डॉ. सुनिल शिंदे एक समर्पित प्राध्यापक

प्रा. ज्ञानोबा ढगे
Saturday, 23 May 2020

अलीकडील शिक्षण क्षेत्रातील वातावरण बदलत जात असले तरी काही शिक्षक आपले कार्य व्रत घेतल्या प्रमाणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने करीत आले आहेत.असे शिक्षक- प्राध्यापक व्यक्तिगत लाभ किंवा हानीचा विचार न करता ज्ञानदानाचे कार्य मन लावून करताना दिसतात. या मांदिआळीत बसणारे एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे  परभणी येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे संशोधन मार्गदर्शक, पदवी पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल शिंदे सर यांचे! आज प्रदीर्घ सेवेनंतर ते  सेवानिवृत्त होत आहेत. गेली  ३५ वर्ष पदवी आणि १६  वर्ष पदव्युत्तर वर्गाना अध्यापन कार्य करून  सर आज एका आनंदी भावनेने सेवानिवृत्त होत आहेत.

शिक्षणातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असतो. कोणत्याही विद्याशाखेचा अथवा कोणत्याही वर्गाला शिकवणारा  शिक्षक हा ज्ञान निर्माण करणारा आणि ज्ञान वाटप करणारा शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्वाचा  घटक आहे. शिक्षकाच्या आयुष्याची नेमकी उदिष्टे संत तुकाराम महाराजांच्या भाषेत 
“आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने|
शब्दाचीच शस्त्रे यत्न करू|
शब्दूची  आमच्या जीवाचे जीवन|
शब्द वाटू धन जन लोका|”

विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, संस्कार, नितीमुल्य  आणि स्वावलंबन  बिंबविण्याचे  काम शिक्षक करीत असतात. आईवडिलांनंतर मुले सर्वात जास्त आपल्या शिक्षकांच्या  सानिध्यात राहत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे एक प्रचंड उर्जा, हेच ते वय की जेथे त्याचे पुढील आयुष्य कसे असणार ते ठरणार असते. या वयात त्याच्यावर योग्य संस्कार झाले तरच स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे हित होणार असते. अलीकडील शिक्षण क्षेत्रातील वातावरण बदलत जात असले तरी काही शिक्षक आपले कार्य व्रत घेतल्या प्रमाणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने करीत आले आहेत.  असे शिक्षक- प्राध्यापक व्यक्तिगत लाभ किंवा हानीचा विचार न करता ज्ञानदानाचे कार्य मन लावून करताना दिसतात. या मांदिआळीत बसणारे एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे  परभणी येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे संशोधन मार्गदर्शक, पदवी पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल शिंदे सर यांचे! आज प्रदीर्घ सेवेनंतर ते  सेवानिवृत्त होत आहेत. गेली  ३५ वर्ष पदवी आणि १६  वर्ष पदव्युत्तर वर्गाना अध्यापन कार्य करून  सर आज एका आनंदी भावनेने सेवानिवृत्त होत आहेत.
    
