राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनाबाबत निर्णयाचा अधिकार नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याचे अधिकार आहेत;

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याचे अधिकार आहेत; राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनाबाबत निर्णयाचा अधिकार नाही, असा दावा करणाऱ्या जनहित याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने परीक्षांबाबत 19 जूनला एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार कोव्हिड-19 प्रादुर्भावामुळे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा कालांतराने घेतल्या जातील. हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. पुण्यातील निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ऍड्‌. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार युजीसी विद्यापीठांचे नियमन करू शकते; राज्य सरकारला हा अधिकार नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला कायदेशीर आधार नाही. म्हणून हा अध्यादेश रद्द करा, अशी याचिकादाराची मागणी आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आधीच टांगणीला लागले असून, या आदेशात स्पष्टता नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राज्य सरकारने एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश न्या. ए. ए. सय्यद आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिला. युजीसीला प्रतिवादी करण्याचे निर्देशही न्यायालयाने याचिकादारांना दिले आहेत.

विद्यार्थ्यांना संभ्रमित केल्याचा आरोप
राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले आहे. कोरोनामुळे एका गटाची परीक्षा रद्द केली, तर दुसऱ्या गटाची परीक्षा कालांतराने कशी काय घेणार, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. परीक्षेला उपस्थित न राहिल्यास विद्यार्थ्यांच्या मागील प्रगतीचा आढावा घेऊन सरासरी मूल्यांकन केले जाईल, असा पर्यायही सरकारने दिला आहे; परंतु मूल्यमापन करण्याची ही पद्धती शिक्षण क्षेत्राला अपरिचित आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थी आणि पालकांना संभ्रमित केल्याचा आरोप याचिकादाराने केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News