डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत संपन्न
कुलगुरू प्रा. वेदला रामाशास्त्री यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटू) लोणारेच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा संपन्न झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे सर्वच विद्यापीठांसाठी मोठे आव्हान होते. यूजीसीच्या नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना या परीक्षा घेणे अनिवार्य होते. 'बाटू'तर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेत उपाययोजनांचा अवलंब करत परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले नाही ही कौतुकास्पद बाब ठरली.
कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बहुविकल्पीय पर्यवेक्षीत परीक्षा पद्धतीचा अवलंब केला गेला. विद्यार्थ्यांना आपल्या घरूनच फोन, लॅपटॉप, किंवा डेस्कटॉपचा वापर करून ही परीक्षा देता येईल अशा प्रणालीचा वापर करण्यात आला.
बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर होते. याचा विचार करून त्यावर उपाय म्हणून विद्यापिठातर्फे मॉडेल प्रश्नसंच निर्माण करून विद्यार्थ्यांना दिले गेले. परीक्षेबाबत अनेक शंका, अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या मनात होत्या. ऑनलाईन परीक्षेच्या प्रणाली बाबतीत विद्यार्थ्यांना असलेल्या प्रश्नांचे निरसन ऑनलाईन मीटिंगद्वारे विद्यापीठाचे तसेच महाविद्यालयाच्या प्रतिनिधिनी केले. मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समाधान होईपर्यंत अनेक वेळा सराव परीक्षा देण्याची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण ऑनलाइन परीक्षा प्रणाली समजून घेतली आणि नंतर परीक्षा देताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांनी परीक्षेच्या प्रत्येक बाबींचे नियोजनबद्ध स्वरूप तयार केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालक यांच्यावर आर्थिक भार पडू नये हे लक्षात घेऊन कुलगुरूंच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात आले नाही. या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांनी महाराष्ट्राभर स्वागत केले.
परीक्षेच्या पूर्व तयारीचे अवलोकन करतांना तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुलगुरू, परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. एस. साठे व सर्वच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे कौतुक केले. अंतिम वर्षाच्या सर्व रेग्युलर परीक्षा संपन्न झाल्या आहेत. बॅकलॉग विषयाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.
ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात इतर अनेक विद्यापीठांना अडचण येत असताना महाराष्ट्रातील एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ डीबाटूने ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबतचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर केलेले आहे. विद्यार्थी, पालक आणि समाजातील इतर घटकांकडुन त्याचे कौतुक होत आहे. सुयोग्य नियोजन आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यात अडचणी आल्या नाहीत, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे आधीच निरसन झालेले होते. शिवाय सरावसुद्धा उपयोगी पडला असे विद्यापीठ कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी यावेळी सांगितले.