आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच!

डॉ. सुमीत शहा, कर्करोगतज्ज्ञ
Monday, 3 June 2019

वेळीच अचूक निदान आणि प्रभावी उपचार करणे आवश्‍यक असते. प्राथमिक अवस्थेत कर्करोगाची गाठ ही चार सेंटिमीटरपेक्षाही लहान असते.

आपल्याकडे स्त्रियांचे आरोग्य हा सर्वांत दुर्लक्षित घटक आहे. आजारी असलेल्या मुलाची, बरं नसलेल्या नवऱ्याची इतकेच काय सासू-सासऱ्यांच्या औषधांच्या वेळा, त्यांची शुश्रूषा करणारी व्यक्ती कोण असेल तर ती आई, पत्नी आणि सून या रूपातील स्त्रीच असते. संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था जी स्वतः जबाबदारीने पेलते, ती स्त्री मात्र स्वतःच्या आरोग्याबाबत सजग असते का, हा खरा प्रश्‍न आहे. कारण आपल्याकडील स्त्रिया स्वतःला होणारा त्रास लवकर कोणाशी बोलत नाहीत. तो सहन करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. आजाराबद्दल आपल्या शरीराने वेळोवेळी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून आजार बळावतो.

वेळीच अचूक निदान आणि प्रभावी उपचार करणे आवश्‍यक असते. त्यातही स्त्रियांना गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे निदान झाल्यास वेळीच उपचारांची नितांत गरज भासते. कारण या आजाराची उपचाराची दिशा तो आजार कोणत्या अवस्थेत, टप्प्यावर आहे, त्यावर ठरविली जाते. गर्भाशयाच्या मुखाशी मर्यादित असलेला कर्करोग हा त्याचा पहिला टप्पा असतो. दुसऱ्या टप्प्यातील प्राथमिक अवस्थेत कर्करोगाची गाठ ही चार सेंटिमीटरपेक्षाही लहान असते. याच टप्प्यातील आजार वाढत असताना ही गाठ चार सेंटिमीटरपेक्षा मोठी होते. कर्करोग हा गर्भाशयाच्या आवरणात पोचलेला असतो.

खुब्यांच्या हाडांपर्यंत हा आजार गेल्याचे निदान झाल्यास तो आजाराचा तिसरा टप्पा मानला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्राथमिक अवस्थेत असलेल्या आजारावर शस्त्रक्रिया हा प्रभावी उपचार ठरतो. कारण त्याचे निदान अगदी सुरवातीला झालेले असते. आधुनिक काळात या शस्त्रक्रियांसाठी मोठी चिरफाड करावी लागत नाही. तर अगदी दुर्बिणीतून काही सेंटिमीटरचा छेद घेऊन केली जातात. 

या कर्करोगाच्या लक्षणांकडे डोळेझाक केल्यास आजार वाढतो. त्याच प्रमाणात उपचारप्रणालीही बदलते. दुसऱ्या टप्प्यातील वाढलेल्या अवस्थेत शस्त्रक्रिया करता येत नाही. तेथे क्ष-किरणांद्वारे उपचार करावा लागतो. मात्र कर्करोग यकृत, फुफ्फुस किंवा वेगवेगळ्या हाडांमध्ये पोचला असल्यास त्यावर केमोथेरपी हा उपचार करण्यास प्राधान्य दिले जाते. गर्भाशयाच्या बाहेर कर्करोगाच्या पेशी पसरल्याचे तपासण्यांमधून स्पष्ट झाल्यास शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी द्यावी लागते. तर काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर क्ष-किरणांचे उपचार करावे लागतात. अर्थात, या टप्प्यापर्यंत येण्याची गरज रुग्णाला लागू नये, यासाठी आपल्याही स्वास्थ्याकडे स्त्रियांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News