डॉ. सुनिल शिंदे सरांचा  जन्म 21 मे  १९६०  रोजी सुगाव  ता. अंबाजोगाई  जि. बीड  येथे  विश्वनाथराव कोंडीबा शिंदे या मोठ्या आणि संपन्न शेतकरी कुटुंबात झाला.  परंतु ६० वर्षापूर्वी भारतीय शेती म्हणजे अगदीच पारंपारिक, सततचे दुष्काळ, त्यातल्या त्यात मोठ खटलं, गावाचे कर्तेपण, पाहुण्यांची उठबैस, गावकी भावकीच्या अडी-अडचणीच्या काळात  मदतीला धावून  जाण्याची वृती, अशी सगळी पार्श्वभूमी, त्यामुळे त्याचं बालपण हे संस्कारशील वातावरणात गेले. ते एकूण ६  भावंडे असा मोठा परिवार. ते लहानपणापासून मेहनती, जिद्दी असल्याने प्राथमिक शिक्षण सुगाव तर माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे भावंडांबरोबर पूर्ण केले. पदवी बीड येथील बलभीम महाविद्यालयातून प्राप्त केली. तर डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र हा आवडता विषय घेऊन  पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ह्याच विद्यापीठातून एम.फील. व शिक्षणशास्त्र पदवी प्राप्त केली. संशोधन कार्य (पीएच.डी.) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पूर्ण केले. परभणी जरी जिल्ह्याचे ठिकाण असले  तरी त्याचा बाज पुरता ग्रामीण आहे. गोदावरी आणि अनेक नद्यांच्या सुपीक जमिनीच्या  खोऱ्यात पसरलेला हा जिल्हा!.  ‘मुठभर पेरा आणि पोतभर मिळवा’ मुळे गड्या आपला गाव बरा अशी मानसिकता, त्यामुळे भाग भांडवल असून सुद्धा परभणी शहर आणि परिसरात शिक्षण, औदोगीकरण या बाबतीत म्हणावी तशी प्रगती तीस वर्षापूर्वी झाली नव्हती.  काही व्यक्ती, संस्था, व्यक्तिमत्त्वे या जिल्ह्याला आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यापैकीच एक अॅड.गणेशरावजी दुधगावकर यांची ज्ञानोपासक शिक्षण संस्था हि खेडोपाडी, वाडी वस्त्यावर पांगलेल्या होतकरू मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत होती. या संस्थेने ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी गुणवंत आणि मेहनती युवकांनाच सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठात शिकलेले हुशार विद्यार्थी या संस्थेकडे आकर्षित झाले. डॉ.सुनिल शिंदे यांची गुणवत्ता पाहून संस्थेनी त्यांना सामावून घेतले. सन १९८५ मध्ये त्यांनी संस्था रुजू केली. गौरवर्ण, उंचापुरा देह या शारीरिक गुणांबरोबरच, भारदस्त आवाज, विषयाचा प्रचंड आवाका, शिस्त, प्रभावी अध्यापन कार्य यामुळे ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक बनले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे अध्यापन कौशल्याने प्रभावित होऊन राज्यशास्त्र विषयात अध्ययन करून सरांच्या हाताखाली संस्काराचे धडे घेतले. सरांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील अनेक विभागात   प्रशासकीय अधिकारी,प्राध्यापक,संशोधक म्हणून कार्यरत आहेत.   
     
खरे तर लोकशाही शासनपध्दतीत राज्यसंस्थेचे उद्दिष्ट हे आजच्या जगापेक्षा उद्याचे जग सुंदर बनविणे हे असते, लोकशाही शासन प्रकारात हे कार्य राजकीय पक्ष करत असतात. म्हणून राजकीय पक्षांचा अभ्यासच महत्त्वाचा मानून सरांनी महाराष्ट्रच्या राजकारणात  एकेकाळी प्रभाव असणाऱ्या  शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणावर पी.एचडी.चे संशोधन कार्य केले. 
    
कार्यमग्न आणि प्रयोगशील असणे हा शिक्षणाच्या क्षेत्रात  गतिमानता आणण्यासाठी आवश्यक असा गुण आहे. म्हणून सरांनी विद्यार्थी केंद्रित विविध प्रकारच्या  महाविद्यालयीन  आणि विद्यापीठाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, सर एम.फिल. आणि पी.एचडी.चे संशोधक मार्गदर्शक आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११ विद्यार्थ्यांनी एम.फिल. तर १३ विद्यार्थ्यांनी पी.एचडी. पदवी प्राप्त केली आहे. या शिवाय त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेऊन विधिमंडळ अभ्यास दौरे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळात अभ्यासक्रम  निर्मितीचे कार्य केले आहे. अनेक विद्यापीठांसाठी अभ्यासक्रम निर्मिती मध्ये सहभाग नोद्विला आहे. या शिवाय विद्यार्थ्यांना समजतील अश्या सोप्या आणि सुटसुटीत भाषेत पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थासाठी ग्रंथ निर्मिती केली आहे.नुकतेच त्यांनी स्वामी रामानंद  तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर बहिस्त विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ लेखन व संपादनाचे कार्य केले आहे.  अनेक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे ते  अनेक वर्ष संपादक मंडळ सदस्य, मार्गदर्शक राहिलेले आहेत. तसेच अनेक  संशोधनपत्रीकातून त्यांनी संशोधन प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर अश्या विविध चर्चासत्रे, परिषदा मधून सरांनी  विषयतज्ञ  म्हणून मार्गदशन केले आहे. अनेक विद्यापीठात पी.एचडी बहिस्थ परीक्षक म्हणून त्यांनी कार्य कार्य केले.   
    
