद्राकडून सांगण्यात आले आहे, असे भारतीय नेमबाजी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. चीनच्या वूहान शहरातून सुरू झालेल्या या विषाणूचा प्रदूर्भाव जगात 80 हजार लोकांना झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारताने माघार घेतली असली तरी सायप्रसमध्ये कोरोना विषाणूचा एकही संशयित सापडलेला नाही, परंतु सावधगिरी बाळगण्यात येत आहे. भारतीय संघाने स्वतःहून माघार घेतलेली असली तरी दिल्लीत 16 ते 26 मार्च दरम्यान विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा नियोजित आहे, पण त्यातून चीनसह काही देशांनी अगोदरच न खेळण्याचा निर्णय कळवलेला आहे.

 

 किर्गिस्तानच्या बिशकिक शहरात 27 ते 29 मार्च दरम्यान होणारी आशियाई ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धा बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा अरोदर चीनच्या झियान शहरात याच दिवशी होणार होती. तेथून ती बिशकिक येथे हलवण्यात आली होती. 

  बिशकिक येथे होणाऱ्या स्पर्धेच्या भवितव्याबाबत आम्हाला अजून जागतिक कुस्ती महासंघ किंवा किर्गिस्तान संघटनेकडून अद्याप अधिकृतपणे काहीही कळवण्यात  आलेले नाही, असे भारतीय कुस्ती महासंघाकडून सांगण्यात आले.

  आम्ही जागतिक कुस्ती महासंघाकडे पत्र लिहून विचारणा केली आहे. जो पर्यंत त्यांच्यांकडून काहीच सांगण्यात येत नाही  तोपर्यंत आम्ही कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, असे कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. 

  किर्गिस्तानच्या सरकारी विभागाचे प्रमुख कानत अमानकुलोव यांनी देशात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे एका बैठकीनंतर जाहीर केले. या पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरलेले भारताचे मल्ल मात्र परदेशात सराव करत आहेत, अशी माहिती तोमर यांनी दिली. फ्रिस्टाईल कुस्तीगीर रशियातील मकाचेकालामध्ये, महिला कुस्तीपटू युक्रेनमधील किव येथे तर ग्रीकोरोमन कुस्तीगीर अझरबैजान येथील बाकू शहरात सराव करत आहेत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News