आपल्या देशाचे संविधान भारतीय  नागरिकांना सहज सोप्या भाषेत  समजावे म्हणून  त्यांनी आकाशवाणी केंद्रावरून वर ४१ भागात आपल्या आवाजात संविधानाची ओळख करून दिली. गाव खेड्यावर,वाडी वस्तीवर, साक्षर-निरक्षर नागरिकांना भारतीय  संविधान नक्कीच समजले. हे प्रसारण झालेल्या  परभणी, सांगली, आणि मुंबई केंद्रावर आलेल्या उदंड प्रतिक्रियांवरून समजते. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र निमित्त सरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेणारी यशवंत किर्तीवंत, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक या मालिकेचे १३ +१३ असे भाग परभणी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत झाले. तसेच वेध महापुरुषांचा या आकाशवाणी वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी विविध महापुरुषांच्या जीवनाचा वेध घेतला. विनोबा भावे म्हणत त्या प्रमाणे- शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा, शिक्षक हा ज्ञान परायण असावा, ज्ञान हे सेवा परायण असावे

शिक्षकाने शिक्षण देत असताना बाल व्हावे व विद्यार्थ्याने शिक्षण घेऊन मोठे व्हावे तरच शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होते. या ऊक्तीप्रमाणे ते एक हाडाचे शिक्षक होते ते वर्गावर कायम वेळेवर हजर राहत असत. कारण शिकवणे हाच श्वास आहे असे मानत. विषयाच्या अंतरंगात जाऊन अगदी सोप्या आणि साध्या भाषेत विद्यार्थ्यांचे विषय ज्ञान ते वाढवीत. त्यांनी कधीच तासिका बुडवून कोणते काम केले नाही. वर्षभर मिळणाऱ्या रजा  विनाकारण कधी  घेतल्या नाहीत. शासन आणि विद्यापीठाकडून मिळणाऱ्या इतर रजा तर नाहीच नाही. शेवटपर्यंत वर्गात शिकविताना सेवेतील पहिला तास आहे अश्या जबाबदारीतून  ते शिकवीत आले आहेत.
    
मितभाषी, शिस्तबद्ध परंतु सकारात्मक स्वभाव, हि त्यांची स्वभाव वैशिष्ट्य. विद्यार्थी, अध्यापन, शिक्षण हेच त्यांचे खरे विश्व. विद्यार्थ्यांना ते अत्यंत पोटतिडकीने मार्गदर्शन करतात. शिक्षक केवळ वर्गात शिकवितात म्हणून त्यांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो असे नसून शिक्षकांचे कथनी आणि करणी, राहणीमान, बोलणे, स्वभाव, समाजातील वावर याचे पण विद्यार्थी निरीक्षण करीत असतात. शिंदे सरांचे व्यक्तिमत्व विद्यार्थांबरोबरच आपल्या बरोबरीच्या नवीन सहकार्यांना देखील प्रभावित करणारे  आहे. त्यांच्या प्रति विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदर युक्त भीती असते. सरांनी कधीच चुकीच्या कामाना थारा दिला नाही. प्रसंगी जवळची मंडळी नाराज झाली पण शिस्त कधीच सोडली नाही. शिस्त,गुणवत्ता आणि सचोटी हे  गुण वैशिष्ट्य सरांनी शेवटपर्यंत तंतोतंत पाळली.
     
हे सर्व करीत असताना आपल्या परिवाराकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. पुढे मुलांना उच्च विद्याविभूषित करून स्वतःच्या पायावर उभे केले. आपल्या परिवारातील  सर्व सदस्यांना,  नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन करीत राहातात. आदर्श शिक्षका बरोबरच  एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श पिता, ह्या सर्व भूमिकांना न्याय देणे सोपे नाही पण डॉ सुनिल शिंदे  सरांनी ते सर्व शक्य करून दाखवले. याचे सर्व श्रेय ते वारकरी संप्रदाय आणि वाड-वडिलांकडून मिळालेल्या अध्यात्मिक बळाला देतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास काही ओळीत सांगायचा म्हटल्यावर तुकोबा रायांच्या शब्दात असे म्हणता येईल कि  
“तुका म्हणे कृतकृत्य झालो|
इच्छा केली ते पावलो|
अक्षरांचा श्रम केला |
फळा आला तेणे तो ||
                

(लेखक- निफाड येथील क. का. वाघ. महाविद्यालयात राज्यशास्त्र– लोकप्रशासन विभागाचे प्रमुख आहेत. संपर्क- मो ९६३७७४७८९६)
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News